Lokvijay
blank

आधी लगीन कोंडाण्याचे

पु.ल देशपांडे

इतिहासात काही व्यक्ती अजरामर होऊन राहतात तशी काही वाक्यंही अजरामर असतात.

पण जिथून आपली अपेक्षाही नसते अशा एखाद्या व्यक्तीच्या तोंडून जीवनाचं सूत्र मागावं असं वाक्य किंवा एखादा उद्‌गार उमटतो त्यावेळी ते वाक्य केवळ एक प्रभावी वाक्य म्हणून न राहता ती व्यक्ती ज्या काळात जगत होती त्या काळाचं चित्र उभं करून जाते.

“आधी लगीन कोंडाण्याचं” हे तानाजी मालुसऱ्याचं असंच एक वाक्य आहे. “पोराचं लगीन काढलंय राजांची पायधूळ मांडवात पडली पाहिजे”, असं सांगून रायाजीच्या लग्नाची अक्षता द्यायला गेलेला हा उमरठ्याचा बहाद्दर मावळा सारखा डोळयापुढे दिसायला लागतो. त्याच्या भरदार मिश्श्यांच्या टोकांवर लिंब ठेवता येत असत हे बालपणी ऐकलेलं वर्णन आठवतं. त्याच्या शरीराचं वर्णन करताना कोल्हापुरातल्या लहरी हैदर शाहिरांनी “अंगलट जशी बाभळीची गाठ” म्हटलं आहे. हा तानाजी, सोबत म्हातारा शेलारमामा, उमरठ्यांतली चार भल्या घरची माणसं, दोन-चार पोक्त्या बायका असा हा आवताणाला आलेला मेळावा समोर उभा राहतो. कदाचित नऊ-दहा वर्षांचा नवरा मुलगाही राजांच्या पायावर घालायला त्यांनी सोबत आणला असेल. राजाचा हात पाठीवरून फिरवला जाणं म्हणजे साक्षात् तुळजाभवानीच्या हाताचा स्पर्श घडणं अशी भावना असण्याचा तो काळ. लहानपणापासून आपल्या जिवाला जीव देणाऱ्या सवंगड्याच्या पोराचं लगीन निघालेलं आणि इकडे कोंडाणा सर करण्याचं वचन स्वतःच्या आईला गेलेलं अशा कात्रीत सापडलेल्या शिवाजी महाराजांच्या मनाची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाही करवत नाही. लग्नाची अक्षत घेऊन आलेल्या आपल्या मित्राला गड जिंकायच्या कामगिरीवर पाठवण्याच्या बोलण्याची महाराजांनी सुरुवात कशी केली असेल ते इतिहासातल्या त्या क्षणालाच ठाऊक. पण इथे खुबीने आडवळणं घेत विषय काढायचा प्रश्नच नव्हता. जीवन हे ज्यावेळी यज्ञात टाकायच्या समिधेसारखे ठरते त्यावेळी त्या यज्ञकार्याखेरीज इतर सारी कार्य गौण ठरतात. महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा महायज्ञ उभारला होता आणि साध्यासुध्या मावळ्यांचे आपल्या हाडांची वज्र करणारे दधीची केले होते. प्राणांची आहुती टाकायच्या घडीचा जीवनातला जगण्याच्या लायकीचा एकमेव सोन्याचा क्षण मानणाऱ्या माणसांचा मेळावा जमविल्याशिवाय जगातल्या कुठल्याच महान कार्याची सिद्धी होऊ शकलेली नाही. “एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार” अशा निर्धाराने जोडलेली माणसं एकत्र यावी लागतात. मग त्यांची चाल रणांगणाच्या दिशेने असो की उत्तर-दक्षिण ध्रुवाचा शोध लावायच्या दिशेने असो. अशा निर्धाराने पेटलेली माणसं महाराजांनी गोळा केली होती. कोंडाण्याचा विषय निघाल्याक्षणी लग्नाचे आमंत्रण द्यायला आलेल्या ह्या तानाजीच्या तोंडून उद्‌गार निघाले, “आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच” मला हे वाक्य तानाजीने उच्चारलं होतं की नव्हतं याच्या ऐतिहासिक पुराव्याची गरजच वाटत नाही.

स्वराज्य स्थापनेच्या ध्यासानं भारलेल्या त्या काळातला साक्षात् कालपुरुषच तानाजीच्या मुखाने हे वाक्य बोलला असेल असंच वाटतं. “राजा कालस्य कारणम्” हे सत्य महाभारतकारांनी सांगितलं आहे. शिवाजी राजा हे त्या काळाचं कारण होतं. तानाजीच काय, येसाची, बाजी, हिरोजी यांपैकी कोणीही असं आमंत्रण घेऊन आला असता आणि महाराजांनी कोंडाणा परक्याच्या ताब्यात असण्याची खंत व्यक्त केली असती तरी त्यातला प्रत्येक जण हेच म्हणाला असता, “आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या मुलाचं.” आपल्या चारित्र्याने, धैर्याने, शहाणपणाने आणि साहसाने जेव्हा नेते असा जिवंत आदर्श निर्माण करतात त्याचवेळी अनुयायी देखील मोठ्या दिव्यावर लहान दिवे लावावे तसे प्रज्वलित होऊत जात असतात. जीवनात सर्वस्व पणाला लावून सामाजिक सुखासाठी एखादा गड सर करण्याचं प्रयोजन लाभणं हेच माणसाच खरं भाग्य. हे गढ़ काही रणांगणावरच सर करायचे असले पाहिजेत असं नाही

सामान्य माणसांना असे जिंकण्यासारखे कोंडाणे दाखविणारी थोर माणसं आणि ते जिंकण्यासाठी प्राणपणाने लढणारी साधी माणसं ज्या काळात निर्माण होतात तो काळ आणि तो समाज एका अद्भुत तेजाने तळपत असतो. तिथे स्वतःचं नेतृत्व टिकविण्यासाठी अभद्र धडपड करावी लागत नाही. त्या कार्याची महानताच अशी माणसाच्या मस्तकावर नेतृत्वाने अभिषेक करीत असते नुसत्या घोषणा देणे निराळे आणि मंत्र देणे निराळे, वैयक्तिक अभ्युदयासाठी आणि स्वर्गप्राप्तीसाठी जपायच्या मंत्रांना काय शक्ती असते मला ठाऊक नाही पण सारे वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून सामाजिक अभ्युदयासाठी सर्वस्व अर्पण करायला निघालेला एखादा नेता कसोटीच्या आणि एखादचं वाक्य उच्चारतो आणि त्या वाक्याचा मंत्र होऊन त्या मंत्रशक्तीने सारा समाज भारावून जाऊन पराक्रमाची शर्थ करायला लावणाऱ्या कोंडाण्यावर कसा चालून जातो याची उदाहरणे अगदी कालपरवा घडल्याइतकी ताजी आहेत अशाच एका कसोटीच्या दिव्याक्षणी लोकमान्य टिळकांच्या तोंडून वाक्य आलं, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच” मुंबईच्या गवालिया टॅकवरच्या त्या ऐतिहासिक सभेत महात्मा गांधी इंग्रजांना उद्देशून “भारत छोडो” म्हणाले आणि गदिमांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे त्या मंत्राने “मृतांचे राष्ट्र सारे जागले.”

असे मंत्र प्रथम उच्चारणाऱ्या माणसांनी इतर सर्वसंगपरित्याग करून एका महान ध्येयाशी आपला संग जुळवलेला असला तरच त्याला मंत्रसामर्थ्य येतं. “मला मायभूमी कुठे आहे?” हे चारच शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्चारले आणि हजारो वर्ष एका विषम समाजपरिस्थितीच्या पोटात घुसमटलेली भावना ज्वालामुखीसारखा स्फोट घडवून गेली. शोकाचा श्लोक व्हावा तसे हे शब्द एका नव्या समाजक्रांतीच्या आगमनाची वार्ता सांगणाऱ्या प्रचंड घंटेसारखी घणघणायला लागते. नुसत्या घोषणा तयार करायला शब्दचातुर्य पुरेसे असते. साबणाच्या आणि शांपूच्या जाहिरातीचा मजकूर लिहिणाऱ्यामध्ये असल्या घोषणा रचायचे कसब असते. असल्या घोषणाचे मंत्र होत नाहीत. ती मंत्र कल्पनेची थट्टा असते, मंत्रद्रष्टा होणं सोपं नसतं. कुठल्याही क्षेत्रात का होईना, जीवाची बाजी लावून एखाद्या महान कार्याच्या सिद्धीला उभा राहाणारा माणूस एका निराळ्याच तेजाने तळपत असतो. त्याच्या शब्दांना त्याने जीवनात आचारलेल्या कृतीचे तारण असते. अशी माणसे मानवी इतिहासात अकल्पितपणाने उभी राहिलेली दिसतात. सामान्य माणसांना त्यांच्या अशा अकल्पित उगवण्याचे नवल वाटते आणि त्यातूनच अवताराची कल्पना जन्माला येते.

मोगली सत्तेच्या टाचेखाली आणि विजापूरकरांच्या चाकरीत स्वतःला खुषीने तुडवून घेणारी माणसंच दिसत असलेल्या काळात एक शिवाजी महाराज निराळीच प्रेरणा घेऊन उभे राहतात आणि अन्यायाचं राज्य उलथून पाडून न्यायाचं राज्य स्थापण्याचा संकल्प सोडायला का प्रवृत्त होतात, हे रहस्य उलगडणारा माणूस मला तरी अद्याप भेटलेला नाही परसत्तेचा जाच सर्वांनाच असतो. साक्षात् जन्मदाता त्या परसत्तेने बहाल केलेल्या सोन्याच्या पिंजऱ्यात होता आपलं सारं शौर्य त्याने बादशहाच्या चरणी वाहिलं होतं. अशा बापाचा मूलगा ती जुलमी सत्ता टिकू देणार नाही अशी प्रतिज्ञा करून उठलाच कसा? ह्या प्रश्नाला उत्तर सापडत नाही ज्या भवानीमातेने शिवरायांवर कृपा केली तिने छत्रपती निर्माण कसे होतात हे जसं एक कोडं आहे तसंच तसला निर्धार घेऊन ज्या काळात एखाद्या नेत्याने उभे राहायला हवे त्या काळात हवे तसे नेते उभे का राहत नाहीत हेही एक कोडचं आहे.

जेव्हा राहातात तेव्हा मात्र सामान्य वाटणाऱ्या माणसाच्या अंतःकरणातही एक तेजाची ज्योत पेटवून जातात. मुंबईतल्या गिरणीत राबणारा एक बाबू गेनू नावाचा कामगार त्याला कदाचित “स्वराज्य” हा शब्दही लिहिता येत नसेल, पण परदेशी मालाने भरलेला ट्रक पूढे जाऊ देणार नाही या निर्धाराने तो त्या ट्रकपुढे आडवा पडला आणि स्वतःला चिरडून घेतले. त्याला लोक हुतात्मा मागणार आहेत आणि पुढेमागे मुंबईतल्या रस्त्याला आपलं नाव मिळणार आहे याची त्या बाबू गेनूला कल्पनाही नसेल.

एखाद्या उदात्त मंत्राने राष्ट्र भारलेलं असलं की एरवी सामान्य वाटणारी माणसं देखील पराक्रमाची शिखरं गाठून जातात. मला वाटतं त्या मंत्रामध्ये माणसाला निर्भय करण्याची शक्ती असते. किंबहुना मंत्राची मुख्य गती माणसाला निर्भर करणे हीच असावी लहानपणी अंधारातून जाताना भीती वाटायची, मुख्यतः भुताची, अशा वेळी आजी सांगायची, राम राम राम राम हा मंत्र म्हणत जा. भुत घावरून पळून जातात. त्या राम रामच्या जपावरून भुताचं भय पळून जायचं. हरहर महादेवसारखा मंत्र साक्षात शिवाजी महाराजांकडून मिळाल्याबरोबर मावळ्यांनी मरणाचं भय जिंकलं. कित्येकदा हाती घेतलेल कार्यचं माणसाला मंत्रासारखं निर्भय करून टाकतं. इतिहासाचार्य राजवाडयाना ही निर्भयता त्यांच्या कार्यातूनच मिळाली होती. आपल्या कार्याच्या मोठेपणाबाबत त्यांना एवढी खात्री होती की त्यापुढे त्यांनी आर्थिक दारिद्रय, उपासमार यांच्याकडे तुच्छतेने पाहिलं. पैसा देखील त्यांना आपल्या कार्यासाठी हवा असायचा. इतिहासग्रंथाच्या प्रकाशनासाठी ते एका संस्थानिकाकडे द्रव्य मागायला गेले असतानाची आख्यायिका आहे. छपाईसाठी त्यांना हजार रुपये पाहिजे होते. संस्थानिक म्हणाले, “पाचशे देऊ” राजवाडे म्हणाले, “ज्याचे वंशज म्हणून तुम्ही आज गादीवर बसला आहात त्या तुमच्या पूर्वजांच्या इतिहासाचे हे संशोधन आहे. जे कार्य तुम्ही करायला हवं ते मी करतो. मला हजार रुपये हवे आहेत.” कोट्यवधी रुपयांच्या जडजवाहिराचा खजिना असलेला तो संस्थानिक म्हणाला, “हजार रुपये म्हणजे फार होतात.”

“फार काय होतात? एक बाई कमी ठेवा,” राजवाडे.

गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे मला ठाऊक नाही, पण खरी असू शकेल असंच राजवाड्यांचं निर्भय आचरण होतं. स्वतःला सर्व सुखं नाकारून एखाद्या महान कार्यात गुंतवून घेणारी माणसेच असं बोलू शकतात. सारा देश आणीबाणीच्या काळात भयग्रस्त झालेला असताना एक जयप्रकाश “विनाश काले विपरीत बुद्धी” म्हणतात आणि तो विनाश घडून राज्यातली लोकशाही जाऊ नये म्हणून हजारो माणसं तुरुंगवास पत्करतात. साधा पंचा नेसून महात्मा गांधी इंग्लंडमध्ये बादशहाला भेटायला गेले किवा शेतकऱ्याचे घोंगडे खांद्यावर टाकून “तुमच्या राज्यातल्या रयतेला उघड्या अंगावर टाकायला याहून अधिक काही मिळत नाही.” हे मुंबईच्या इंग्रज गव्हर्नरला बजावायला जोतिबा फुले गेले. ह्या घटनेचं आज कदाचित आश्चर्य वाटणार नाही. पण इंग्रज गव्हर्नरचं साधं चहाचं आमंत्रण आलं की, आपल्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार झाला असं मानून त्या चहासाठी नवा सूट आणि नवे बूट घालून जाण्याचा तो जमाना होता. बादशहाला गांधी नावाचा एक हिंदी अर्धनग्न फकीर दरबारी पोषाख न घालता भेटायला जाणार आहे, ह्या बातमीने त्या काळी साऱ्या इंग्रज राष्ट्राला धक्का बसला होता. आणि गांधींनी तर ही गोष्ट किती सहजतेने केली पहा. त्यांना कोणी तरी विचारलं, “बादशहापुढे असं उघड्याने जाताना तुम्हाला संकोचल्यासारखे वाटत नाही?”

गांधी म्हणाले, “संकोच कसला, आम्हा दोघांनाही पुरून उरतील इतके कपडे एकट्या बादशहाच्या अंगावर होते.” ही घटना केवढा परिणाम साधून गेली ह्याची प्रचीती ब्रिटिश बनावटीचं कापड विकणाऱ्या व्यापाऱ्यांना आली. बर्मिंगहॅम आणि मॅचेस्टर गिरण्यांच्या कापडाशिवाय अंगाला दूसरे कापड लागले तर चट्टे पडतील अशा विचाराचे हजारों नबाबलोक सूट फेकून खादीचे जाडेभरडे कपडे घालायला तयार झाले होते. खादीचे कपडे घालून इंग्रजी कंपन्यांतून नोकरी करणे हा देशद्रोह होता तो हा काळ !

उमरठयाच्या एका तानाजी मालुसऱ्याने पोराचे लग्न पुढे ढकलले आणि तो कोंडाणा जिंकण्याच्या कामगिरीवर निघालाय ही वार्ता मावळात पसरल्यावर लग्नाच्या मोसमात दारी उभारलेल्या मांडवाकडे पाठ फिरवून कितीतरी मावळ्यांनी ‘आधी लगीन कोंडाण्याचे’ म्हणत आपल्या हाती ढाली-समशेरी घेतल्या असतील आणि तानाजीबाबाच्या कोंडाण्याच्या लग्नात आपल्या प्राणांचा अहेर करायला त्या दिशेने आपल्या तट्टांना टाच मारली असेल. अशा उदात्त कृतीमध्ये परिणत होणाऱ्या शब्दांनाच मंत्र म्हणायचे नाहीतर स्वार्थासाठी खोटेपणाचा रोज उच्चांक गाठण्याची चढाओढ चालू असताना “सत्यमेव जयते” नावाचा एक मंत्र हवा काढलेल्या फुग्यासारखा लोळागोळा होऊन पडलेला आपण पाहातोच आहोत.

जोवर आमच्या डोळयांना प्राण पणाला लावून जिंकण्याचे कोंडाणे समोर असून दिसत नाहीत तोवर आपण आपापल्या मांडवात स्वतःच्या मुलांना सत्तेच्या आणि श्रीमंतीच्या बोहोल्यावर चढवून भाडोत्री बेंडबाजेवाल्यांना ‘वाजवा रे वाजवा’ म्हणत राहूया. तानाजीसारख्या आधी कोंडाण्याचं लग्न लावणाऱ्या वेड्यांना आजच्या राजकारणात स्थान नाही. त्याचा फार तर एखादा पुतळा बसवावा.

1 comment