Lokvijay

आणखी एका मराठी कलावंतांची हिंदी चित्रपटात झेप

मराठीमध्ये फार कमी कलावंत असे आहेत की त्यांना मराठीप्रमाणेच हिंदी मालिका तसेच चित्रपटातही भूमिका करण्याची संधी मिळते. अशा भाग्यवान कलावंतांमध्ये उमेश धूत या बुजूर्ग कलावंतांचा आवर्जून समावेश करावा लागेल. महसूल खात्यातील नोकरी सांभाळून त्यांनी आपला अभिनयाचा छंद जोपासला आहे. नाटक असो, मालिका असो की चित्रपट हाती येईल ती भूमिका स्वीकारायची आणि त्यात स्वतःला झोकून देऊन आपल्या अंगीभूत अभिनयाने त्या भूमिकेला परिपूर्ण न्याय द्यायचा या दृष्टीकोनातून त्यांची कलाक्षेत्रातील वाटचाल सुरू आहे. विशेष म्हणजे शासकिय सेवेतील निवृत्ती नंतर त्यांच्यातील अभिनयाच्या कक्षा खऱ्या अर्थाने रुंदावत चालल्या असून बिग बॅनरच्या मालिका आणि चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना मागणी येत आहे. या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ह्रतिक रोशन, अनिल कपूर आणि दिपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ” फायटर ” या चित्रपटात उमेश धूत एका वृध्द कलावंतांच्या भूमिकेत झळकले आहेत. सिद्धार्थ आनंद हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. उमेश धूत यांचे फक्त फोटो पाहून दिग्दर्शक सिद्धार्थजींनी ” फायटर ” चित्रपटातील वृद्ध व्यक्तीच्या भूमिकेसाठी उमेश यांची निवड केली. यावरुन उमेश यांचे व्यक्तिमत्त्व एखाद्या भूमिकेसाठी किती चपखल मॅच होते हे लक्षात येते. ” फायटर ” या चित्रपटातील भूमिकेच्या पार्श्वभूमीवर बोलताना उमेश धूत यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची माहिती देताना सांगितले की, मला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. नांदेड येथे शाळा – महाविद्यालयात शिकत असताना मी जेव्हा चित्रपट पहायचो तेंव्हा आपणही कधी ना कधी पडद्यावर झळकणार हा एक आत्मविश्वास होता. त्यादृष्टीने मी वाटचाल सुरु केली. एकांकिका, नाटकात मिळेल त्या भूमिका करायला सुरुवात केली. राज्य नाट्य स्पर्धांमधून भाग घेत बक्षिसेही मिळवली. त्यानंतर नोकरीमुळे मध्यंतरी काही काळ गॅप पडला. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्यास आलो आणि पुन्हा एकदा अभिनयाचा श्रीगणेशा करायचे ठरवले आणि चमत्कार घडावा त्याप्रमाणे कामे मिळत गेल्याचे उमेशजींने सांगितले.

असे म्हणतात की, आयुष्याच्या उत्तरार्धात काही जणांचे भाग्य उजळते. उमेश धूत यांच्याबाबत असेच म्हणावे लागेल. निवृत्तीनंतर त्यांच्यातील अभिनय खऱ्या अर्थाने बहरत चालला आहे. आतापर्यंत त्यांनी ” मुळशी पॅटर्न “, ” सूर सपाटा “, ” मी पण सचिन होणार “, ” देवा अंतरंगी”, ” सावट “, ” ७०२ दिक्षित ” या मराठी चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. ” मेरे साई ” या मालिकेत नीलकंठ ही साईभक्ताची भूमिका तर ” ज्ञानेश्वर माऊली ” या मालिकेत रत्नाजी सावकाराच्या भूमिकेत ते झळकले आहेत. याशिवाय मतदानाबाबत जनजागृती करणाऱ्या जाहिरात पटात शाहरुख खानसोबत त्यांनी काम केलेले आहे. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या नाना पाटेकरची प्रमुख भूमिका असलेल्या ” छप्पन पार्ट २ ” या चित्रपटात उमेशजींनी एका आतंकवादीच्या वडीलांची भूमिका केलेली आहे. जॅकी श्रॉफ, मनिषा कोईराला अभिनीत ” ग्रहण ” या चित्रपटात ते न्यायमुर्तीच्या भूमिकेत झळकले आहेत. आणि आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ” फायटर ” मध्ये उमेशजींना काम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीविषयी भाष्य करताना उमेशजी म्हणतात, माझ्या आयुष्यात जे काही घडते ते सारे ईश्वरकृपेने मी फक्त निमित्तमात्र ! उमेशजींचा हा विनम्र भावच त्यांच्या यशाचे द्योतक आहे.

Add comment