Lokvijay
blank

बड्या बापाची अशीही बडी मुलगी!

संजय आवटे

वडील दहा वर्षे पंतप्रधान. पाच वर्षे केंद्रीय अर्थमंत्री. सहा वर्षे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते. चारेक वर्षे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर. असे असताना डॉ. मनमोहनसिंगांची मुलगी एवढी साधी कशी? विचारल्यावर त्या म्हणाल्या, “म्हणूनच अशी. कारण मी मनमोहनसिंगांची मुलगी आहे. त्यांनी आम्हा मुलींना हेच तर शिकवलं. कुठेही जा, पण जमिनीशी नाते घट्ट असू द्या. स्वतःची ओळख तयार करा. जे आवडतं, ते मनापासून करा आणि कोणत्याही विषयाच्या खोलात जा.”


blank

‘वर्तमानातील माध्यमांनी मला समजून घेतले नसेल, पण इतिहास मला न्याय देईल’… भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनोहनसिंग पत्रकार परिषदेत सांगत होते. चार जून २०१४ रोजी झालेली ही पत्रकार परिषद भारताच्या पंतप्रधानांनी घेतलेली आजवरची अखेरची पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेला दहा वर्षे उलटली. अद्यापही भारताच्या पंतप्रधानांनी ‘प्रेस कॉन्फरन्स’ घेतलेली नाही.

हाच प्रश्न मी विचारला उपिंदर यांना. डॉ. उपिंदर सिंग या प्रख्यात अशोका विद्यापीठाच्या अधिष्ठाता. इतिहासतज्ञ ही त्यांची ओळख. त्यावर त्यांनी विपुल लेखन केलं आहे. “डॉ. मनमोहनसिंगांना इतिहास न्याय देईल, असं वाटतं तुम्हाला?” त्यावर ६४ वर्षांच्या उपिंदर गोड हसल्या. म्हणाल्या, “मी प्राचीन इतिहासाची अभ्यासक आहे. त्यामुळे समकालीन इतिहासावर फार बोलणार नाही. मात्र, एक गोष्ट सांगते. पंतप्रधान असताना जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अर्थात जेएनयूमध्ये मनमोहनसिंगांचे भाषण होते. तेव्हा विद्यार्थ्यांनी काळे झेंडे दाखवले. त्यावर डॉ. सिंग म्हणाले- हे चांगलेच आहे. विद्यापीठात ‘कन्सेंट’ नव्हे, ‘डिसेंट’च असायला हवा. मतभेदांना जागा असायला हवी. ही भूमिका असल्यानेच त्यांना भारत समजला. ‘आयडिया ऑफ इंडिया’ समजली. भारतातल्या आर्थिक सुधारणांसाठी तर इतिहास त्यांना लक्षात ठेवेलच, पण एक लोकशाहीवादी, प्रगल्भ पंतप्रधान म्हणूनही इतिहास त्यांची नोंद करेल.”

इतिहासाच्या अभ्यासक म्हणून हा प्रश्न त्यांना विचारला होताच. पण, आणखी एक कारण होते. डॉ. उपिंदर या मनमोहनसिंगांच्या थोरल्या कन्या. पण, मनमोहनसिंगांची मुलगी म्हणून फार काही बोलायला त्या तयार नव्हत्या. मी प्राचीन इतिहासाची विद्यार्थी आहे, एवढीच माझी ओळख आहे, असे त्या सांगत होत्या. अगदी प्रांजळपणे बोलत होत्या. चेहरा अगदी प्रसन्न. आवाजात मार्दव आणि कान लावून ऐकावा, असा शांत स्वर. अत्यंत नेमके शब्द आणि भूमिकेतही तेवढेच नेमकेपण. एकदम साधा पंजाबी सूट. सगळी कामे स्वतः करण्यावर भर. कोणाला ना बॅग घेऊ दिली, ना कोणते काम सांगितले. ‘सरहद’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी त्या पुण्यात आल्या होत्या. सोबत तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असणारे त्यांचे पतीही होते. संजय नहार सांगत होते, “कशाला गाडी पाठवताय? रिक्षाने येऊ आम्ही कार्यक्रमाकडे, असे त्या म्हणाल्यावर मला धक्काच बसला!”

वडील दहा वर्षे पंतप्रधान. पाच वर्षे केंद्रीय अर्थमंत्री. सहा वर्षे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते. चारेक वर्षे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर. असे असताना मनमोहनसिंगांची मुलगी अशी कशी? विचारल्यावर म्हणाल्या, “म्हणूनच अशी. कारण मी मनमोहनसिंगांची मुलगी आहे. त्यांनी आम्हा मुलींना हेच तर शिकवलं. कुठेही जा, पण जमिनीशी नाते घट्ट असू द्या. स्वतःची ओळख तयार करा. जे आवडतं, ते मनापासून करा आणि कोणत्याही विषयाच्या खोलात जा.” मनमोहनसिंंग आणि गुरशरण या जोडीला तिन्ही मुली. डॉ. मनमोहनसिंग यांच्याप्रमाणे गुरशरण याही प्राध्यापक, स्कॉलर. त्यांचा विषय इतिहास. मुलीही त्याच वाटेनं गेल्या. थोरली इतिहासाची स्कॉलर. मधली मुलगी कादंबरीकार. धाकटी न्यूयॉर्कमध्ये एक सामाजिक संस्था चालवते.

डॉ. उपिंदर यांनी बारा पुस्तकं लिहिली आहेत. त्यापैकी ‘पोलिटिकल व्हायोलन्स इन एन्शिएंट इंडिया’ हे महत्त्वाचे. हिंसा आणि अहिंसा यांच्यातील झगडा सांगत, आजच्या राजकीय हिंसाचाराचे स्वरूप त्या स्पष्ट करतात. प्राचीन भारतातही हा संघर्ष होता. त्यांच्या मते, इतिहास यासाठी महत्त्वाचा कारण तो एक दृष्टी देतो. विचार देतो. प्राचीन भारताचा विचार करायचा तर हा देश नेहमीच ‘प्लुरल’ होता. अनेकविध भाषा, धर्म-पंथ असणारा हा देश. वेगवेगळ्या संस्कृती इथे नांदल्या. हा वारसा आज अधिक महत्त्वाचा आहे. त्यांच्या ‘Ancient India : Culture of Contradictions’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘प्राचीन भारत : विरोधाभासांची संस्कृती’ या नावाने नुकताच आला आहे. प्राचीन भारतातील सामाजिक विषमता आणि त्याचवेळी सर्वांना मुक्तीचा अवकाश, वासना आणि विरक्ती यांना एकाच वेळी दिले गेलेले महत्त्व, देवीमहात्म्य आणि टोकाचा स्त्रीद्वेष, हिंसा आणि त्याचवेळी अहिंसा अशा विरोधाभासांवर हे पुस्तक भाष्य करते.

इतिहासाकडे फार वेगळ्या अंगाने पाहाणारी अशी प्राध्यापक समोर असताना, एनसीईआरटी आणि अभ्यासक्रमातील विपर्यस्त इतिहास हे मुद्दे चर्चेत येणे स्वाभाविकच. ‘आपल्या सोईचा इतिहास नव्या पिढीवर थोपवणे अन्यायकारक आहे’, असे सांगताना त्या म्हणतात, ‘इतिहासाच्या लेखनात राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. इतिहास ही संशोधकांनी सांगण्याची गोष्ट आहे. राजकीय नेत्यांनी नव्हे. संशोधक, लेखक, पत्रकार, कलावंत यांना मुक्तपणे व्यक्त होता आले पाहिजे.’

अर्थात, ‘अभिव्यक्तीवर कितीही बंधने आली तरी सामान्य माणूस ती झुगारून देतो’, असे म्हणताना, डॉ. उपिंदर म्हणतात, ‘या लोकसभा निवडणूक निकालाने तर ती आशा नक्कीच दिली आहे.’ त्यापेक्षा अधिक भाष्य त्या करत नाहीत. मात्र, त्यांचे निखळ हास्य बरेच काही सांगून जाते!

2 comments