Lokvijay
blank

बाळासाहेबांचा ‘कोहिनूर’

१९९५ मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेना-भाजपा युतीचं सरकार स्थापन होणार होतं. त्यावेळी युतीतलं थोरलेपण शिवसेनेकडं असल्यानं मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार हेही नक्की होतं. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांना खुर्चीचा जो मोह झाला तसा बाळासाहेब ठाकरे यांना १९९५ मध्ये झाला नाही. सत्तेवर अंकुश ठेवायचा तर पद आपल्याकडंच असलं पाहिजे, असं वाटण्याइतपत बाळासाहेबांचं नेतृत्त्व तकलादू नव्हतं. त्यामुळं त्यांनी मनोहर जोशींच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ सहज घातली. शिवसैनिक पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला. पुढची जवळपास चार वर्षे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. या संपूर्ण कार्यकाळात “बाळासाहेब ठाकरे यांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे मुख्यमंत्री,” अशी टीका जोशींवर होत राहिली. एखाद्या स्वाभिमानी व्यक्तीला ही टीका खरं तर अजिबात न आवडणारी. पण ठाकरेंनी ओढलेले शब्दांचे अनेक फटकारे जोशींना कधीच लागले नाहीत. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची नुसती निष्ठा नव्हती तर श्रद्धा होती. याच भक्तीनं जोशी यांना नगरसेवक, मुंबईचे महापौर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद, विधीमंडळातील विरोधी पक्षनेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे अध्यक्ष अशी सर्वोच्च पदं दिली.

दुसऱ्या बाजूनं बाळासाहेबांच्या मनातही मनोहर जोशींसाठी खास स्थान होतं. बाळासाहेब आणि मनोहर जोशी यांच्यातलं मैत्र या दोघांनी एकत्रपणे काढलेल्या गजाआडच्या दिवसांमध्ये घट्ट झालं.

१९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना झाली. त्याच्या दुसऱ्याच वर्षी मनोहर जोशी शिवसेनेत दाखल झाले. १९६९ सालातलं सीमा आंदोलन हे शिवसेनेच्या वाटचालीतलं सोनेरी पान. सभाबंदीचा हुकूम मोडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हजारो शिवसैनिकांसह बेळगावात पोहोचले. सभा दणक्यात पार पडली. त्याला मोडता घालण्याचं धाडस कर्नाटकच्या कॉंग्रेस सरकारला झालं नाही. त्याचवर्षी केंद्रीय गृहमंत्री मोरारजी देसाई मुंबईत येणार होते. याच मोरारजींनी मुंबईचे मुख्यमंत्री असताना संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन चिरडलं होतं. १०५ मराठी लोकांचे बळी त्यांनी घेतले होते. सीमा प्रश्नाबद्दल याच मोरारजींना निवेदन देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला होता. पण माहिमला उभ्या असणाऱ्या शिवसैनिकांना चिरडत मोरारजींच्या गाड्यांचा ताफा निघून गेला.

बाळासाहेब ठाकरेंनी संतापून आंदोलन तीव्र करण्याचा आदेश दिला. शिवसैनिकांनी मुंबई बंद पाडली. एकूण रागरंग पाहून तत्कालीन काँग्रेस राज्य सरकारनं ९ फेब्रुवारी १९६९ च्या पहाटे साडेचार वाजता बाळासाहेब ठाकरेंना घरातून अटक केली. दत्ताजी साळवींना आदल्या दिवशीच ताब्यात घेतलं होतं. ठाकरेंना पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. तिथं मनोहर जोशींनाही आणलेलं होतं. तिथून बाळासाहेब ठाकरे, दत्ताजी साळवी आणि मनोहर जोशी यांना वेगवेगळ्या गाड्यांमधून पुण्याच्या येरवडा तुरुंगात हलवण्यात आलं.

‘गजाआडील दिवस’ या सदरात बाळासाहेब ठाकरेंनी लिहिलेली टिपणं तेव्हा ‘मार्मिक’मधून प्रसिद्ध झाली. अटकेनंतरच्या चौथ्याच दिवशी म्हणजे १३ फेब्रुवारी १९६९ ची आठवण बाळासाहेबांनी लिहिली आहे -“रात्री पावणेबारा-बाराचा सुमार असेल. माझ्या कोठडीचे कुलूप काढले गेले. तुरुंग अधिकाऱ्याने सांगितले, बाहेर कुणीतरी तुम्हाला भेटायला आले आहे. पहातो तो आमचे मित्र मधु मेहता व मनु अमरसी बसलेले. त्यांनी सुरुवात केली, ‘बाळासाहेब, आम्ही मुख्यमंत्र्यांकडून आलो आहोत. त्यांनी तुम्हाला व्यक्तिगत विनंती केली आहे की, कृपया आंदोलन मागे घ्या.’ मी प्रथम नकार दिला आणि काही निवेदन करायचेच असेल तर माझे जे दोन सहकारी आहेत दत्ताजी साळवी व मनोहर जोशी यांच्याशी विचारविनिमय करूनच निवेदनाचा विचार होईल. तेव्हा दोघांना आणण्यासाठी तुरुंग अधिकारी रवाना झाले. दोघांना मुंबईची एकूण परिस्थिती काय आहे ते सांगितले. मुंबईवर कब्जा करण्यासाठी कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस पुढे सरसावले. त्यांनी शिवाजी पार्कला सभा घेण्याचा प्रयत्न केला. पण माणसेच जमली नाहीत. मग विळा हातोडावाले लालभाई त्यांनीही हीचवेळ म्हणून मुंबईवर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न केला. पण तोही फसला. या दोघ्या उपटसुंभ्यांच्या हातात मला मुंबई द्यायची नव्हती. शिवाय तुरुंग अधिकारी जाधवसाहेब यांनीही मला विनंती केली. आम्हा तिघांचा (ठाकरे, साळवी, जोशी) नकार येणार असे दिसताच ते म्हणाले, ‘मी आताच मुंबईतून परत आलोय. सर्वत्र आग पेटत आहे. बसेस, गाड्या जळत आहेत. रस्त्यारस्त्यातून मोठमोठे दगड व झाडे तोडून आडवी ठेवली आहेत. रस्त्यात कुणी चिटपाखरू दिसत नाही. आपण निवेदन काढल्यास फार उपकार होतील. मुंबई वाचेल.’ परंतू आम्ही त्यांना निक्षून सांगितले – मी आंदोलन मागे घेतो ते केवळ मुख्यमंत्र्यांच्या विनंतीमुळे नव्हे. ही शरणागती नाही. परंतु, पोलीस कमिशनर काण्या मोडक यांनी जो अमानुष गोळीबार चालवला आहे आणि माणसे हकनाक मारली जात आहेत, त्यांची कत्तल थांबविण्यासाठी मी हे निवेदन काढीन.”

अखेरीस स्वतः बाळासाहेबांनी निवेदन काढल्यानंतर जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणं मुंबई शांत झाली. शिवसैनिकांनी स्वतः रस्ते धुऊन काढले. अडथळे दूर केले. बाळासाहेबांच्या एका निवेदनात मुंबई पूर्वपदावर आली.

१० एप्रिल १९६९ या दिवशी दत्ताजी साळवी यांची सुटका झाली. पुढं १९ एप्रिल १९६९ रोजी बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांना येरवड्यातून विमानानं मुंबईत आणलं गेलं. वीस मिनिटांत सांताक्रुझ. पण विमानतळावरून दोघांची रवानगी थेट ऑर्थर रोड जेलमध्ये झाली. दरम्यानच्या काळात शिवसैनिक कोर्टाची लढाई लढतच होते. त्याचाच परिणाम म्हणून २५ एप्रिलला ऑर्थर रोड तुरुंगाधिकाऱ्यांना हायकोर्टाच्या आदेशाचा निरोप आला – ‘ठाकरे आणि जोशी यांची मुक्तता करा!’

बाळासाहेब जोशींना म्हणाले, ‘जोशी, तयारीला लागा, जिथे नेतील तिथे जायचं!’ यावेळी मुक्तता होणार आहे, याची कल्पना दोघांना उशीरा आली. मनोहर जोशी पहिल्यांदा ऑर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर आले. पाठोपाठ बाळासाहेब ठाकरे. भगवे झेंडे घेतलेल्या शिवसैनिकांची उत्स्फूर्त गर्दी बाहेर होती. बाळासाहेब ठाकरेंचा गगनभेदी जयजयकार करत शिवसैनिकांनी ठाकरे-जोशींना मिरवणुकीनं कलानगरातल्या ठाकरेंच्या निवासस्थानी आणलं.

जवळपास ७६ दिवस ठाकरे आणि जोशी गजाआड एकत्र होते. बाळासाहेब आणि मनोहरपंत यांच्यातलं नातं तुरुंगात समृद्ध झालं. येरवड्यात-ऑर्थर रोड तुरुंगात त्यांच्यात कित्येक तास गप्पा रंगल्या. पाय दुखेपर्यंत त्यांनी एकत्र शतपावल्या घातल्या. कौटुंबिक विरहाच्या काळात त्यांनी एकमेकांना आधार दिला. या मैत्रीत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं निर्विवादपणे वयाचं आणि नेतृत्वाचं थोरलेपण होतं. १९६९ नंतर बाळासाहेबांनी अनेकदा मनोहरपंतांची कधी खासगीत, कधी जाहीरपणे कानउघाडणी केली. ठाकरी भाषेचा प्रसाद त्यांना दिला. पण त्यांच्या मनातलं मनोहर जोशी यांचं स्थान कायम राहिलं. दुसरीकडं जोशींनीही एकदाही, चुकूनही बाळासाहेबांबद्दलचा भक्तीभाव उणावू दिला नाही. त्यासाठी इच्छेनुसार ऐकू न येण्याची अनोखी कला त्यांनी अवगत करून घेतली.

मनोहरपंत जोशी मिश्किल होते. हसतमुख होते. ते लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्याचा योग आला होता. संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू असल्यानं त्यांची वेळेशी लढाई चालू होती. पण त्याही गडबडीत त्यांनी दिल्लीतल्या गारठत्या थंडीत भल्या सकाळची भेटीची वेळ पाळली होती. उमदेपणानं पाहुणचार केला होता. स्वतःच्या राजकीय प्रवासाचा धावता आढावा घेतला होता.

महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद बाळासाहेबांनी जसं दिलं तसंच ‘व्यास प्रकरणा’चं निमित्त झाल्यानंतर ते काढूनही घेतलं. दोन्हीवेळी बाळासाहेबांचा आदेश मनोहरपंतांनी शिरसावंद्य मानला. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांभोवतीच्या बडव्यांचा उल्लेख करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी ज्या मोजक्या आणि कडव्या शिवसैनिकांच्या ह्रद्यात कालवाकालव झाली त्यातले एक मनोहर जोशी होते. उद्धव आणि राज यांच्यात समेट व्हावा यासाठी त्यांनी पडद्याआडून प्रयत्न केले. पण ते घडत नाही म्हटल्यावर शिवसेनेला धक्का लागेल असं काहीही न करता स्वस्थ बसले.

प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर बऱ्याच महिन्यांनी ते व्यक्तिगत कामासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या भेटीचा पुन्हा एकदा योग आला होता. स्वाभाविकपणे आमच्या गप्पांमध्ये प्रमोद महाजन यांचा विषय निघाला. “प्रमोद महाजन नसते तर मी लोकसभेचा अध्यक्ष होऊ शकलो नसतो,” इतक्या सरळपणे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती. ते कसं हे त्यांनी उकलून सांगितलं – “संसदेचं अधिवेशन सुरु होतं. मधल्या सुट्टीच्या कालावधीत मी सभागृहाबाहेर रेंगाळत होतो. अचानकपणे प्रमोदजी माझ्याजवळ आले. थोडं बाजूला घेऊन मला म्हणाले, ‘सर, लोकसभेचे अध्यक्ष होणार का?’ मी मनात म्हणालो, “काय गंमत करताहेत हे.” कारण एकतर या संदर्भात बाळासाहेब मला काहीही बोललेले नव्हते. शिवाय अध्यक्ष होण्याइतपत संख्याबळही आमच्या ‘एनडीए’कडं तेव्हा नव्हतं. प्रत्यक्षात मी प्रमोदजींना म्हणालो, ‘या मानाच्या पदाला नकार कोण देईल? पण बाळासाहेबांचं काय? त्यांची परवानगी कोण घेणार? त्यांची हरकत नसेल तर माझी काहीच हरकत नाही.’ माझं बोलणं संपण्याआधीच प्रमोदजी उसळले, “मग, बाकीचं माझ्यावर सोडा हो तुम्ही.” त्यानंतर मला काहीही करावं लागलं नाही. प्रमोदजींनी अटलजी-अडवाणी यांची पसंती मिळवली. परस्पर बाळासाहेबांची परवानगी घेतली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी सोनिया गांधी यांचाही होकार मिळवला. त्यासाठी त्यांनी स्वतः सोनियाजींची भेट घेतली होती. शिवसेनेच्या खासदाराला लोकसभा अध्यक्ष करण्यासाठी सोनियाजींना त्यांनी कसं पटवलं हे त्यांनाच माहित. ध्यानीमनी नसताना मी सहजपणे लोकसभेचा अध्यक्ष होऊन गेलो.” गणेश मावळणकर, शिवराज पाटील यांच्यानंतरचे तिसरे मराठी अध्यक्ष आपण होऊ शकलो, याचं मनस्वी समाधान जोशींना होतं.

‘मनोहर जोशी’ या ब्राह्मणाकडं मुख्यमंत्रीपद, हे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून १९९५ मध्ये पहिल्यांदाच घडलं. तेही केवळ जोशींचे नेते बाळासाहेब ठाकरे होते म्हणून. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांना युती सरकारचे शिल्पकार म्हटलं गेलं. सरकारचे शिल्पकार महाजन आणि मुख्यमंत्री जोशी याचा आधार घेत शरद पवार यांनी त्यावेळी ‘जोशी-महाजनांचं सरकार’ अशी जातीय शेरेबाजी केली होती. पुढं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरही पवारांनी याच पद्धतीनं जातीय शेरेबाजी करण्याची संधी घेतली.

२०१९ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पवारांची मी मुलाखत घेतली होती. पुण्यातल्या मोदीबागेतील त्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. त्यावेळी १९९५ मधल्या त्यांच्या जातीयवादी शेरेबाजीची आठवण करून देत पवार यांना मी प्रश्न केला. तेव्हा पवारांनी सांगून टाकले, “मनोहर जोशींवर जातीवाचक टीका करून आम्ही एक प्रयोग करून बघितला, पण लोकांनी तो स्विकारला नाही म्हटल्यावर तो सोडून दिला.” पवारांच्या कुटील राजकारणाचे भान मनोहर जोशींना होते. तरीही पवार-जोशी यांच्यातील व्यक्तिगत संबंध चांगले होते हे विशेष.

शिवसेनेच्या पहिल्या फळीतले, बाळासाहेबांच्या अंतर्गत वर्तुळातले ज्येष्ठ शिवसैनिक आता अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत शिल्लक असतील. तेही ऐंशीच्या पल्याड. वृद्धत्वामुळं ही मंडळी केव्हाच राजकीय परीघाबाहेर फेकली गेली आहेत. बाळासाहेबांची शिवसेना आज नसल्याचं शल्य त्यांच्या उरी असेलच. पण त्याहीपेक्षा बळवंत मंत्री, बंडू शिंगरे, छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे अशाचं बंड ज्यांनी पचवलं त्या मंडळींना शिवसेनेची सध्याची घसरण पाहणं कमालीचं वेदनादायी असणार. त्यापेक्षा बाळासाहेब ठाकरे, दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे, राजा साळवी, साटम गुरुजी अशा साठच्या दशकातल्या अनेक कट्टर शिवसैनिकांबरोबरची स्वर्गस्थ मैफल रंगवण्यात मनोहरपंत जोशींना कदाचित अधिक आनंद होईल.

सुकृत करंदीकर

Add comment