Lokvijay
blank

छत्रपती शिवाजी महाराज घडविणारी आदर्श राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ- मा.अलकाताई इनामदार

मोगलांच्या काळात स्त्रियांना संरक्षण नव्हते. धर्माला, देवळांना संरक्षण नव्हते .अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाल शिवबा यांच्यावर जिजामाता यांनी संस्कार केले बाल शिवबाला व त्यांच्या मित्रांना शस्त्रास्त्राचे तसेच धर्माचे शिक्षण दिले मोगलांच्या अन्याय अत्याचारा विरोधात स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. बालवयातच द-या खोर्‍यांमध्ये पाठविले. शिवबासह अनेक मावळ्यांना जिजाऊ मातेने घडविले.त्यामुळे ख-या अर्थाने जिजाऊमाता यांनी आदर्श मातृत्वाचा आदर्श समाजासमोर ठेवला असे मत राष्ट्र सेविका समितिच्या अ.भा.सहकार्यवाहीका मा. अलकाताई इनामदार यांनी विचार व्यक्त केले. त्या दि.२५ जानेवारी २०२४ रोजी सिंदखेडराजा येथे देवगिरी व विदर्भ प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या स्वराज्य ज्योती संमेलनाच्या सांगतासमारंभ प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज राणीसाहेब छाया विजयसिंह राजे जाधव तसेच पश्चिम क्षेत्र कार्यवाहीका मा.सुनंदाताई जोशी, विदर्भ प्रांत कार्यवाहीका मा.रोहिणीताई आठवले, देवगिरी प्रांत कार्यवाहीका मा.रत्नाताई हासेगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा.अलकाताई इनामदार पुढे म्हणाल्या की, राजे लखोजीराव जाधव यांच्या मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे जिजामातेचा जन्म झाला बालवयात त्यांचं संगोपन जाधव घराण्यात झालं. त्यांचा विवाह भोसले घराण्यात झाला. मोगल साम्राज्य हे दक्षिणेमध्ये साम्राज्य करत होते. त्यांच्या राज्यात अन्याय, अत्याचार जनतेवर होत होता. हे जिजामातांना सहन होत नव्हते. एकूण परिस्थिती प्रतिकूल असतानाही शिवबाला लहानपणापासूनच धर्माचे व स्वराज्याचे शिक्षण दिले. शस्त्र-शास्त्र विद्या शिकवली आणि मोघलांना व त्यांच्या अत्याचारांना रोखण्यासाठी स्वराज्य स्थापन करण्याची संकल्पना बाल शिवबाच्या मनात रुजवली. आणि धाडसाने राजा शिवछत्रपती घडविले. आजच्या या आधुनिक युगात स्त्रियांनी जिजाऊंचा आदर्श समोर ठेवत धाडस, दूरदृष्टीपणा, स्वधर्म, स्वदेश व स्वसंस्कृतीचा संस्कार आपल्या पाल्यांवर करत स्वराज्याचे सुराज्य निर्माण करावे असे आवाहन याप्रसंगी मा. अलकाताईंनी केले. यावेळी मंचावर पश्चिम क्षेत्र कार्यवाहीका मा. सुनंदाताई जोशी, देवगिरी प्रांत कार्यवाहीका मा. रत्नाताई हसेगावकर, विदर्भ प्रांत कार्यवाहीका मा. रोहिणीताई आठवले यांची उपस्थिती होती.
राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवारायांना घोषवादनाने मानवंदना देण्यात आली.शहरातून शिस्तबद्ध पथसंचलन काढण्यात आले.

blank

सिंदखेडराजा येथे संपन्न झालेल्या स्वराज्य ज्योती संमेलनात राष्ट्र सेविका समितिच्या सेविकांनी मनोवेधक प्रात्यक्षिके शिस्तीने सादर करुन भगव्या ध्वजाला वंदन केले. उद्घाटन सत्रात राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहीका मा. चित्राताई जोशी यांनी जिजामातेच्या विविध गुणांवर प्रकाश टाकला. यावेळी छत्रपती प्रतिष्ठानच्या सौ स्मिता काटेकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. या प्रसंगी राष्ट्र सेविका समितिच्या दिनदर्शिकेचे आणि पू. श्री विजयराव देशमुख यांच्या “शककर्ते शिवराय “या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ज्योती रहाटीकर यांनी वैयक्तिक गीत व सूत्रसंचालन श्रुती देशमुख यांनी केले. यावेळी सौ गौरी अशोक थोरात यांनी ‘साक्षात जिजाऊ’ ही एकपात्री नाटिका अतिशय सुंदर पद्धतीने सादर केली. आपल्या प्रभावी वाणी आणि उत्स्फूर्त अभिनयाने त्यांनी सर्व सेविकांना मंत्र मुग्ध केले.

या संमेलनाला राष्ट्र सेविका समितिच्या अ.भा.सहकार्यवाहीका मा. सुलभाताई देशपांडे, व अ. भा. सहकार्यवाहीका मा. सुनिताताई हळदेकर, अ. भा. माजी निधी प्रमुख मा. भारतीताई बंबावाले, पश्चिम क्षेत्र सह कार्यवाहीका मा. सुनंदाताई देवस्थळी, प. महाराष्ट्र प्रांत कार्यवाहीका व पदाधिकारी,कोकण प्रांत सहकार्यवाहीका , प्रचारीका मा. वैशालीताई भागवत, कोकण प्रांत पदाधिकारी , देवगिरी प्रांत सहकार्यवाहीका मा. अंजलीताई बडवे, विदर्भ प्रांत सहकार्यवाहीका मा. मधुराताई पांडे व मा. गायत्रीताई विप्रदास तसेच देवगिरी, विदर्भ प्रांताचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.विशेष म्हणजे वयाची पंच्यान्नवी पार केलेल्या समितिच्या माजी अ. भा. बौद्धिक प्रमुख, कार्यतपस्वी मा. सुशिलताई अभ्यंकर या संमेलनात पूर्ण वेळ उपस्थित होत्या. संमेलनाला विदर्भ आणि देवगिरी प्रांतातून १२०० हून अधिक सेविका सहभागी झाल्या होत्या. स्थानिक नागरिकांसह एकूण उपस्थिती १३५० एवढी होती.

Add comment