Lokvijay

UPDATE – धोका टळला | गॅस टँकर सुरक्षितरित्या हटवले, काही वेळात वाहतूक पूर्ववत होणार

छत्रपती संभाजीनगर, दि.१ (जिमाका)

UPDATE ६:३0 PM – आता १२ तासांच्या अथक प्रयत्नांनी टँकर सुरक्षितरित्या हवण्यात आला आहे. त्यामुळे शहरावरील एक मोठा धोका टळला आहे. १२ तासांचे प्रयत्न, शेकडो पाण्याचे टँकर, विविध विभागांचे कर्मचारी, पोलीस प्रशासन यांनी मिळून या परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. यातून काही धोका उद्भवला असता तर आजूबाजूचा १ किलोमीटरचा परिसर उद्ध्वस्त झाला असता, अशी भीती वर्तवण्यात येत होती. मात्र अचूक कार्यपद्धतीने सदर संकट टळले आहे. आता काही वेळात सिडको चौकात वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. या कामगिरीबद्दल प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे. मनपा प्रशासक, पोलीस आयुक्त, अग्निशमन दलाचे कर्मचारी, आरोग्य विभाग, प्रदूषण नियंत्रक मंडळ असे सर्व प्रमुख विभाग सिडको भागात ठिय्या मांडून प्रत्येक बाबीवर बारीक लक्ष ठेवून होते.

UPDATE ५:00 PM – कलम १४४ लागू, सिडको एन-3,एन-4,एन-5 परिसरातील सर्व शाळा व आस्थपणा बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित, जालना रोड वसंतराव नाईक चौक उड्डान पुलाजवळ एन-4 सिडको या ठिकाणी एच.पी.कंपनीचे गँस टँकरला अपघात झाला आहे. या गॅस टँकर मधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झालेली असून सदर गॅस हवेमध्ये पसरलेला आहे व पसरत आहे. या अपघात स्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात रहिवासी वस्ती,शाळा, कॉलेज, हॉटेल, दुकाने असल्याने मोठ्या प्रमाणात लोक राहतात. तसेच लोक जमा होत आहेत. सदर घटनेचे गांर्भीय लक्षात घेता सिडको एन-3,एन-4,एन-5 परिसरातील सर्व शाळा व आस्थपना बंद ठेवण्याचे आदेश निवासी उप जिल्हादंडधिकारी जर्नाधन विधाते यांनी निर्गमित केले आहे. सदरील आदेश दिनांक 01 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळ पासून ते गॅस गळतीची घटना पूर्णत: नियंत्रणात येईल त्या कालावधी पर्यंत अंमलात राहिल. नागरिकांनी सुरक्षेचा दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.

एन ३ परिसरात गॅस टँकर उलटला असून त्यातुन गॅस गळती होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सिडको परिसरातील नागरिकांनी घरातील गॅस पेटवू नये. घरात ज्वलनशील वस्तूचा वापर करू नये. शहरातील नागरिकांनी जालना रोड सिडको परिसरात वाहने नेऊ नये. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाना सहकार्य करावे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

Add comment