Lokvijay

शाम ढले खिडकी तले – गीता बाली

चंचल, शोख, चुलबुली अशी विशेषनामे जेव्हा नाव परिधान करतात तेव्हा समोर जो चेहेरा असतो तो गीताबालीचा असतो. हरिकीर्तन कौर नावाच्या ह्या अभिनेत्रीचा पहिला गाजलेला चित्रपट होता केदार शर्माचा ‘बावरे नैन’! त्यात राज कपूर तिचा नायक होता.राजकुमारीने गायलेल्या ‘सून बैरी बलम सच बोल रे’ मधील “इब” चा झटका तिने काय जिवंत केलाय! १९५१ च्या ‘अलबेला’ नी चित्रपटाची परिभाषाच बदलली. ती भगवान दादांच्या बरोबरीने फक्त नाचलीच नाही तर एका सुप्रसिद्ध नटीच्या सामान्य तरुणवीराच्या प्रेमाची आणि त्याला ते न कळल्याने होणाऱ्या घुसमटीची वेदना .. तिच्या अभिनयाची साक्ष होती. हातात मेंडोलीन घेऊन ‘अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले’ मध्ये डोळ्यात काय खट्याळ भाव आहेत. ‘जाल’ मधील “चोरी चोरी मेरी गली आना है बुरा” मध्ये तिने जान ओतलीय. “ये रात ये चांदनी” तिच्यावरच चित्रित झाले होते.


ती सुंदर होती का ह्यावर वादविवाद स्पर्धा होऊ शकतात… पण ती अभिनेत्री म्हणून जबरदस्त होती. तिच्यात एक वेस्टर्न लुक होता. तिची पडद्यावरची छबी ही ‘टॉम बॉय’ ची होती. पण तिचे हास्य निखळ होते, अभिनय नैसर्गिक होता, देहबोली आश्वासक होती.

तिचे लग्न झाले होते साक्षात शम्मीकपूर बरोबर त्यांच्या बरोबर तिने ‘मिस कोकाकोला’ नावाचा चित्रपट केला होता. त्यात चक्क शम्मीचा आवाज मुकेश होता आणि त्यातील “झुका झुका के निगाहे’ हे गाणे खूप गाजले होते. तर ‘बावरे नैन’ मध्ये राज कपूर तिला “खयालो में किसीके” म्हणत होता. तर ‘आनंदमठ’ मध्ये तिच्या तोंडी “वंदे मातरम” ज्यात तिचा सहकलाकार पृथ्वीराज कपूर होता. तिची सर्वाधिक जोडी गाजली ती देवआनंद बरोबर!!

‘बाझी’, ‘जाल’, ‘मिलाप’, ‘पॉकेट मार’ असे यशस्वी चित्रपट ह्या जोडीने दिले. १९४९ ला आलेला ‘दुलारी’ गाजला तो “सुहानी रात ढल चुकी” मुळे… पण त्यातील इतर गीतेही फार सुंदर होती. “चाँदनी बनके आयी हो प्यार ओ सजना” मधील गीताबालीचे मुरके लाजबाब होते. त्यात दुलारी होती मधुबाला तर कस्तुरी होती गीताबाली! निरागस मोहक सात्विक चेहऱ्याची मधुबाला आणि नैसर्गिक खट्याळ अवखळ देहाबोलीची गीताबाली आणि नौशाद ची सदाबहार गीते ही नेत्रांना अन कानांना आजही पर्वणी आहे. मधुबाला अन गीताबाली दोघीही अल्पायुषी!

गीताबाली ३५ व्या वर्षी देवी नावाच्या रोगाने गेली. पण तेवढ्याच आयुष्यात ७३ चित्रपट तिच्या नावावर जमा होते. आजही चित्रपटसृष्टीला तिची दखल घ्यायला भाग पडणारे तिचे अस्तित्व होते आणि राहील. जेव्हा अभिनेत्रींचा उल्लेख येईल त्यात गीताबाली चा नंबर खूप वरचा असेल आणि ‘Beauty lies in eyes of beholder’ हे खरं असेल तर माझ्यासाठी गीताबाली सुंदर होती!!!

डॉ. प्रसाद पिंपळखरे

Add comment