Lokvijay
blank

गुड बाय, दफा 302

डॉ. अभय मंडलिक

एक जुलै 2024 पासून इंडियन पिनल कोड हा ब्रिटिश काळापासून चालत आलेला गुन्हेगारी संबंधिचा कायदा रद्द करून तो नव्या स्वरूपात अंमलात आणला गेला आहे. इंडियन पिनल कोड हा कायदा भारतात सन 1860 पासून लागू असून या कायद्यात ,अंमलबजावणी पासून गुन्ह्यांच्या स्वरूपात झालेल्या बदलाव्यतिरिक्त, फारसे बदल झालेले नाहीत. या कायद्यासोबतच क्रिमिनल प्रोसिजर कोड तसेच इंडियन एव्हिडन्स ऍक्ट या कायद्यातही बदल करण्यात आले असून त्यांची नावे बदलण्यात आली आहेत. इंडियन पिनल कोड कायद्यातील झालेल्या बदलाचा आणि गुन्ह्यांबाबत बदललेल्या कलमांचा तक्ता खाली दिला आहे. इंडियन पिनल कोड हा गुन्हेगारीच्या संदर्भातील मूलभूत कायदा आहे आणि हा कायदा ब्रिटिश कायद्यावरून तयार करण्यात आला होता.


स्वातंत्र्योत्तर काळात इंडियन पिनल कोडची माहिती सर्व सामान्यांना हिंदी चित्रपटा द्वारे झालेली आहे.
खुनासाठी असलेले 302 कलम हे सर्वांना केवळ चित्रपटांमुळे माहीत झालेले आहे. हिंदी चित्रपटातून नायक किंवा नायिके कडून झालेल्या किंवा न झालेल्या खुनाबद्दल दफा 302 अंतर्गत फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा चित्रपटातील न्यायाधीश उर्दू भाषेमध्ये देत असत. यासोबतच साक्षी आणि पुरावे यांच्या आधारे हा निकाल दिलेला आहे असे देखील जाहीर करण्यात येत असे. चित्रपटातील या प्रसंगांमुळे सामान्य प्रेक्षकांना इंडियन पिनल कोड ,इंडियन एव्हिडन्स ॲक्ट या कायद्यांची कामचलाउ माहिती झाली होती. चित्रपटसृष्टीचे देशातील कायद्याबाबतचे हे महत्त्वाचे योगदान समजले जावे!

एक जुलै 2024 नंतर चित्रपट कथा लेखकांना नव्या कलमांचा अभ्यास करून न्यायाधीशांसाठी वेगळ्या प्रकारचे संवाद लिहावे लागतील. या अर्थाने जुन्या आयपीसी मधील 302 या कलमाला आता कायमचा राम राम ठोकण्यात येणार आहे.

आयपीसी कायद्याची पार्श्वभूमी

इंडियन पिनल कोड या कायद्याचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील संपूर्ण पोलीस यंत्रणेला या कायद्याची अचूक माहिती होती. मूळ कायदा इंग्रजीत असला तरी गरजेनुसार त्याचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करून सर्वांना समजेल अशा पद्धतीची रचना पोलीस खात्याने विविध ठिकाणी केली होती. इंडियन पिनल कोडाचे प्रशिक्षण हे पोलीस प्रशिक्षणाचा महत्त्वाचा भाग होते.कोणत्या गुन्ह्यासाठी कोणती कलमे लागू होतात या दृष्टीने इंडियन पिनल कोड हा खरोखरच फार महत्त्वाचा कायदा होता.एक जुलैपासून या सर्वात बदल झालेला असून कायद्याच्या नावासकट आणि कलमांसकट सारे बदललेले आहे. या बदललेल्या कायद्याचा अभ्यास देशातील संपूर्ण पोलीस यंत्रणेला आणि पोलिसांच्या बाजूने अथवा गुन्हेगारांच्या बाजूने बाजू मांडणाऱ्या वकिलांना नव्याने करावा लागणार आहे.

अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशीच त्याची चुणूक विविध पोलीस स्टेशनला दिसून आली. नव्या कायद्यातील कलमे बदलली असली तरी गुन्हेगारीच्या मूळ स्वरूपामुळे कायद्यातील तरतुदीत बदल झालेला नाही ,फक्त कलमांच्या क्रमांकात बदल झालेला आहे.

कलमे नवी व जुनी महत्त्वाचीगुन्ह्यांबाबत

गुन्हाजुने कलमनवीन कलम
हत्या३०७१०३ (१)
हत्येचा प्रयत्न३०७१०९
गंभीर दुखापत३२६११८ (२)
मारहाण३२३११५
धमकी५०६३५१ (२)
विनयभंग३५४७४
बलात्कार३७६ (१)६४ (१)
विवाहितेचा छळ४९८ (अ)८५
अपहरण३६३१३७ (२)
चोरी३८०३०५ (अ)
दरोडा३९५३१० (२)
फसवणूक४२०३१८ (४)
सरकारी कामात अडथळा३५३१३२

बदललेल्या नवीन कायद्यात पुढील बदल समाविष्ट करण्यात आलेले आहेत :

  • बाल म्हणजे काय याची व्याख्या करण्यात आली असून बाल आणि महिला गुन्ह्यांच्या बाबतीत नवे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलेले आहे.
  • कागदपत्रे या संकल्पनेत डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक डाटा याचा समावेश करण्यात आला आहे.
  • खोट्या बातम्या प्रसृत करणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.
  • आत्महत्येचा प्रयत्न हे कलम रद्द करण्यात आले आहे.
  • भीक मागण्यासाठी मुले पळवणे हा मानवी तस्करीचा गुन्हा म्हणून समजला जाईल.
  • पाच हजार रुपये पेक्षा कमी रकमेच्या चोरीसाठी समाजसेवा ही शिक्षा देण्यात येईल.
  • जुने 19 प्रकारचे गुन्हे रद्द करण्यात आले असून नवीन वीस प्रकारचे गुन्हे या कायद्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहे.
  • तेहतीस प्रकारच्या गुन्ह्यांसाठी शिक्षेच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.
  • 83 प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये दंडाच्या रकमेत भरीव वाढ करण्यात आली आहे.
  • 23 प्रकारच्या गुन्ह्यांसाठी नव्याने शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
  • नवीन कायद्यात एकूण 356 कलमांचा समावेश करण्यात आला आहे.

1 comment