औरंगाबाद, ३० जानेवारी : सोमवार ५ फेब्रुवारी २०२४ चे ठीक ११:०० वाजता महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरणाचे (Waqf Tribunal) कामकाज नवनिर्मित हज हाऊस चे आवारात तयार करण्यात आलेल्या इमारतीत सुरु करण्याचे आदेश बॉम्बे हायकोर्टाचे औरंगाबाद बेंचने दिल्याने तडकाफडकी शुक्रवारी २ फेब्रुवारीला औरंगाबाद हज हाऊस चे उदघाटन केले जाणार आहे. अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे हस्ते उदघाटन केले जाणार असल्याच्या निमंत्रण पत्रिका आज निर्गमित करण्यात आल्या.
जून २०२३ मध्येच नवनिर्मित औरंगाबाद हज हाऊस चे उपयोगिता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले होते. परंतु अल्पसंख्याक विकास विभागाच्या उदासिनतेमुळे उदघाटन रखडले होते. हज हाऊस चे आवारातच महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरणाची इमारत बांधण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे कार्यालय औरंगाबाद येथून मुंबई ला हलविण्यात येऊ नये, मंडळातील आणी न्यायाधिकरणातील रिक्त पदे भरण्यात यावी, न्यायाधिकरणातील एक अपर जिल्हाधिकारी दर्जाचे सदस्याचे पद भरण्यात यावे, न्यायाधिकरणाचे कामकाज नवीन इमारतीत सुरू करण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी औरंगाबाद येथील एड. जावेद देशमुख यांनी एक जनहित याचिका एड. राजेंद्र देशमुख यांचे द्वारा औरंगाबाद हायकोर्टात दाखल केली होती.
या जनहित याचिकेच्या सुनवणी दरम्यान शासनाचे वतीने सांगण्यात आले होते की महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे कार्यालय औरंगाबाद येथून मुंबई ला हलविण्यात येणार नाही. तसेच ऑगस्ट २०२३ मध्ये शासनाचे वतीने हायकोर्टाला आश्वासन देण्यात आले होते की ९० दिवसांत वक्फ बोर्ड आणि न्यायाधिकरणातील रिक्त पदे भरण्यात येतील, ६० दिवसांत न्यायाधिकरणाचे कामकाज हज हाऊस चे आवारातील इमारतीत सुरु केले जातील आणि न्यायाधिकरणातील अपर जिल्हाधिकारी दर्जा चे सदस्याचे पद भरले जातील. परंतु दिलेले आश्वासनाची पूर्तता ५ महिने उलटले तरी अद्याप करण्यात आली नसल्याने २५ जानेवारीला झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने शासनाचे कारभारावर ताशेरे ओढत तिव्र नाराजी व्यक्त केली. आणि ५ फेब्रुवारी रोजी ठीक ११:०० वाजता हज हाऊसचे आवारात निर्माण करण्यात आलेल्या वक्फ न्यायाधिकरणाचे कार्यालयात कामकाज सुरू करण्यात यावे असे आदेश दिले. तसेच न्यायाधिकरणातील अपर जिल्हाधिकारी दर्जा चे सदस्याचे पद पण भरण्याचे आदेश दिले. आणि पुढील सुनावणी पण ५ फेब्रुवारीलाच ठेवण्यात आली.
कंटेम्प्ट ऑफ कोर्ट चे भितीपोटीच अल्पसंख्याक विकास विभागाने ५ फेब्रुवारी पूर्वी हज हाऊस चे उदघाटनाचा मुहूर्त काढून २ फेब्रुवारी ला उदघाटन करण्याचा निर्णय घेतला आहे. हायकोर्टाचे दांडू मुळेच का होईना पण आज हाऊसचे उदघाटन होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
Add comment