Lokvijay
blank

इंडिया कॉलिंग – भिष्माचार्यांना ‘भारतरत्न’ : डॉ. सुकृत खांडेकर

भारतीय जनसंघापासून ते भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांच्या चार पिढ्या घडविणाऱ्या, पक्ष बांधणीसाठी अविश्रांत परिश्रम केलेल्या आणि संघ स्वयंसेवकापासून ते उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्याचे कळताच सर्वसामान्य कार्यकर्त्याला अभिमान तर वाटलाच पण सामान्य लोकांनाही आनंद झाला. वयाने ९६ वर्षांचे अडवाणीजी हे वयोवृद्ध नेता म्हणून आज देशाला परिचित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून त्यांना भारतरत्न सन्मान जाहीर केला आणि पक्षाच्या पितृतुल्य आदरणीय नेत्याविषयी आदर व्यक्त केला. देशाच्या विकासात लालकृष्ण अडवाणी यांचे असणारे योगदान कधीच विसरता येणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, दिवंगत नेते नानाजी देशमुख यांच्यानंतर भाजपा व संघ परिवारात भारतरत्न सन्मान मिळविणारे लालकृष्ण अडवाणी हे तिसरे नेते आहेत. आजवर देशातील पन्नास नामवंतांना हा सर्वोच्च पुरस्कार भारत सरकारने प्रदान केला आहे. भारतीय जनसंघाचे भारतीय जनता पक्षात रूपांतर करण्यात अडवाणी यांचा मोठा वाटा आहे. राम जन्मभूमी आंदोलनामुळे अडवाणी यांचे नाव घराघरांत पोहोचलेच, पण पक्षाच्या अवघ्या दोन खासदारांच्या संख्येवरून शंभर संख्या ओलांडण्यात अडवाणी यांच्या राम रथयात्रेचे फार मोठे योगदान आहे. राम रथयात्रेबरोबरच जनादेश यात्रा स्वर्णजयंती रथयात्रा, भारत उदय यात्रा, भारत सुरक्षा यात्रा, जनचेतना यात्रा अशा सहा यात्रा काढून अडवाणी यांनी देश पिंजून काढला व त्यातूनच भाजपा देशाच्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावांत पोहोचली. अडवाणींवर वयाच्या चौदाव्या वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून गेल्या दहा वर्षांत सात दिग्गजांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान दिला गेला. मोदी सरकारच्या काळातील सातवा भारतरत्न सन्मान हा लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झाला आहे. २३ जानेवारी २०२४ रोजी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न (मरणोत्तर) सन्मान जाहीर झाला. याखेरीज गेल्या दहा वर्षांत मदन मोहन मालवीय, अटलबिहारी वाजपेयी, प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना हा सन्मान मिळाला.

भारतरत्न सन्मान मिळाल्याचे समजताच अडवाणी म्हणाले, “आज मी दोन व्यक्तींचे स्मरण करतो, एक म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय व दुसरे म्हणजे अटलबिहारी वाजपेयी. मला देऊ केलेल्या सन्मानाबद्दल मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. आपण वयाच्या चौदाव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झालो. जीवनात माझ्यावर जे काम सोपवले गेले, ते काम मी नि:स्वार्थ भावनेतून करीत आलो. ज्या वाक्याने मला जीवनात प्रेरित केले ते म्हणजे – इदं न मम… हे जीवन माझे नाही. तर माझे जीवन राष्ट्रासाठी आहे…”

सन २०१५ मध्ये अडवाणी यांना पद्मविभूषण हा सन्मान मिळाला. देशात हा दुसऱ्या क्रमांकाचा सन्मान आहे. त्या अगोदर अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न सन्मान जाहीर झाला होता. तेव्हाचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी स्वत: त्यांच्या घरी जाऊन हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला होता. वाजपेयी ९० वर्षांचे होते. मुखर्जींनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून कृष्ण मेनन मार्गावरील वाजपेयींच्या घरी जाऊन हा सन्मान दिला होता.

अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. जगातील ५० देशांत त्याचे थेट प्रक्षेपण झाले. भाजपाने जेव्हा राम जन्मभूमी आंदोलनाला अधिकृतपणे पाठिंबा जाहीर केला, तेव्हा राम मंदिर हा देशाच्या राजकीय पटलावर प्रमुख मुद्दा बनला. १९८९ मध्ये पालमपूर येथे भाजपाच्या झालेल्या अधिवेशनात रामजन्मभूमी आंदोलनाला पाठिंबा देण्याचा ठराव भाजपाने केला, तेव्हा स्वत: अडवाणी हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. राम मंदिर व अडवाणी हे समीकरण कोणालाही पुसता येणार नाही. वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी गुजरातमधील सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती. २५ सप्टेंबरला सुरू झालेल्या रथयात्रेचे नियोजन नरेंद्र मोदी व प्रमोद महाजन यांनी संभाळले होते. आज प्रमोद महाजन हयात असते, तर त्यांनाही अडवाणी यांना भारतरत्न मिळाल्याचा खूप खूप आनंद झाला असता. अडवाणींच्या राम रथयात्रेने देशाच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली. १८८४ मध्ये लोकसभेत भाजपाचे केवळ दोन खासदार होते. अडवाणींच्या या रथयात्रेनंतर १९९१ मध्ये भाजपाचे १२० खासदार निवडून आले. रथयात्रेनंतर अडवाणी म्हणजे देशाचा हिंदुत्ववादी चेहरा अशी त्यांची ओळख झाली. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, अशा राज्यांत विशेषत: उत्तर भारतातील हिंदी भाषक राज्यांत भाजपाची प्रतिमा उंचावली. बिहारमध्ये समस्तीपूर येथे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी त्यांची रथयात्रा रोखली व बिहारच्या पोलिसांनी त्यांना २३ ऑक्टोबर १९९० रोजी अटक केली.

अडवाणींच्या रामजन्मभूमी आंदोलनाने देशात भाजपाची मोठी हिंदू व्होट बँक तयार झाली आणि भाजपाला दिल्लीला संसद भवनाकडे व साऊथ व नॉर्थ ब्लॉककडे जाण्याचा मार्ग अडवाणींच्या रथयात्रेने सुकर केला. या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अडवाणी हे वयपरत्वे हजर राहू शकले नाहीत. पण त्यांचे व देशवासीयांचे स्वप्न साकार करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ही भाजपाच्या वाटचालीतील फार मौल्यवान वैभवशाली घटना आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वर्षे काँग्रेस हाच पक्ष सर्वत्र सत्तेवर दिसत होता. या पक्षाला आव्हान देण्याचे काम सर्वप्रथम अडवाणी यांनी केले व त्यांच्या हिंदुत्वाच्या अजेंडाने देशाचे चित्रच बदलले. काँग्रेसला पर्याय भारतीय जनता पक्ष आहे हे आज सारा देश अनुभवतो आहे, पण त्याची पेरणी अडवाणी यांच्या राम रथयात्रेने झाली होती. जनसंघ किंवा भाजपा यांच्या उभारणीत अडवाणी व वाजपेयी यांचे फार मोठे योगदान आहे. वाजपेयी हे सर्वसमावेश नेतृत्व होतेच, पण त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने देशातील जनतेला मंत्रमुग्ध केले होते. अडवाणी हे कुशल संघटक आहेत. दूरदृष्टीचे नेते आहेत. वाजपेयी-अडवाणी या जोडीने काँग्रेसला पराभूत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. काही वेळा समाजवादी विचारसरणीच्या पक्षांबरोबर युती करून निवडणुका लढवल्या. जय-पराजयाची पर्वा न करता मतविभाजनाचा लाभ काँग्रेसला मिळू नये याची दक्षता घेतली. अडवाणी हे १९७० मध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले, त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून बघितले नाही. इंदिरा गांधींनी १९७५ मध्ये आणीबाणी लादली, त्यानंतर देशातील विरोधी नेत्यांची जेलमध्ये रवानगी झाली. अडवाणी हे बंगळूरुच्या जेलमध्ये होते. १९७७ मध्ये आणीबाणी उठली नि प्रमुख विरोधी पक्षांनी जनता पक्ष स्थापन केला, त्यात जनसंघही सामील झाला. नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात जनता पक्षाचे सरकार आले व अडवाणी यांच्यावर माहिती व प्रसारण खात्याची जबाबदारी देण्यात आली. जनता पक्षात मतभेद झाल्याने जनसंघ बाहेर पडला आणि १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापन झाली. या सर्व निर्णय प्रक्रियेत अडवाणी यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. १९८९ मध्ये अडवाणी लोकसभेवर प्रथमच खासदार म्हणून निवडून आले. दिल्ली व गुजरात अशा दोन्ही ठिकाणाहून ते सतत जिंकत राहिले. तब्बल सात टर्म ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले. १९९२ मध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यावर भाजपाला इतर पक्ष टाळू लागले होते. पण वाजपेयींसारखा सर्वमान्य व सर्वसमावेशक नेता मदतीला आला.

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अटलबिहारी वाजपेयी हे भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा करणारे अडवाणींच होते. त्यांच्या घोषणेने अनेकांना सुखद धक्का बसला. केंद्रात वाजपेयी यांचे पहिले सरकार तेरा दिवस, दुसरे सरकार तेरा महिने व तिसऱ्यांदा पूर्ण टर्म टिकले. त्यांच्या सरकारमध्ये अडवाणी हे उपपंतप्रधान, गृहमंत्री म्हणून नंबर २ होते.

सन २००४ लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. केंद्रातील सत्ता गमवावी लागली. नंतर वाजपेयी यांची प्रकृतीही त्यांना साथ देईना. दरम्यान, अडवाणी यांनी केलेल्या पाकिस्तान दौऱ्यात मोहम्मद अली जीना यांच्याविषयी गौरवोद्गार काढल्याने देशातील हिंदुत्ववादी नाराज झाले. अडवाणी यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. सन २००९ ची निवडणूक भाजपाने अडवाणींच्या नेतृत्वाखाली लढवली, पण भाजपाने मोठा मार खाल्ला. भाजपाचे ११६ खासदार निवडून आले, तर काँग्रेस पक्षाचे २०६ खासदार विजयी झाले. नंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचा हळूहळू राष्ट्रीय क्षितीजावर उदय झाला. अडवाणी यांचे प्रथम लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद गेले. २०१९ ला त्यांना पक्षाने उमेदवारीही दिली नाही, त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून पक्षाने मोदींची सुरुवातीला केंद्रीय प्रचार समितीचे समन्वयक व नंतर पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड केली. मोदी केंद्रात आल्यानंतर अडवाणी यांची पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात रवानगी झाली. आता वयोमानाने ते घराबाहेर पडू शकत नाहीत. पत्रकारांना नेहमी वेळ देऊन भेटणारे व दिलखुलास बोलणारे अडवाणी यांनी मुलाखती देणे केव्हाच बंद केले आहे. मात्र देशाच्या राजकारणाला नवीन दिशा देणाऱ्या या भिष्माचार्यांना ‘भारतरत्न’ देऊन मोदी सरकारने त्यांच्या योगदानाची सर्वोच्च पावती दिली आहे.

Add comment