Lokvijay

इस्कॉन व्हीईसीसी वर पुष्प अभिषेक महोत्सव जल्लोषात साजरा

इस्कॉन-वैदिक शिक्षण आणि सांस्कृतिक केंद्र (इस्कॉन-व्हीईसीसी) च्या वतीने पुष्प अभिषेक महोत्सवाचे रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 ला सायंकाळी 6.00 वाजता श्री श्री राधा-निकुंजबिहारी व श्री श्री सीताराम नवनिर्माणाधीन मंदिर, इस्कॉन-व्हीईसीसी, वरुड फाटा,जालना रोड येथे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी 6.00 वाजता “हरे कृष्ण” किर्तनाने महोत्सवास सुरुवात झाली. उत्सवासाठी श्री जगन्नाथ (श्रीकृष्णावतार), बलदेव व सुभद्रेच्या अर्चाविग्रहांना(मूर्तींना) सुंदर फुलांनी सुशोभित वस्त्र परिधान केल्या गेले, शिवाय फुलांचे हार व आभूषणांनी विशेष श्रुंगार करण्यात आला होता. मंचाला केळीच्या पानांनी तसेच विविध फुलांनी सजविण्यात आले होते.

भगवंताना छप्पन भोग अर्पण करण्यात आल्यानंतर संध्याआरती करण्यात आली. त्यानंतर श्रीमान डॉ. गोपालकृष्ण प्रभू(मुंबई) द्वारा पुष्प अभिषेक महोत्सव संबंधित कथेचे सुंदर निरुपण करण्यात आले.
त्यानंतर हरे कृष्ण कीर्तनाच्या साथीत अर्चाविग्रहांचा(मूर्तींचा) 350 किलो फुलांच्या पाकळ्यांचा अभिषेक करण्यात आला. यासाठी स्थानिक तसेच पुणे, जालना, जळगाव वरून झेंडू, शेवंती, गुलाब, बिजली, निशिगंध, कुंदाकळी, केवडा, ऑर्किड, गलांडा, जरबेरा अशी फुले मागविण्यात आली होती.
सकाळी 9.00 वाजेपासून “हरे कृष्ण” महामंत्राचे श्रवण करीत 100 हून अधिक भक्तांनी फुलांच्या पाकळ्या काढण्यास सुरुवात केली. १५ महिला भक्तांच्या चमूने अर्चविग्रहांचे फुलांनी सजवलेले वस्त्र, हार व आभूषण बनविले.

अभिषेक नंतर 15 भक्तांच्या चमूने मृदंग,टाळ, पेटी, बासरी अशा पारंपारिक व आफ्रिकन ड्रम, झांच अशा आधुनिक वाद्यांच्या साथीने “हरे कृष्ण” नृत्य किर्तनात भक्तांना न्हावू घातले. अभिषेक घातलेल्या पाकळ्यांची प्रसाद म्हणून सर्वांवर उधळण करण्यात आली. त्यानंतर इस्कॉन-वैदिक शिक्षण आणि सांस्कृतिक केंद्र (इस्कॉन-व्हीईसीसी) अंतर्गत चालणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती देण्यात आली. तसेच श्री श्री राधा-निकुंजबिहारी व श्री श्री सीताराम मंदिराच्या निर्माणकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. श्रीमान डॉ. रोहीणीप्रिय प्रभूंच्या मार्गदर्शनाखाली 100 भक्तांनी महोत्सवाच्या यशस्वितेसाठी सेवा दिली. या सर्व भक्तांचे इस्कॉन-व्हीईसीसी मंदिर निर्माण समितीद्वारे आभार प्रकट करण्यात आले. शेवटी सर्व भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. 1200 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास मीना,
जे जे प्लस संचालक डॉ. जीवन राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

Add comment