Lokvijay
blank

जावास्क्रिप्ट तयार झाली आणि.. इंटरनेट ला बहार आली..

इंटरनेट ही काय चीझ आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर, एखादा शाळकरी विद्यार्थी किंवा त्याची म्हातारी आजी सुद्धा सहज देऊ शकेल. आज आपण कित्येक वेबसाइट्स वरची माहिती अगदी घरी बसल्या मिळवतो. आपण सहज एखादा ब्राउज़र (गवेशक) उघडतो आणि ही माहिती आपल्याला मिळते. ही माहिती मुळात आपल्या पर्यंत ज्या तंत्रा मुळे पोहोचते, त्याचे मुख्यतः ४ घटक केले जातात. ते म्हणजे – एचटीटीपी हा प्रोटोकॉल, आणि – एचटीएमएल, सीएसएस, आणि जावास्क्रिप्ट ह्या भाषा. अगदी सुरुवातीला म्हणजे साधारण १९८९-९० च्या सुमारास टीम-बर्नर्स ली यांनी वर्ल्ड वाइड वेब तयार केलं. १९९० साली पहिला वेब बेस्ड क्लायंट-सर्वर प्रोग्राम त्यांनी लिहिला. आणि इंटरनेट चा प्रसार सुरू झाला. पण खऱ्या अर्थांने इंटरनेट ला बहार आली ती जावास्क्रिप्ट ह्या भाषे मुळेच. ह्याच जावास्क्रिप्ट ची ही गोष्ट.

म्हणजे! झालं असं.. की सुरुवातीला इंटरनेट वर नुसतीच शाब्दिक माहिती वाचता येत असे. एका काळ्या पांढऱ्या पडद्यावर शब्दाक्षरांचा वापर करून ही माहिती आपल्याला ब्राउज़र वर दिसत असे. हा पहिला ब्राउज़र बनवला होता टीम-बर्नर्स ली यांनी. ह्या ब्राउज़र चं नाव होतं – वर्ल्ड वाइड वेब (नेक्सस). मग १९९३ साली लिंक्स नावाचा एक ब्राउज़र बाजारात आला. आणि त्यानंतर लगेचच, अजून एका कंपनीने त्यांचा स्वतःचा ब्राउज़र बाजारात आणायचं ठरवलं. ह्या कंपनीचं नाव होतं – नेटस्केप. नेटस्केप ने त्यांच्या पहिल्या ब्राउज़र ला नाव दिलं – मोज़ेक. १९९४ साली, बाजारात आलेल्या ह्या – मोज़ेक – ब्राउज़र ची खासियत काय होती? तर आता शब्द आणि अक्षरांच्या जोडीला इमेज म्हणजेच, चित्रं सुद्धा आपल्या सारख्यांना, ह्या ब्राउज़र चा वापर करुन बघता येऊ लागली. पण नेटस्केप चे मार्क अँड्रीसन यांनी त्या पुढे जाऊन ह्या ब्राउज़र मध्ये अजून सुधारणा करायच्या. असं ठरवलेलंच होतं. मग, त्या अनुषंगाने, आपला ब्राउज़र अधिक लोकप्रिय करायचा असेल, तर आपल्याला हा ब्राउज़र, प्रोग्रामेबल करावा लागेल. म्हणजेच सर्वर वरून आलेल्या माहितीशी संबंधित असलेला एखादा मजकूर जर वीडियो किंवा ऑडियो स्वरूपात उपलब्ध असेल, तर तसा मजकूर देखील, ब्राउज़र वर दाखवता येण्याची क्षमता आपल्या मोज़ेक मध्ये आणावी लागेल. तेव्हाच मोज़ेक – ह्या आपल्या ब्राउज़रची – मागणी अधिक वाढेल. अशी मार्क यांची खात्रीच होती.

हे मार्क यांनी ठरवलं. आणि तशी प्रोग्रामिंग भाषा तयार करण्यासाठी म्हणून एक टीम उभी केली. ह्या टीम चा म्होरक्या होता – ब्रेंडन ईच. ब्रेंडन नुकतेच नेटकेप मध्ये दाखल झालेले होते. हा काळ होता एप्रिल १९९९. म्हणजे नेटस्केप चा आयपीओ यायच्या काही महिने आधी. नेटस्केप चा आयपीओ आला १९९३ च्या ऑगस्ट महिन्यात. आयपीओ यायच्या आधी आपली क्लायंट साइड प्रोग्रामिंग लँग्वेज तयार झालीच पाहिजे हे उदिष्ट समोर ठेवून ब्रेंडन कामाला लागले.

सुरुवातीला त्यांची नेमणूक झाली होती नेटस्केप मधल्या सर्वर प्रोग्रामिंग करणाऱ्या टीम मध्ये. पण आता ब्राउज़र वर प्रोग्रामिंग करण्याची सॉय करायची म्हणजे क्लायंट-साइड प्रोग्रामिंग लँग्वेज तयार करायला लागणार. हे ब्रेंडन च्या लक्षात आलं. मग तश्या भाषेचा शोध त्यांनी घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी स्कीम नावाची एक भाषा उपलब्ध होती. ही भाषा आपण नेटस्केप मध्ये टाकावी. असा विचार ब्रेंडन यांनी केला. पण त्याच सुमारास नेटस्केप आणि सन माइक्रोसिस्टिम्स यांच्यात बोलणी चालू होती. म्हणून, मग सन च्याच जावा वर आधारित एक भाषा नेटस्केप मध्ये असावी असा आग्रह नेटस्केप मधल्या वरिष्ठांनी धरला.

जावा ही भाषा चालवायला म्हणून, जावा व्हर्चुअल मशीन (जेव्हीएम) नावाची एक यंत्रणा वापरावी लागत असे. पण ब्राउज़र मध्ये जेव्हीएम टाकलं तर ब्राउज़र डाऊनलोड करायला आणि ते जेव्हिएम चालवायला बरीच मेमरी खर्च करावी लागेल हे हेरून, मग जावा सारखीच, पण लिहायला आणि वापरायला सोपी अशी भाषा आपण तयार करावी असा ब्रेंडन यांचा निर्णय पक्का झाला.

आता अजून एक समस्या ब्रेंडन यांच्या समोर उभी होती. ती म्हणजे, ब्राउज़र मध्ये आपल्याला जो मजकूर दिसतो तो एचटीएमएल ह्या भाषेत लिहिलेला असतो. मग हा एचटीएमएल मधला प्रोग्राम वाचून त्यात आपला जावास्क्रिप्ट चा प्रोग्राम कसा चालवायचा? हा विचार ते करू लागले. हा विचार करीत असतांनाच त्यांना एक युक्ती सुचली. ती म्हणजे जर आपण हे एचटीएमएल मधले प्रोग्राम वाचले आणि तेच प्रोसेस करुन त्यात जावास्क्रिप्ट चा आपला प्रोग्राम चालवू शकलो तर ही समस्या सुटू शकेल. मग त्यांनी काय केलं? तर एचटीएमएल मध्ये एक सोय होती. ती म्हणजे कमेंट टाकायची. म्हणजे एखाद्या प्रोग्रामर ला त्याने काय उद्देशाने प्रोग्राम तयार केलाय हे साध्या इंग्रजीत लिहायचं असेल तर ही कमेंट ची सुविधा प्रोग्राम लोक वापरायचे.

हेच कमेंट वापरून सुरुवातीला जावास्क्रिप्ट चे प्रोग्राम एचटीएमएल मध्ये घुसडायचे असा विचार त्यांनी केला. आणि तब्बल १० दिवसात जावास्क्रिप्ट चा एक इंटरप्रिटर तयार झाला. आता हा इंटरप्रिटर उपलब्ध झाल्या मुळे काय झालं? तर एचटीएमएल असलेल्या ब्राउज़र वरच्या माहितीशी आता आपल्याला खेळता येऊ लागलं. म्हणजे आता एखादा फॉर्म तयार करुन ती महिती वाचकाला कशी वाटली? हे हा फॉर्म वापरुन आपल्याला कळवण्याची सोय झाली.

पुढे जाऊन ब्रेंडन यांनी अजून एक गंमत केली ती म्हणजे एचटीएमएल मधलेच जे घटक होते त्यात जावास्क्रिप्ट चे प्रोग्राम चालवायच्या सूचना द्यायच्या अशी सोय केली. ह्या मुळे तो एचटीएमएल प्रोग्राम नुसता वाचनीय नं राहता, आता त्या एचटीएमएल शी आपल्याला इंटरॅक्ट करता येऊ लागलं. म्हणजे आपण एखाद्या लिंक वर नुसता आपला माउस नेला की त्या लिंक शी जोडलेलं पान आपल्याला दिसू शकेल अशी सुविधा निर्माण झाली. हे खरं पहाता एक मुलभूत असं काम होतं. म्हणजे एचटीएल सारख्या प्रोग्राम मध्ये दुसरा प्रोग्राम घालून, तो चालवून, एका नव्या प्रोग्रामिंग परिभाषेचा चमत्कार ब्रेंडन यांनी करून जगाला दाखवला. ह्याला पुढे इव्हेंट बेस्ड प्रोग्रामिंग असं संबोधलं जाऊ लागलं. असो!

अजून एक गोष्ट, ब्रेंडन यांना साध्य करायची होती. ती म्हणजे एचटीएमएल मधले व्हिडीओ आणि ऑडियो कॉंटेंट ब्राउज़र मध्ये दाखवायचे होते. मग नेटस्केप नी मॅक्रोमीडिया नावाच्या एका कंपनी शी करार केला. मॅक्रोमीडिया ही कंपनी त्याकाळी ब्राउज़र साठी प्लगइन बनवत असे. त्यांनी नेटस्केप साठी फ्लॅश प्लेअर नावाचा, एक असा प्रोग्राम लिहिला की तो वापरुन आता ब्राउज़र मधल्या काँटेंट ला व्हिडीओ आणि ऑडियो चं नवं रूप देता येणं शक्य झालं. सुरुवातीला हे प्लगइन वापरून व्हिडिओ आणि ऑडियो काँटेंट नेटस्केप मध्ये साकार झाले.

पण हे प्लगइन चालवायला सुद्धा बरीच मेमरी लागत असे. म्हणून मग एचटीएमएल मध्येच सुधारणा करुन त्यात व्हिडीओ आणि ऑडियो दाखवण्याची सोय झाली तर खूप छान होईल. असा विचार करून एचटीएमएल वाल्यांनी नंतर एचटीएमएल मध्येच सुधारणा करुन प्लगइन नं वापरता व्हिडिओ-ऑडियो काँटेंट दिसू शकेल अशी सोय त्यात आणली. असो!

ह्या दरम्यान, नेटस्केप नी अजून एक घोषणा केली. ती म्हणजे जावास्क्रिप्ट भाषा स्टँडर्डाईझ करायची. त्यासाठी म्हणून, युरोपियन कॉम्प्युटर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन (एकमा) ह्या संस्थेला एक पेपर सादर केला. तो एकमा वाल्यांनी मान्य केला. आणि जावास्क्रिप्ट ही भाषा सर्वमान्य अशी भाषा म्हणून जगा समोर आली. आता मात्र सगळ्याच ब्राउज़र मध्ये जावास्क्रिप्ट असणं गरजेचं होऊन गेलं. मग काय विचारता हो! त्याकाळी प्रचलित असलेल्या सगळ्याच ब्राउज़र वाल्यांनी जावास्क्रिप्ट ला सपोर्ट करायचं असा निर्णय घेतला. मग इंटरनेट एक्सप्लोरर पासुन ते ऍपल च्या सफारी पर्यंत सगळ्याच ब्राउज़र मध्ये जावास्क्रिप्ट नुसतीच समाविष्ट झाली नाही तर जावास्क्रिप्ट ला अढळ असं स्थान ह्या ब्राउज़र मध्ये मिळालं.

२००९ साली अजून एक चमत्कार झाला. रयान डाल नावाच्या एका तरुणाने २७ मे २००९ या दिवशी जावास्क्रिप्ट वापरून एक प्रोग्राम तयार केला. ह्याला नाव दिलं नोड जेएस. हा प्रोग्राम म्हणजे प्रत्येक ब्राउज़र मध्ये असलेल्या जावास्क्रिप्ट रनटाईम ला वेगळं करुन वापरता येईल अशी सोय असलेला प्रोग्राम होता. ह्यामुळे काय झालं? तर आता पर्यंत फक्त क्लायंट साइड प्रोग्रामिंग साठी वापरली जाणारी जावास्क्रिप्ट आता सर्वर साईड प्रोग्राम लिहायला म्हणून सज्ज झाली. म्हणजे आता आमच्या सारख्या प्रोग्राम लिहिणाऱ्याला जर जावास्क्रिप्ट येत असेल, तर असा प्रोग्रामर संपूर्ण वेबसाइट चा प्रोग्राम लिहिण्यासाठी उपयोगी, म्हणून सिद्ध झाला. म्हणजेच जावास्क्रिप्ट आता सर्वसमावेषक भाषा झाली.

पुढे जाऊन मग एकमा वाल्यांनी जावास्क्रिप्ट ला नवं नाव दिलं. नवीन स्टँडर्डाईझ्ड रुपात एकमा-स्क्रिप्ट या नावाने जावास्क्रिप्ट मध्ये अनेक सुधारणा झाल्या. जावा स्क्रिप्ट चे चाहाटे जगभरात वाढू लागले.

२६ ऑगस्ट २००६ साली, जॉन रेसिग या तरुणाने जेक्वेरी नवाची एक नवीन लायब्ररी जावास्क्रिप्ट मध्ये लिहून सज्ज केली. ह्यामुळे जावास्क्रिप्ट प्रोग्राम लिहिणं सोपं झालं. जावास्क्रिप्ट चे प्रोग्राम आता छोटे होऊ लागले.

ह्यात गूगल च्या जर्मनी मधल्या एका टीम ने काही प्रोग्रामर लोकांना बरोबर घेऊन अँग्युलर जेएस नवाचं एक जावास्क्रिप्ट वर आधारित फ्रेमवर्क तयार केलं. फेसबुक मधली एक टीम २०१३ साली एकत्र आली आणि त्यांनी जावास्क्रिप्ट वर आधारित अजुन एक लाइब्रेरी तयार केली – रिएक्ट जेएस – नावाची. ह्यामुळे जावास्क्रिप्ट सतत समृद्ध होतंच राहिली.

२०२० साली स्टॅक ओव्हरफ्लो नावाच्या एका संस्थेनी जाहीर केलेल्या प्रोग्रामिंग लँग्वेज च्या सर्व्हे अनुसार, जगातली सगळ्यात जास्त लोकप्रिय भाषा म्हणून जावास्क्रिप्ट ला नंबर १ भाषा म्हणून मानाचं स्थान दिलं. अजून २ वर्षांनी म्हणजेच ४ डिसेंबर २०२५ साली जावास्क्रिप्ट ३० वर्षांची होईल. एकूण काय? आज तब्बल २८ वर्ष होऊन सुद्धा जावास्क्रिप्ट ही भाषा जगन्मान्य भाषा म्हणून नाव टिकवून आहे. आज इंटरनेट ला इंटरॅक्टिव्ह करण्यात जावास्क्रिप्ट ला खऱ्या अर्थाने यश आलंय.

जावास्क्रिप्ट ने खऱ्या अर्थाने इंटरनेट च्या वापरात एक बहार आणलिये. आज आपण वापरत असलेल्या सोशल मीडिया च्या ऍप मध्ये सुद्धा जावास्क्रिप्ट चा वापर सढळ हसते होतोय. आपण वापरत असलेल्या ब्राउज़र पासून ते सोशल ऍप पर्यंत जावास्क्रिप्ट चा दरवळ सतत आपल्यापर्यंत पोचतोय. अश्या वेळेस आठवण होते ती बसंत बहार ह्या चित्रपटातल्या मन्ना डे आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या एका गाण्याची. ह्या गाण्यात ते म्हणतात..

केतकी, गुलाब, जूही, चम्पक बन फूले
ऋतु बसन्त, अपनो कन्त गोरी गरवा लगाए
झुलना में बैठ आज पी के संग झूले
केतकी, गुलाब, जूही, चम्पक बन फूले

गल-गल कुंज-कुंज, गुन-गुन भँवरों की गूंज
राग-रंग अंग-अंग, छेड़त रसिया अनंग
कोयल की पंचम सुन दुनिया दुख भूले
केतकी, गुलाब, जूही, चम्पक बन फूले

मधुर-मधुर थोरी-थोरी, मीठी बतियों से गोरी
चित चुराए हँसत जाए, चोरी कर सिर झुकाए
शीश झुके, चंचल लट गालन को छू ले
केतकी, गुलाब, जूही, चम्पक बन फूले

संगणक उद्योगात डिसेंबर हा महिना बजेटिंग चा महिना म्हणून राखीव असतो. अनेक संगणक कंपन्या, पुढल्या वर्षी नवीन काय सुधारणा करायच्या ह्याचा विचार करुन त्यासाठी लागणाऱ्या बजेट ची व्यवस्था करुन ठेवतात. आपापल्या सॉफ्टवेअर प्रॉडक्ट मध्ये नवीन फीचर्सची बहार आणण्याचे मसूदे तयार करतात. मनशक्ती सारख्या संस्था, आज, ३१ डिसेंबर सुद्धा विधायक पद्धतीने कसा साजरा करता येऊ शकतो? हे सगळ्यांना तसा तो नेमाने साजरा करुन दाखवून देतायत. मग आपण तरी का म्हणून मागे राहायचं म्हणतो मी!

येत्या नवीन वर्षात आपल्या ही हातून काही तरी लोकोपयोगी आणि विधायक व्हावं. हा हेतू मनाशी पक्का करुयात आणि एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत, आज इथेच थांबूयात.


केदार दातार 

Add comment