Lokvijay

अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

डॉ. अभय मंडलिक

मराठीतील रंगभूमी, चित्रपटसृष्टी, आणि टेलिव्हिजन या सर्व माध्यमातून स्वतःच्या भूमिकांचा ठसा उमटवणाऱ्या अशोक सराफ यांचा महाराष्ट्र शासनाने शासनाचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण देऊन त्यांच्या कलाक्षेत्रातील कार्याचा गौरव केला आहे.

या पुरस्काराबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून जाणत्या कलाकारांनी त्यांचे कौतुकही केले आहे. ४ जून १९४७ या वर्षी जन्मलेल्या अशोक सराफ यांनी हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी,नाटयसृष्टी त्यांच्या बहुआयामी भूमिकांनी गाजविलीआहे.

विजया मेहता यांच्या हमीदाबाईची कोठी या नाटकात त्यांची भूमिका पूर्णपणे वेगळी होती आणि ती ते अतिशय समरसुन करत असत. या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रीयन प्रेक्षक असलेल्या भारतातील सर्व गावांमधून प्रवास केलेला आहे.

१९८० च्या दशकात सचिन पिळगावकर ,लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्यासोबत अनेक धमाल विनोदी मराठी चित्रपटातून कायम लक्षात राहतील अशा पद्धतीच्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. धुमधडाका, अशी ही बनवाबनवी, गंमत जंमत, एक डाव भुताचा,ही त्यांच्या काही चित्रपटांची नावे आहेत. वयाच्या 18 व्या वर्षी ययाती आणि देवयानी या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. याव्यतिरिक्त प्रेमा तुझा रंग कसा, व्हॅक्युम क्लिनर, हसत खेळत, एक उनाड दिवस, मनोमिलन, लगीन घाई, इत्यादी १२ नाटकातून विविध भूमिका केल्या आहेत.
चित्रपट सृष्टीची सुरुवात त्यांनी जानकी या चित्रपटातून १९६९ साली केली. पुढे राम राम गंगाराम, पांडू हवालदार या दादा कोंडके यांच्या चित्रपटातून त्यांच्या भूमिका अत्यंत लक्षवेधी स्वरूपाच्या होत्या. हा कलाकार आपल्यापेक्षा चांगला अभिनय करतो हे लक्षात आल्यामुळे दादा कोंडके यांनी त्यांच्या नंतरच्या कोणत्याही चित्रपटात त्यांना भूमिका दिल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

Add comment