Lokvijay

मोबाईल जनरेशन

मोबाईल असे हा निव्वळ आभास, खरी नसे ही दुनिया आहे हा केवळ भास…!!

अरे तुझं काय चाललंय? डोकं फिरलय का? बाथरूममध्ये कुठे मोबाईल घेऊन जातोस? घरातील आयांचं रोज कानावर पडणारं हे वाक्य! खरंतर मोबाईल मुळे संपूर्ण जगच बदललं आहे. जवळजवळ सर्वच मुलं , मुली या मोबाईल फोनची अॕडिक्ट झाल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे घरोघरी पालकांमधील संताप वाढत आहे. पालक व मुलांमधील दरीही वाढलेली दिसत आहे. मोबाईल दिला नाही म्हणून काही मुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्याही आपण पेपरमध्ये वाचल्या आहेत. मोबाईलचे व्यसन मुलांना नैराश्याच्या खाईत झोकत आहे. मोबाईलचा स्क्रीन टाईम प्रचंड वाढलेला आहे. ऑनलाइन गेमच्या जाळ्यात तरुणाई सापडल्यासारखी दिसत आहे.

मुले आता फेसबुक , व्हॉट्सअपवर या सोशल मीडियावर सापडत नाहीत. ते आता इंस्टाग्राम , स्नॅपचॅट, टिंडर, टेलिग्राम या नवीन ॲपवर दिसतात. जिथे मोठ्यांची, पालकांची गर्दी वाढते ,(उदा.व्हाट्सअप,फेसबुक) तेथून मुले आपोआप पळ काढतात. मुलांना नाविन्याची ओढ असते. सध्याचं युग हे प्रचंड उलथापालथीचं आहे. जगात प्रचंड वेगाने बदल होत आहेत. ग्लोबलायझेशन मुळे हाकेच्या अंतरावर जग आलेलं आहे. टू जी, थ्री जी, फोर जी आता फाय जीचा जमाना सुरू आहे. संपूर्ण जग एका क्लिकवर दिसत आहे. चॅट जीपीटी सारखे एआय टुल मुलांना मोबाईलवर उपलब्ध आहे. मोबाईल म्हणजे अलीबाबाची गुहा झालेली आहे. माहितीचा कल्पवृक्ष म्हटला तरी हरकत नाही. या मोबाईलवरच्या सोशल साईटवर फक्त माहिती मिळत आहे, ज्ञान मिळत नाही. त्यामुळे वस्तुस्थिती, खरेपणा, सत्यता यावर आधारितच ही माहिती असेल याचा काही भरवसा नाही.अविश्वसनीय माहितीमुळे समाजामध्ये प्रचंड गैरसमज पसरवले जात आहेत समजत तेढ निर्माण होत आहे. तपासणी न करता माहिती पाठवणाऱ्याला व्हाॕट्सअॕप युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे का? अशी अवहेलना केली जाते.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या मदतीने डमी इमेजेस, डमी व्हिडिओ बनवले जात आहेत. खरे काय, खोटे काय याचा कोणताही फरक आपल्याला लक्षात येत नाही. सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या बातम्या, असत्य माहिती याची तपासणी करून यावर लागलीच लगाम घालणारी कोणतीही यंत्रणा अद्याप अस्तित्वात आलेली नाही.

अनेक तरुण मुले-मुली एकलकोंडी झालेली आपणाला आढळतात. ते घरात उपस्थित असूनही त्यांचं घरात अस्तित्व जाणवत नाही. त्यांचं विश्वच वेगळं झालेलं दिसतं. चार तरुण- तरुणी एकत्र आल्यानंतर हाय, हॅलो झाल्यावर ते सर्वजण आपापल्या मोबाईल मध्ये व्यस्त होतात. मनोरंजन हे आता त्यांच्या हातात आलेलं आहे. मनोरंजनाचा चॉईसही त्यांच्याच हातात आहे. काय पहावं काय नको हे ते क्षणात ठरवू शकतात. मात्र मोबाईलवर अथवा सोशल मीडियावर होणारे मनोरंजन हे समाधान देणार नसतं. ते ताण वाढवणारं असतं. जास्तवेळ मोबाईलच्या अथवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर बसलेली मुलं ही मानसिकरित्या अस्वस्थ होतात. तासनतास बसल्यामुळे एक प्रकारची मरगळ निरुत्साह त्यांच्यात आलेला असतो. त्यामुळे अनेक आयटी कंपन्यांच्या समोर, कॉर्पोरेट कंपन्यांच्या समोरच्या टपऱ्यांवर, कॅफे हाऊस मध्ये अनेक तरुण – तरुणी सिगारेटचे झुरके मारताना आपल्याला आढळतात. आयटी क्षेत्र अथवा कार्पोरेट क्षेत्रातील अनेक तरुण-तरुणी विकेंड साठी शहराबाहेर गेलेली आढळतात व त्या ठिकाणी अनेक व्यसनांच्या आधीन होऊन जातात. आपला थकवा ते निसर्गाच्या सानिध्यात जाऊन घालविण्याचा प्रयत्न करतात. परंतु तो थकवा क्षणात घालविण्यासाठी त्यांना अल्कोहोल अथवा सिगारेट, ड्रग्स ही जवळची साधनं वाटतात. हीच मुलं बार किंवा पबमध्ये बेधुंद झालेली ही आपणाला आढळतात.

अनेक मानसोपचार तज्ञांच्या मते मुला- मुलींचा स्क्रीन टाईम वाढल्यामुळे अनेक प्रश्न मुलांच्या आयुष्यात निर्माण झालेली आहेत. या तणावामुळे मुला- मुलींना आपल्या नातेवाईकांची अथवा घरच्यांशी फारशी गरज वाटत नाही. त्यांचं जगच वेगळं होऊन गेलेलं असतं.

मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांना डोळ्यांचे व कानांचे आजार झालेले आढळतात. मोबाईल मुळे अनेक छोट्या मुलांना चष्मा वापरावा लागत आहे. चष्म्याचा नंबरही प्रचंड वेगाने वाढत जाताना आढळतो. अनेक मुलांनी सारखेच इयरफोन वापरल्यामुळे त्यांचा कानाचा पडदाही फाटलेला आहे. काही मुलांना ऐकायलाही कमी येत आहे. तर काहींना बहिरेपणही आलेला आहे. जास्त मोबाईलचा वापर केल्यामुळे अथवा संगणकावर बोटांचा वापर केल्यामुळे अनेक मुलांच्या बोटांचा आकार बदललेला आपणाला माहित आहे. रात्री उशिरापर्यंत जागणं आणि सकाळी उशिरापर्यंत झोपणं ही तरुणांची लाईफस्टाईल झाली आहे. रस्त्यावर अथवा कामाच्या ठिकाणी मोबाईल मुळे अनेक तरुणांचे अपघात झालेले आहेत. त्यांना अपंगत्वही आलेलं आहे.

मोबाईल डिवाइस वरून सतत माहितीचा मारा होत असतो. सततचे नोटिफिकेशन मेसेजेस आणि माहितीचा ओव्हरलोड हा सतत अस्वस्थ करीत असतो. या सगळ्या गोष्टी, चिंता, तणाव, राग व नैराश्य वाढविण्यासाठी कारणीभूत ठरते. हे तरुणाईवर झालेलं मोठं आक्रमण आहे. हे आक्रमण कसे परतवावे याचा विचार पालक करत आहे. मोबाईल फोन हा सध्याच्या जगाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. त्यामुळे मोबाईल पासून तर आपण दूर जाऊ शकत नाही. या मोबाईलच्या माहितीचा सदुपयोग करता यायला हवा. पालकांनी मुलांच्या समोर मोबाईल वापरण्याचा मोह टाळावा. मुलांना जास्त वेळ इतर कार्यात कसं व्यस्त ठेवता येईल याचाही विचार करावा. मोबाईल फोन मधून जर ब्रेक घेतला तर आपला मानसिक गोंधळ कमी होण्यास मदत होते. मोबाईल जर दूर ठेवला तर मनाला, डोळ्याला, मेंदूला आराम आणि डिस्चार्ज करण्याची संधी मिळत असते. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर हा अनिवार्य आहे. जगाशी संपर्कात राहण्याचा, जगाशी जोडून घेण्याचा याच्या इतका सुलभ कोणताही मार्ग नाही. या मोहोजालातून बाहेर काढण्यासाठी आपणाला नवीन मार्ग शोधावे लागतील. ज्यामध्ये मुलांची मानसिक भूक व गरज भागवली जाऊ शकेल. मुलांच्या आयुष्यात कर्तुत्व सिद्ध करण्याचं, नवं काहीतरी करण्याचं वय निघून जाईल. माहितीचा मारा इतका प्रचंड आहे की काही मिनिटापूर्वी आलेली बातमी पुढच्या क्षणी शिळी होत आहे. भारतात जवळपास 60 कोटी लोकसंख्या ही तरुणांची आहे. इतकी मोठी संख्या जर मोबाईल व सोशल मीडियावर कार्यरत असेल. तर भारताचे नवनिर्माण कसं होईल. सशक्त, सुदृढ पिढी आपण कशी निर्माण करू शकु. मानसिक दृष्ट्या कमजोर असलेली, माहितीच्या जंजाळात फसलेली, तणावग्रस्त तरुणाई भारताचे खरंच भविष्य उज्वल करू शकेल का? खरंच हा प्रश्न साकल्याने विचार करून उत्तर शोधण्यास प्रवृत्त करणारा आहे यात शंका नाही !!

लेखक : जालिंदर देवराम सरोदे

Add comment