संजीव वेलणकर
मुंबई शेअर बाजार (बीएसई) आशियातील सर्वात जुने स्टॉक मार्केट. मुंबईला भारताची आर्थिक राजधानी बनवण्यामागे मुंबई शेअर मार्केटचा मोठा वाटा आहे. ९ जुलै १८७५ रोजी मुंबई शेअर बाजारची स्थापना झाली, तेव्हा शेअर बाजाराचं नाव होतं ‘द नेटीव शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स’. १९ व्या शतकात उद्योगपती प्रेमचंद रॉयचंद हे ‘द नेटीव शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स’ चे संस्थापक सदस्य होते. प्रेमचंद हे त्याकाळी ‘कॉटन किंग’ या नावाने प्रसिद्ध होते.’द नेटीव शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स’ ची सुरूवात २५ शेअर दलालांनी अवघ्या एका रुपयात केली होती. या असोसिएशनने दलाल स्ट्रीटवरील अॅडव्होकेट ऑफ इंडिया या इमारतीचा एक मजला भाड्याने घेतला होता. त्यावेळी या जागेचे भाडे दरमहा १०० रुपये होते. १९९० मध्ये ‘नॅशनल शेअर बाजार’ ची (एनएसई) स्थापना झाल्यानंतर बीएसईचे महत्त्व कमी होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र नंतरच्या काळातही या ठिकाणाहून होणारा व्यापार कमी झाला नाही. त्यामुळे अजूनही इथल्या ‘सेन्सेक्स’ वर परदेशी गुंतवणूकदारांची बारीक नजर असते. या ठिकाणी सर्वाधिक ५५०० हून अधिक कंपन्यांनी नोंदी केल्या आहेत. हा आकडा जगभरातील भांडवली बाजारांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मुंबई शेअर मार्केटला जगातील सर्वात वेगवान स्टॉक एक्स्चेंज मानले जाते. बीएसईचा वेग ६ मायक्रो सेकंद आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्स्चेंजच्या यादीत मुंबई शेअर मार्केट १० व्या स्थानी आहे. बीएसईची बाजारातील एकूण गुंतवणूक १५८ लाख कोटी रुपयांची आहे. ISO ९००१-२००० चे सर्टिफिकेट मिळालेले बीएसई हे भारतातील पहिले व जगातील दुसरे स्टॉक एक्स्चेंज आहे. लिस्टेड कंपन्यांच्या बाबतीत मुंबई शेअर बाजार (बीएसई) हे आशियात व जगात सर्वात अग्रस्थानी आहे.
👍