Lokvijay

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल, तलवारबाजी स्पर्धा, दि.२८ पासून विभागीय क्रीडा संकूल येथे आयोजन

छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):- राष्ट्रीय शालेय सॉफ्ट बॉल व राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धांचे आयोजन विभागीय क्रीडा संकूल येथे करण्यात येणार आहे. शालेय सॉफ्ट बॉल स्पर्धा दि.२८ जानेवारी ते दि.१ फेब्रुवारी या दरम्यान तर राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन दि. ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान होणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी दिली आहे.

यास्पर्धांच्या आयोजनासाठी अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ.प्रदीप तळवेलकर, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव गोकुळ तांदळे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, मनपा क्रीडा अधिकारी संजीव बालय्या आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल (१९ वर्षे मुले व मुली) क्रीडा स्पर्धा दि.२८ जानेवारी ते दि.१ फेब्रुवारी या कालावधीमध्ये विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर येथे निश्चित केल्या आहेत. या स्पर्धेत संपूर्ण देशातील २५ राज्यातून किमान ९०० ते १००० खेळाडू, प्रशिक्षक ,मार्गदर्शक, अधिकारी व पंच उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन सोमवार दि.२९ जानेवारी रोजी सायंकाळी पालकमंत्री संदिपान भूमरे, पालकमंत्री व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांच्या पारितोषिक वितरणास क्रीडा मंत्री संजय बनसोडे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार तसेच मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, असे श्री.देसाई यांनी सांगितले.

राष्ट्रीय शालेय तलवारबाजी (१७ वर्षे मुले व मुली) क्रीडा स्पर्धा मंगळवार दि.६ते१० फेब्रुवारी या कालावधीमध्ये विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहेत. या स्पर्धेत देशातील ७०० खेळाडू, प्रशिक्षक ,मार्गदर्शक, अधिकारी व पंच उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन दि.७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

खेळाडुंचा सत्कार

जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग घेवून प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा व गतवर्षिच्या शिवछत्रपती पुरस्कारार्थींचा सत्कार करण्यात येणार असून त्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू : तेजस पाण्डेय – सॉफ़्टबॉल,ईश्वरी शिंदे- सॉफ़्टबॉल,अक्षय बिरादार- सॉफ़्टबॉल, सृष्टी काळे- बॉक्सिंग,श्रध्दा चोपडे- ज्युदो,अदिती निलंगेकर- जलतरण, अभय शिंदे – तलवारबाजी, निखील वाघ – तलवारबाजी,वैदेही लोहीया- तलवारबाजी,रोहन शहा – तलवारबाजी, तेजस पाटील – तलवारबाजी, श्रेयस जाधव – तलवारबाजी, तुषार आहेर- तलवारबाजी, दुर्गेश जहागिरदार – तलवारबाजी
शिवछत्रपती पुरस्कारार्थी :विनय साबळे – तलवारबाजी, वैदेही लोहिया-तलवारबाजी, अभय शिंदे – तलवारबाजी, आदित्य जोशी– जिम्नॅस्टिक्स, ऋग्वेद जोशी- जिम्नॅस्टिक्स, सिद्धार्थ कदम- जिम्नॅस्टिक्स इ.
या स्पर्धांच्या आयोजनाचा क्रीडाप्रेमी, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Add comment