Lokvijay

पवारांचे भोजन निमंत्रण नाट्य

बारामती येथे दोन मार्च रोजी होणाऱ्या शासकीय कार्यक्रमास माननीय मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम ज्या शिक्षणसंस्थे च्या प्रांगणात होणार आहे ,त्याचे माननीय शरद पवार हे अध्यक्ष आहेत, आणि अध्यक्ष या नात्याने त्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचे निमंत्रण दिले आहे. सर्वसाधारणपणे भोजनाचे निमंत्रण हे व्यक्तिगत असल्यामुळे खाजगीरीत्या देण्यात येते.

मात्र राजकारणाचे मुकुटमणी असलेल्या शरद पवारांनी हे निमंत्रण योग्य पद्धतीने समाज माध्यमांवर येईल याची गेल्या दोन दिवसापासून काळजी आणि खात्रीही केली आहे! सामान्यतः वृत्तपत्रांना अशा प्रकारच्या बातम्यांमध्ये नेहमीच स्वारस्य असते आणि त्यामुळे चौकटीमध्ये या निमंत्रण संदर्भातील बातम्या वृत्तपत्रात येणे ही बाब फारशी आश्चर्याची नाही.

या बातमीच्या निमित्ताने वेगवेगळे राजकीय तर्ककुतर्क, तसेच या निमंत्रणाचे वरवरचे आणि गर्भित अर्थ काढणे राजकीय पातळीवर सुरू आहे. लोकशाहीमध्ये हे अपेक्षितही आहे. सध्या ज्या पद्धतीने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या बातम्या या राजकीय दृष्ट्या सनसनाटी ठरू शकतात.

देशाच्या लोकशाही परंपरेचा विचार केल्यास गावात गेल्यानंतर पक्षाचा विचार न करता त्या गावातील प्रमुख राजकीय व्यक्तींच्या घरी जाऊन भेट घेणे (आणि नंतर ही भेट राजकीय स्वरूपाची नव्हती असे जाहीर करणे हे )सर्वसामान्य आहे. अनेकदा राजकीय दृष्ट्या कट्टर मते असलेले राजकारणी परस्परांकडे भोजनासाठी जाणे ही देशातील राजकीय परंपरा आहे आणि यात काहीही वावगे नाही. व्यक्तिगत संबंध हे राजकारणापासून पूर्णपणे वेगळे असतात आणि असावेत. राजकीय मत भिन्नता असली तरी मनभेद नसावे असे लोकशाहीचे तत्व सांगते.
अशा प्रकारच्या डिनर डिप्लोमसीची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत.

खुल्या आणि योग्य वातावरणात राजकीय मते बाजूला ठेवून देशाच्या विकासासाठी चर्चा करणे हे समृद्ध लोकशाहीचे उदाहरण आहे आणि त्यामुळे या भोजन निमंत्रणाचा कोणताही राजकीय अर्थ न काढता हे निमंत्रण म्हणजे भारतीय अतिथ्यशील परंपरेचा भाग आहे असे समजून या पद्धतीचे संबंध दृढ व्हावेत अशी आशा करावी.
लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतर प्रचाराच्या निमित्ताने होणाऱ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर या प्रकारची बिगर राजकीय भोजने ही लोकशाहीचे उत्तम उदाहरण ठरू शकते. माननीय शरद पवार यांच्या भोजन निमंत्रणाचे अन्य अर्थ काढण्या ऐवजी अतिथ्यशील परंपरेचा तो भाग आहे एवढाच त्यातून अर्थ काढणे सोयीचे ठरेल.

डॉ. अभय मंडलिक

Add comment