Lokvijay

संत गजानन महाराज प्रगट दिन

श्री संत गजानन महाराज अद्भुत दैवी शक्ती. श्री संत गजानन महाराजांची महिमा अपरंपार आहे ही बाब सर्वांनाच ग्यात आहे.त्यामुळेच त्यांना ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज असे संबोधले जाते.कारण त्यांची महिमा संपूर्ण ब्रम्हांडात प्रचलित असल्याचे दर्शविते. आज जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तर आपल्या लक्षात येईल की भारतात महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. कारण महाराष्ट्रात अनेक थोर संत,महात्मे झालेत त्यातलेच संत गजानन महाराज आहेत.आपल्याला गजानन महाराजांचे अनेक चमत्कार दिसून येतात.त्याचप्रमाणे संपूर्ण भारतात शांततेचे प्रतिक म्हणून शेगावचे गजानन महाराजांचे मंदिर व तेथील परिसर प्रसिद्ध आहे.

संत गजानन महाराज माघ वद्य ७ शके १८००(दिनांक २३ फेब्रुवारी १८७८) रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे तारूण्याअवस्थेत प्रगत झालेत.आज संपूर्ण भारतात श्री संत गजानन महाराजांमुळे महाराष्ट्रातील शेगाव हे गाव प्रसिध्दीस आले.साधू देविदास पातूरकरांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्राळीतील अन्नाचे कण वेचून खात होते व गाईगुरांकरीता पिण्यासाठी ठेवलेले पाणी पिऊन निघून गेले.ते पुढे बार्शी येथील ब्रम्हनिष्ठ श्रीगोविंद महाराज टाकळीकर यांचे शेगावी महादेवाच्या मंदिरात कीर्तन झाले. त्याप्रसंगी टाकळीकरांच्या बेफाम असलेल्या घोड्यांच्या चौपायांत श्री गजानन महाराज हे ब्राह्मानंदी निमग्न होऊन निजलेले आढळले परंतु तुफान घोडा शांत झाला. अशाप्रकारे तुफान घोड्याला गजानन महाराजांनी शांत केले.तत्काळ गोविंदमहाराजांनी संत गजानन महाराजांची योग्यता ओळखुन भक्तीभावाने पूजा केली व त्यांची महती शेगाव निवासी लोकांना सांगितली. तेव्हापासुनच संत श्री गजानन महाराजांची प्रसिद्धी झाली.यानंतर महाराजांचे अनेक चमत्कार लोकांना दिसून आले.

बंकटलाल अग्रवाल यांना गजानन महाराज प्रथमच दिसले असता “गण गण गणात बोते” असे उच्चारत त्यांचे भजन नेहमीच सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांना गजानन महाराज ही अद्भुत शक्ती असल्याचे लक्षात आले व गण गण गणात बोते हा जाप सर्वांच्याच हृदयात बसला व गजानन महाराजांची महीमा संपूर्ण शेगावी पसरली.कारण गजानन महाराज ही दैवी शक्ती होती आणि आहे.गजानन महाराजांचे अनेक चमत्कार आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या रूपात पहायला मिळतात.महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख नावाच्या गृहस्थ मरणोन्मुख स्थितीतुन बरे झाले.अनेक भक्तांना साक्षात पांडुरंगाचे दर्शन गजानन महाराजांनी घडविले.गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिध्दकोटीला पोहचलेले महान संत होते. त्यांची दिनचर्या अशा पध्दतीची होती की वाटेल ते खावे, कोठेही पडुन रहावे व कोठेही संचार करावा अशा पध्दतीने ते रहात असे.एकेवेळी तर एका स्त्रीने मिर्चीचा वाटलेला मोठा गोळा खायला दिला तो गोळा त्यांनी मोठ्या आनंदाने खाल्ला जनुकाय पेढे-बर्फी खातात याप्रमाणे खाल्ला व लोटाभर पाणी पिऊन तृप्त झाले गण गण गणात बोते असे अहर्निश भजन उच्चारत निघून गेले.

गजानन महाराजांच्या मुखातून नेहमीच “गण गण गणात बोते” या शब्दांचे उच्चारण व्हायचे त्यामुळे संपूर्ण भक्तगण श्री संत गजानन महाराज म्हणुन संबोधु लागले.गजानन महाराजांची अपार महिमा पाहून लोक त्यांना बहुमोल वस्त्रे, अलंकार,पैसे, खाद्य पदार्थ अर्पण करीत.परंतु हे सर्वच तेथेच टाकून निघून जात असे. मुख्यत्वेकरून भक्तांना व जनतेला गजानन महाराजांच्या सहवासाने मन:शांति मिळे व त्यांच्या ईश्वरलिलेमुळे सर्व भक्तगण प्रसन्न रहात.आजही महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात श्री संत गजानन महाराजांची पुजाअर्चना मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने साजरी केली जाते.त्याच अनुषंगाने दरवर्षी माघ कृष्णपक्ष सप्तमीला श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.यावर्षी माघ कृष्णपक्ष सप्तमीला दिनांक ३ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने गजानन महाराजांचा १४६ वा प्रगट दिवस साजरा होत आहे.

दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी शेगाव वरून संत गजानन महाराजांची पालखी जात असते व पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होतो.कारण गजानन महाराजांनी विठ्ठल रूपी अनेकांना दर्शन दिले आहे.दररोज शेगावला हजारोंच्या संख्येने वेगवेगळ्या भागातुन भाविक श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात. त्याचप्रमाणे याठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.कारण महाराष्ट्रासह अनेक राज्यातुन महाराजांचे दर्शन करण्यासाठी मोठा जनमुदाय येत असतो अशा प्रकारे श्री संत गजानन महाराजांची लीला अपरंपार असल्याचे आपल्याला दिसुन येते.महाराष्ट्रात घरोघरी गजानन महाराजांची पुजाअर्चना करून भक्तीभावाने संत गजानन महाराजांचा गजर करतात व आपली मनोकामना पूर्ण करतात. त्याचप्रमाणे प्रगट दिनाच्या निमित्ताने अनेक गावांत,शहरात मोठ्या प्रमाणात भजण, किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते व आपल्याला सर्वत्र संत गजानन महाराजांचा गजर ऐकायला मिळतो.संत गजानन महाराज हे महान संत होऊन गेले त्यामुळे त्यांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होणे गरजेचे आहे.कारण दिवसेंदिवस जंगलसंपदा नष्ट होतांना आपण पहातो. परंतु प्रगट दिनाच्या निमित्ताने फुल-नाही-फुलांची- पाकळी म्हणून सर्वांकडून वृक्षारोपण व्हायला हवे.कारण जंगल तोडीमुळे संपूर्ण निसर्गाचे संतुलन डगमगतांना दिसत आहे व हे सर्व आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत.

याचाच परिणाम आपल्यालाच नाही तर संपूर्ण जीवसृष्टीला भोगावा लागतो आहे.आपण निसर्गाचे संतुलन व्यवस्थित ठेवले नाही तर सुनामी, भूकंप,वनवालागने, समुद्राची पातळी वाढणे,अती थंडी,अती उष्णता,अती पाऊस,भुस्खणन याला मोठ्या प्रमाणात उफान येवु शकते व यामुळे मानवास,पशु-पक्षी, जीवजंतू यांची मोठी हानी होवू शकते.याकरीता आज निसर्गाला वाचविण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज आहे.आपण व संपूर्ण भक्तगणांनी श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने वृक्षलागवड केली तर निसर्ग प्रफुल्लित राहिल व प्रत्येक झाडांच्या पानात,फुलात, फळात आपल्याला गजानन महाराजांचे दर्शन अवश्य होईल.कारण गजानन महाराजांचे संपूर्ण जीवन हे झाडांच्याच सानिध्यात रहाले आहे.वृक्षलागवडीमुळे गुरांना चारा व संपूर्ण जीवसृष्टीला ऑक्सिजन व सावली मिळेल.यातच आपल्या साक्षात संत गजानन महाराज अवश्य दिसून येईल व आपण केलेल्या कार्याचे सार्थक अवश्य दिसून येईल.त्यामुळे भक्तांना आग्रहाची विनंती आहे की प्रगट दिनाच्या निमित्ताने जास्तीत जास्त वृक्षारोपण व्हावे या दृष्टिकोनातून पाऊल उचलण्याची नितांत गरज आहे.श्री संत गजानन महाराजांच्या १४६ व्या प्रगट दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!जय गजानन महाराज!

रमेश कृष्णराव लांजेवार

Add comment