मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाबाबत महिला, युवांच्या भावना
विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर, दिनांक 23 (विमाका) : ‘मी रोजगार मागणारा नव्हे, तर देणारा झाल्याने मला आत्मिक समाधान आहे. आज मीच सात-आठ जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या व्यवसायातून मला जवळपास पंधरा लाख रूपये वार्षिक उत्पन्न मिळते’ असे अभिमानाने सांगत होते बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील मूर्ती गावचे रामेश्वर फड. निमित्त होते आज लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय महारोजगार मेळाव्याचे. याच मेळाव्यात इतर विविध योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर झालेल्या युवक-युवतींनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
रामेश्वर यांनी चित्रकारिता (पेंटिंग) व्यवसायासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 10 लाखांचे कर्ज घेतले. त्यातून आर्ट गॅलरी सुरु केली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे मला प्रोत्साहन मिळाले. मी स्वत: उद्योजक बनलो, याचे समाधान आहेच. इतरांनीही या व अशा शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे, असे मला वाटते.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना विभागीय नमो महारोजगार मेळावा कार्यक्रमात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभ देण्यात आले. या कार्यक्रमानंतर लाभार्थ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. हा कार्यक्रम बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर पार पडला.
लातूरच्या औसा तालुक्यातील शिवणी बु. येथील लिंबराज माने यांनीही लातूर येथे अलायन्मेंट अँड वॉशिंग सेंटर उभारले. यासाठी त्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून कर्ज मिळाले. त्यातून स्वत:चा व्यवसाय त्यांनी सुरु केला. आपल्या हाताला काम मिळण्याबरोबरच मला इतरांच्या हाताला काम देता आले, याचा आनंद आहे. व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन तरूणांनी अशाच पद्धतीने पुढे जायला हवे, असे माने म्हणाले.
सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या संगीता बरुरे यांनी मोबाइल टॉयलेट या व्यवसायास पसंती दर्शवत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडून प्रशिक्षण घेतले. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत त्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जवळपास साडेपाच लाख रूपयांचे कर्ज घेतले. त्यातून अभिनव असा हा व्यवसाय सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. कमी शिक्षण असतानाही इतरांसमोर माझा आदर्श निर्माण होत असल्याने मला अभिमान वाटत आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ प्रत्येकाने घ्यायला हवा, असेही त्या म्हणाल्या.
बीएस्सी झालेल्या लातूरच्या वसवाडीतील शीतल भिसे म्हणाल्या, मी झेरॉक्स, स्टेशनरी, मल्टीसर्व्हिसेसचा व्यवसाय सुरु केला. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मला एसबीआय बँकेकडून 4 लाख 68 हजारांचे कर्ज मिळाले. आता सर्व खर्च वजा जाता मला दरमहा 20 हजार रुपये उत्पन्न मिळते आहे.
जनाधार सेवाभावी संस्थेचे प्रकल्प प्रमुख नंदकुमार बिजलगावकर म्हणाले की, त्यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 70 ई-व्हेईकल (कचरा वाहून नेणारी वाहने) घेऊन प्रत्येक महिलेस एक याप्रमाणे ई-व्हेईकल दिले. त्यामधून लातूर शहरातील कचरा वेचणाऱ्या महिलेस दरमहा 18 हजार रुपये उत्पन्न मिळते. यातून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग प्रशस्त् झाला आहे. या महिलांपैकी एकता टेंकाळे यांनी पूर्वी 5 ते 6 हजार रुपये मिळत होते. परंतु या इ-व्हेईकलमुळे 18 हजार रुपये मिळत असल्याने समाधानी असल्याची भावना व्यक्त केली.
ग्रामीण जीवनोन्नती, प्रधानमंत्री मुद्रा योजनाही फलदायी
लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ येथील ज्ञानेश्वरी मुंडे यांचा स्वयंसहायता बचतगटाच्या माध्यमातून लोणचे, मसाले, पापड याचा उद्योग आहे. ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून त्यांना बँकेने 3 लाख 10 हजारांचे कर्ज दिले. त्यांच्या व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांनी या उद्योगातून इतर दोन महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. शासनाने त्यांना अनुदानही दिले आहे. यासाठी त्यांनी शासनाचे आभार मानले आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून 7 लाख 37 हजार रुपयांचे कर्ज घेऊन चाकूर तालुक्यातील सुगावच्या 25 वर्षीय प्रेमानंद शिंदे यांनी क्लिनिकल पॅथालॉजी लॅब सुरु केली. याबाबत त्यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, मी आता स्वावलंबी आहे याचा मला खूप अभिमान आहे.
Add comment