लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे, तशी भारतीय जनता पक्षाकडे येणाऱ्यांची रांग वाढत चालली आहे. २०२४ ची निवडणूक भाजपाच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. ‘अबकी बार चार सौ पार’ अशी घोषणा भाजपाने दिली आहे. म्हणूनच भाजपाची विचारधारा व मोदींचे नेतृत्व मान्य आहे, त्यांच्यासाठी पक्षाने दरवाजे खुले ठेवले आहेत. महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आता अशोक चव्हाण, उत्तर प्रदेशमधून जयंत चौधरी, बिहारमधून नितीश कुमार एनडीएच्या तंबूत येऊन दाखल झाले आहेत. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, वायएसआर काँग्रेसचे जगन मोहन रेड्डी आणि पंजाबमधील अकाली दलाचे नेतेही भाजपा श्रेष्ठींच्या संपर्कात आहेत. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची हॅटट्रिक करणार व त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार येणार असे देशात वातावरण आहे. दुसरीकडे भाजपाविरोधी इंडिया आघाडीची रोज शकले पडत आहेत म्हणूनच भविष्याचा विचार करून भाजपाकडे येणाऱ्यांची गर्दी वाढत चालली आहे.
भारतीय जनता पक्षाची स्थापना दि. ६ एप्रिल १९८० रोजी झाली. अगोदरच्या जनसंघाला खूप मर्यादा होत्या. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर १९८४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा लाटेपुढे विरोधी पक्षांचा साफ धुव्वा झाला. त्या निवडणुकीत भाजपाचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. काँग्रेसचे ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आले व राजीव गांधी हे पंतप्रधान झाले.
दिल्लीमध्ये १९८४ मध्ये झालेल्या धर्म संसदेत विश्व हिंदू परिषद व संघ परिवारातील संघटनांनी राम जन्मभूमी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला. १९८९ च्या पालमपूर अधिवेशनात भाजपाने राम मंदिराचा मुद्दा आपल्या अजेंडावर घेतला, तेव्हापासून राजकीय पटलावर भाजपाचा आलेख उंचावत राहिला. नंतरच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे ८५ खासदार निवडून आले. राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपाची लोकप्रियता वाढू लागली. १९९०मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या रथयात्रेने ‘मंदिर वही बनाऐंगे’ अशी घोषणा दिली. १९९१ च्या मध्यावधी निवडणुकीत भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत दुप्पट वाढ तर झालीच, त्याचबरोबर पक्षाचे १२० खासदार निवडून आले. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली आणि १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने प्रथमच काँग्रेसला मागे सारले. या निवडणुकीत भाजपाचे १६१ खासदार विजयी झाले, तर काँग्रेसचे १४० खासदार निवडून आले होते. त्यानंतर प्रथमच केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले. तेव्हा भाजपाला स्पष्ट बहुमतही नव्हते. १९९६ मध्ये वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केवळ तेरा दिवस सरकार चालले, नंतर १९९८-९९ मध्ये तेरा महिने सरकार चालले, त्यानंतर मात्र १९९९ ते २००४ असे एनडीएचे सरकार पाच वर्षे चालले. २००४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने फील गुड या मुद्द्यांभोवती प्रचार केंद्रित केला होता. पण मतदारांना तो भावला नाही आणि भाजपाला केंद्रातील सत्ता गमवावी लागली.
येत्या लोकसभा निवडणुकीत मोदी की गॅरंटी आणि राम मंदिर हे मुद्दे भाजपाच्या प्रचारात आघाडीवर असतील. मोदींचे नेतृत्व व मोदींची देशभर असलेली उत्तुंग लोकप्रियता हे तर भाजपाचे हुकमी कार्ड आहे. मोदींना लोकसभा निवडणुकीत जवळपास पर्याय नाही, त्यांना आव्हान देणारा विरोधी पक्षात दुसरा नेता नाही. म्हणूनच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी देशातील अन्य पक्षांतील बरेच नेते भाजपाशी जमवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत किंवा थेट भाजपामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत.
सन १९९६ च्या निवडणूक जाहीरनाम्यात भाजपाने म्हटले होते, ‘आपला पक्ष सत्तेवर आल्यानंतर अयोध्येत राम मंदिर उभारले जाईल…’ त्या निवडणुकीत भाजपाचे १६१ खासदार निवडून आले. १९९८ च्या निवडणूक जाहीरनाम्यातही भाजपाने म्हटले होते – अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे. त्या वर्षी निवडणुकीत भाजपाचे १८२ खासदार निवडून आले. सन २००४ च्या निवडणूक जाहीरनाम्यात भाजपाने राम मंदिराच्या मुद्द्यावर सौहार्दपूर्ण प्रयत्नाने तोडगा काढू व न्यायालयाचा निर्णय सर्वांना स्वीकारावा लागेल असे म्हटले होते. त्या निवडणुकीत भाजपाचे १३८ खासदार विजयी झाले आणि सत्ता गमवावी लागली. २००९ च्या जाहीरनाम्यात देश-विदेशातील लोकांची अयोध्येत भव्य भव्य राम मंदिर व्हावे अशी इच्छा आहे, असा उल्लेख होता. तेव्हा भाजपाचे ११६ खासदार निवडून आले. २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचाराची सूत्रे नरेंद्र मोदींच्या हाती होती. त्यांच्या आश्वासक भाषणांतून त्यांनी मतदारांची मने जिंकली. सर्वांगीण विकासाचे आश्वासन आणि काँग्रेसने केलेला भ्रष्टाचार यावर त्यांनी मतदारांना नवभारताचे स्वप्न दाखवले. त्या निवडणुकीत भाजपाचे २८२ खासदार निवडून आले. चार दशकांनंतर लोकसभेत प्रथमच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळविण्याचा चमत्कार मोदींनी करून दाखवला. मोदींनी केलेले विकासाचे काम, मोदींनी जगात भारताची उंचावलेली प्रतिमा, सामान्य गरिबांसाठी त्यांच्या घरापर्यंत पोहोचविलेल्या विकास योजना यामुळे २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे ३०३ खासदार निवडून आले. आता २०२४ मध्ये भाजपाने ३७० खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
येत्या निवडणुकीत राम मंदिराबरोबरच ‘मोदी की गॅरंटी’ हा मुद्दा भाजपाला भरघोस यश मिळवून देईल, असा आत्मविश्वास पक्षाच्या नेत्यांना आहे. येत्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार येणार हे विरोधी पक्षांनाही चांगले ठाऊक आहे. पण भाजपाला यावेळी विक्रमी विजय मिळवायचा आहे. अगोदरच्या विजयापेक्षा जास्त संख्येने आपले व एनडीएचे खासदार निवडून आणायचे आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी २८ जानेवारीला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व राजद-काँग्रेसपासून ते वेगळे झाले. याच नितीश कुमार यांनी गेल्या सात-आठ महिन्यांपासून भाजपाच्या विरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला होता, इंडिया आघाडी स्थापन करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांना इंडियाचे निमंत्रक व्हायचे होते व इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून मिरवायचे होते. प्रत्यक्षात काँग्रेस व अन्य घटक पक्षांकडून त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. आता भाजपा विरोधकांना एकत्र आणणारा प्रमुख नेताच एनडीएमध्ये परतला, त्यामुळे बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकणे भाजपाला शक्य होणार आहे. लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर असताना नितीश कुमार यानी इंडियाला सोडून एनडीएकडे परत येणे हा फार मोठा धक्का भाजपा विरोधकांना आहे. दीड वर्षांपूर्वीच नितीश कुमार यांनी राजद-काँग्रेसशी हातमिळवणी केली. खरे तर त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक भाजपाशी युती करून लढवली होती व भाजपा-जनता दल युनायटेडने मिळून बिहारमध्ये ३९ जागा जिंकल्या होत्या. आता पुन्हा भाजपा व नितीश कुमार हातात हात घालून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
दिवंगत पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न जाहीर झाल्यावर त्यांचे नातू जयंत चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनीही लगेचच एनडीएकडे वाटचाल सुरू केली. पश्चिमी उत्तर प्रदेशात लोकसभेच्या २७ जागा असून १८ टक्के लोकसंख्या जाट आहे. चौदा मतदारसंघात जाटांचा प्रभाव आहे. राष्ट्रीय लोकदलामुळे या सर्व जागा भाजपा-एनडीएला मिळू शकतील असे गणित आहे. आंध्र प्रदेशात तेलुगू देसम व वायएसआर काँग्रेस हे दोन्ही पक्ष एनडीएमध्ये येण्यास उत्सुक आहेत. चंद्राबाबू नायडू व वायएस जगन मोहन रेड्डी हे भाजपा श्रेष्ठींच्या संपर्कात आहेत. दक्षिण भारतात लोकसभेच्या १३१ जागा आहेत. त्यातील भाजपाकडे केवळ २९ जागा आहेत. भाजपाने यापूर्वी कधीही न जिंकलेल्या दक्षिणेतील ८४ जागांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. केरळ, आंध्र प्रदेश व तामिळनाडूत मात्र भाजपाची मोठी कसोटी आहे. गेल्या वेळी कर्नाटकात भाजपाने २५ जागा जिंकल्या होत्या. यावेळी तेथे काँग्रेसचे सरकार आहे. म्हणून कर्नाटकातील जागा कायम ठेवणे हे भाजपापुढे आव्हान आहेच.
राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून भाजपाचा उत्साह गगनाला जाऊन भिडला आहे. दुसरीकडे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा चालू असूनही काँग्रेसमध्ये नैराश्य आहे. काँग्रेसमधील दिग्गज नेते पाठोपाठ बाहेर पडून भाजपाच्या छावणीत सामील होत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला गळती लागली आहे. जम्मू-काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे ३७० कलमाचे कवच मोदी सरकारने काढून घेतल्यामुळे व अयोध्येतील राम मंदिरामुळे विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजपाकडे आकर्षित होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक वेगाने वाढणारा पक्ष म्हणून भाजपाचा हा सुवर्णकाळ आहे.
Add comment