Lokvijay
स्टेटलाइन – काका विरुद्ध पुतण्या… : डॉ. सुकृत खांडेकर

स्टेटलाइन – काका विरुद्ध पुतण्या… : डॉ. सुकृत खांडेकर

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मालकी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे आली आणि वयाच्या ८३व्या वर्षी शरद पवार यांना नवा पक्ष उभारण्यासाठी व त्याची बांधणी करण्यासाठी पुन्हा राज्यभर वणवण करण्याची पाळी आली. निवडणूक आयोगाच्या निकालाला शरद पवार यांच्या गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहेच, पण त्यामुळे एका बाजूला कायदेशीर लढाई चालूच राहील व दुसऱ्या बाजूला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ या बॅनरखाली जनतेसमोर जावे लागणार आहे.

शरद पवार यांनी त्यांच्या साठ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात पक्षातील व बाहेरील त्यांच्या विरोधकांना अनेकदा आव्हाने दिली, त्यांना नको असणारी सरकारे उलथवली. ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांनाच बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली. काँग्रेस पक्षात असताना बंडखोरी करून हायकमांडला अनेकदा आव्हान दिले, वेळोवेळी सत्ताधाऱ्यांशी त्यांनी जुळवूनही घेतले. गेली सहा दशके महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या शरद पवारांना त्यांचेच पुतणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षावर कब्जा मिळवून मोठा हादरा दिला आहे. पक्षातील भल्याभल्यांना जे कधी जमले नाही, कधी सुचले नाही, ते अजित पवार यांनी करून दाखवले व ज्यांनी त्यांना राजकारणात आणून सत्तेच्या पदांवर बसवले, त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव आणि त्यांचे चिन्ह घड्याळ त्यांच्याकडून हिसकावून घेतले. अजित पवार यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला.

महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये स्थापन केलेली शिवसेना व शरद पवार यांनी १९९९ मध्ये स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रादेशिक पक्ष असले तरी त्यांची शक्ती कोणालाही दुर्लक्ष करता येत नव्हती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वात जास्त १०६ आमदार भाजपाचे निवडून आले होते, दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे ५६ आमदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ व काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले. राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार स्थापन व्हावे, असाच जनादेश होता. पण देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचे नाही व भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचे या मुद्द्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेस पक्ष एकत्र आले. महाआघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवार यांनी कामगिरी बजावली. सत्तावाटपाच्या सौदेबाजीत उद्धव यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले. जनादेश धुडकावून ज्यांनी मतदारांशी व भाजपाशी दगाबाजी केली, त्यांची आज अवस्था काय झाली आहे? शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाले, नेतृत्व बदलले. ज्यांनी त्या पक्षात बंड केले ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेत जून २०२२ ला बंड झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै २०२३ मध्ये बंडाचा झेंडा फडकला. सर्वाधिक आमदार व जनादेश असतानाही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या शरद पवार व उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षांत महाआघाडीची सत्ता गमवावी लागलीच, दोन्ही नेत्यांना त्यांचे पक्ष गमवावे लागले, निवडणूक चिन्हही त्यांच्या हाती राहिले नाही. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांत फूट पडली नाही. अजित पवार किंवा एकनाथ शिंदे हे दुसऱ्या कोणत्या पक्षात गेले नाहीत. मात्र पक्षाच्या नेतृत्वाविरोधात असंतोष व नाराजीचा स्फोट झाल्यावर सर्वाधिक आमदार, खासदार व पदाधिकारी हे बंडात सामील झाले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या वागणुकीला व मनमानीला कंटाळून पक्षाचे आमदार, खासदार बाहेर पडले, हेच ते वारंवार सांगत आहेत. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडे चाळीसपेक्षा जास्त आमदार आहेत. अपक्षांची साथ विचारात घेतली, तर दोघांकडे प्रत्येकी पन्नास आमदार आहेत. या सर्व आमदारांना पुन्हा निवडून आणणे हे त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. भाजपा सर्वशक्तिनिशी एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या पाठीशी उभा आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खिळखिळे करण्याचे मिशन पूर्ण झाले आहे. यापुढे एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाची कसोटी असणार आहे.

शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सोनिया गांधींच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावर त्यांनी काँग्रेस पक्षात असताना बंडाचा झेंडा फडकवला व त्यांचा पंतप्रधानपदाकडे जाण्याचा मार्ग रोखला. शरद पवार यांना त्यावेळी तारीक अन्वर व पी. ए. संगमा यांनी साथ दिली होती. अमर, अकबर, अँथोनी असे मीडियामध्ये या तिन्ही बंडखोरांना संबोधले जात होते. काँग्रेसने दिल्लीत बोलविलेल्या विशेष अधिवेशनात या तिघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यावर त्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्याच वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने २२३ जागा लढवल्या व ५८ जिंकल्या. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात तिसऱ्या क्रमांकावर होता. विशेष म्हणजे निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसबरोबर आघाडी करून राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी झाली. तेव्हापासून राष्ट्रवादीने महत्त्वाची खाती आपल्याकडेच ठेवली. केंद्रातही २००४ ते २०१४ या काळात (विदेशी जन्माचा मुद्दा बाजूला ठेवून) काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली होती. स्वत: शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांनी केंद्र सरकारमध्ये महत्त्वाची खाती संभाळली. महाराष्ट्रात सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने १२४ जागा लढवल्या व ७१ जिंकल्या. सन २००९ मध्ये राष्ट्रवादीचे ६२ आमदार विजयी झाले. १९९९ मध्ये लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ खासदार होते, २००४ व २००९ मध्ये दोन्ही वेळा नऊ खासदार निवडून आले. २०१४ व २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे केवळ चार खासदार लोकभेवर निवडून गेले. सन २००० मध्ये निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा दिला, पण २०२३ मध्ये तो काढून घेतला.

२५ वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक चढउतार आले. २००२ मध्ये केरळमध्ये, २००४ मध्ये मेघालय व छत्तीसगडमध्ये तेथील गट बाहेर पडले. २०१२ मध्ये संस्थापक संगमा स्वत: बाहेर पडले व त्यांनी नॅशनल पीपल्स पार्टी स्थापन केली. स्वत: शरद पवार हे १९६७ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर कधीच त्यांनी मागे वळून बघितले नाही. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून त्यांनी जनसंघ, समाजवादी, शे. का. प., डावे पक्ष यांना बरोबर घेऊन पुलोदचे सरकार स्थापन केले व १८ जुलै १९७८ रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हा महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. राज्याचे चार वेळा ते मुख्यमंत्री झाले, पण एकदाही त्यांना पाच वर्षांची संपूर्ण टर्म पूर्ण करता आली नाही. राजकीय जीवनात त्यांनी वेगवेगळ्या पाच चिन्हांवर निवडणुका लढवून विजय प्राप्त केला. बैलगाडी, चरखा, गाय-वासरू, पंजा, घड्याळ अशा चिन्हांवर त्यांनी निवडणुका लढवल्या. अजित पवार हे अत्यंत महत्त्वाकांक्षी नेते आहेत. राज्याचे मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होणे अशी त्यांची महत्त्वाकांक्षा आहेच. सन २००४ मध्ये शरद पवार हे केंद्रात होते, राज्यात राष्ट्रवादीचे ७१ व काँग्रेसचे ६९ आमदार निवडून आले. पण काकांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुतण्याचा विचार केला नाही किंवा तशी सौदेबाजी काँग्रेसशी केली नाही. सन २०१९ मध्ये महाआघाडी सरकार येण्यापूर्वीच अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांच्याबरोबर गेलेल्या पक्षाच्या आमदारांवर कारवाई करू, अशी धमकी शरद पवारांनी दिल्यानंतर अजितदादा माघारी फिरले. दि. २ मे २०२३ रोजी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. पण त्या जागी त्यांनी अजितदादांना संधी द्यावी, असा विचार केला नाही. उलट १० जून २०२३ रोजी पक्षाच्या २५व्या वर्धापन दिनाला प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे यांची पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याचे त्यांनी जाहीर केले. पक्षात आपल्याला काहीही भवितव्य नाही हे अजित पवारांच्या लक्षात आले व त्यांनी आपल्या काकांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले. महाराष्ट्रातील विधानसभेचे ४१ व विधान परिषदेतील ५ आमदार अजित पवारांबरोबर आहेत. नागालँडमधील ७, झारखंडमधील १, आमदारही अजितदादांबरोबर आहे. लोकसभेतील दोन व राज्यसभेतील एक खासदार अजित पवारांच्या पाठीशी आहे. आमदार-खासदार अशा ८१ लोकप्रतिनिधींमधील ५७ जणांनी अजित पवार यांना साथ दिली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीनंतर मातोश्रीच्या हातून शिवसेना निसटली, शरद पवारांच्या डोळ्यांदेखत राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पुतण्याने पळवली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर असताना शिवसेनेत काहीतरी घडते आहे, असे सांगून शरद पवारांनी त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच पवारांना आपल्या पक्षात एवढे बंड होऊन आपण स्थापन केलेला पक्षच हिसकावून घेतला जाईल, याची थोडीशी तरी कल्पना आली नव्हती का?

Add comment