रघुनंदन भागवत
महाभारतात कुरुक्षेत्रावरील कर्ण आणि अर्जुन यांच्यातील युद्धात कर्णाच्या रथाची चाके जमिनीत रुततात तेव्हा कर्ण स्वतः रथातून खाली उतरून ती चाके वर काढण्याचा प्रयत्न करू लागला. पण अर्जुनाने मात्र त्याच्यावरील शरसंधान थांबवले नाही. त्यावेळी कर्णाला धर्माची आठवण झाली आणि त्याने अर्जुनालाही युद्धाच्या नियमांची आठवण करून दिली. त्यावेळी कृष्णाने इतिहासाचा दाखला देत कर्णाच्या /कौरवांच्या पापांचा पाढा वाचला व कर्णाला विचारले की राधासुता तेव्हा कोठे गेला होता तुझा धर्म.
आजच्या अर्वाचिन युगात महाराष्ट्रातील/देशातील राजकारणात अशा अनेक कौरवाना आता धर्माची आठवण होऊ लागली आहे. यातील महत्वाचे पात्र म्हणजे शरद पवार. नुकतेच शरद पवार यांचे एक विधान वाचनात आले. लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागून मोदीनी एन डी ए चे बहुमताचे सरकार स्थापन केले. भाजपचे बहुमत थोडक्यात हुकले. शरदराव म्हणाले की मोदींना जनादेश मिळालेला नसताना ते पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. स्वतःला सत्ता न मिळाल्याने कर्णाप्रमाणेच व्यथित होऊन शरदरावांनी हे विधान केले असावे. आताच्या युगात कोणी श्रीकृष्ण नसल्याने परमेश्वररूपी जनता जनार्दनलाच पवारांच्या इतिहासाची आठवण त्यांना करून देणे भाग आहे. तर बघू या पवारांच्या अगाध लिलांचा सारिपाट.श्रीकृष्णप्रमाणेच आपण त्यांना एकेक प्रश्न विचारूया :
प्रश्न क्र १:-पवार साहेब १९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून आपण ‘पुलोद ‘ नामक कडबोळे गोळा करून वसंतदादांची सत्ता हिरावून घेतली तेव्हा सत्ता स्थापनेसाठी आपल्याला जनादेश मिळाला होता काय?
‘गोविंदसुता ‘तेव्हा कोठे गेला होता तुमचा धर्म?
प्रश्न क्र २-१९८५ मध्ये आपल्या समांतर काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल जनतेने दिला होता. पण आपण १९८६ मध्ये कोलंटी उडी मारून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि १९८८ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात तेव्हा आपल्याला तसा जनादेश मिळाला होता काय?
‘गोविंदसुता तेव्हा कोठे गेला होता तुमचा धर्म?
प्रश्न क्र ३-१९९१ च्या निवडणुकीनंतर आपण थेट दिल्लीचे तखत काबीज करण्यासाठी नरसिंह रावांविरुद्ध तलवार परजली होती. तेव्हा आपण काँग्रेसमध्ये होतात. काँग्रेसला २३२ जागा मिळाल्या होत्या पण तो पक्ष बहुमतापासून दूरच होता. मग आपल्याला पंतप्रधान पद तर सोडा, पण पंतप्रधानपदासाठी प्रयत्न करण्याचा तरी जनादेश मिळाला होता काय?
गोविंदसुता तेव्हा कोठे गेला होता तुमचा धर्म?
प्रश्न क्र.४:-१९९९ च्या निवडणुकीपूर्वी आपली काँग्रेसमधून हकालपट्टी झाली होती आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने वेगळी चूल मांडली होती. आपण निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. (काँग्रेसविरोधात). महाराष्ट्रात त्रिशंकू विधानसभा अस्तिततवात आली. आपण काँग्रेसशी निवडणूक झाल्यावर समझोता करून सत्ता मिळवलीत तेव्हा कुठे मिळाला होता आपल्याला जनादेश?
गोविंदसुता तेव्हा कोठे गेला होता तुमचा धर्म?
प्रश्न क्र ५:-२००४ व २००९ मध्ये महाराष्ट्रात आपण काँग्रेसशी निवडणूक पूर्व युती करून आघाडी म्हणून बहुमत मिळवले पण राष्ट्रवादीला एकट्याला काही बहुमत मिळाले नव्हते. तरी सुध्दा आपण सत्ता बळ कावलीत. ती सत्ता जर घटनात्मक व जनदेशानुसार असेल तर आता मोदींनी एन डी ए म्हणून निवडणूकपूर्व युती करून बहुमत मिळवले तर ते घटनाबाह्य कसे होते?
गोविंदसुता तेव्हा कोठे गेला होता तुमचा धर्म?
प्रश्न क्र.६- २००४ मध्ये काँग्रेसला फक्त १४५ जागा मिळाल्या होत्या व काँग्रेस आघाडीला २०० च्या आसपास जागा मिळाल्या होत्या. तेव्हा काँग्रेस व आघाडी दोघेही बहुमतापासून दूर होते. तरी सुध्दा खासदारांची जमवाजामव करून व डाव्या पक्षांचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केलेत व त्यात आपण टुमकन उडी मारून सामील झालात तेव्हा काँग्रेसला व आघाडीला जनादेश मिळाला होता काय?
गोविंदसुता तेव्हा कोठे गेला होता तुमचा धर्म?
प्रश्न क्र ७:-२००९ मध्ये काँग्रेसला २०६ जागा मिळाल्या होत्या व डाव्या पक्षांच्या व समाजवादी पक्षाच्या बाहेरून दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर आपण सत्तेवर जाऊन बसलात तेव्हा काँग्रेसला व आपल्याला जनादेश मिळाला होता काय?
गोविंदसुता तेव्हा कोठे गेला होता तुमचा धर्म?
प्रश्न क्र ८:-२०१९ मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला होता. तसे आपण टीव्ही वर मुलाखत देताना बोलूनही दाखवले होते. पण नंतर उद्धवला फूस लावून, देवेंद्रजींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी नामक ‘टेस्ट ट्यूब बेबी’जन्माला घालून आपण सत्तेचे लोणी मटकावलेत तेव्हा तुम्हाला जनादेश मिळाला होता काय?
गोविंदसुता तेव्हा कोठे गेला होता तुमचा धर्म?
प्रश्न क्र ९:-हा जरा वेगळा प्रश्न आहे. अजित पवारांना फोडून पवार कुटुंब फोडले म्हणून आपण देवेंद्रजींवर दुगाण्या झाडत असता. मग धनंजय मुंडेना गोपीनाथ मुंड्यांपासून आपण दूर केले तेव्हा शरदराव आपण काय वेगळे केलेत? ही जर तुमची खेळी होती तर फडणवीस खेळले तो डाव होता हे मान्य करा.शेवटी करावे तसे भरावे ही दुनियेची रीत आहे.
गोविंदसुता तेव्हा कोठे गेला होता तुमचा धर्म?
वास्तविक वरील सर्व प्रश्न मीडियाने विचारले पाहिजेत. पण सर्व पेरलेले व पाळलेले पत्रकार/संपादक शरदराव जे म्हणतील त्याला नंदिबैलासारखी मान हलवत असल्याने हे प्रश्न आता जनतेने विचारण्याची वेळ आली आहे.
मोदीजी पूर्ण लोकशाही पद्धतीने व घटनात्मक रित्या तिसऱ्यांदा सत्तेवर आले आहेत या वास्तवाचे अपचन झाल्याने शरदराव आपली पोटदुखी झाली आहे हे जनता जाणते. आपण पूर्वी केलेल्या करामतींचा इतिहास उगाळला तर कोळसा कितीही उगाळला तरी काळा तो काळाच राहतो तसा आपला ही इतिहास काळा तो काळाच राहाणार आहे. म्हणूनच आपल्या आतापर्यंतच्या सत्ताकरणाच्या राजकारणाला ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज ‘ही म्हण अगदी ‘फिट ‘ बसते.
Like
निखळ सत्य!