Lokvijay
blank

झालेत बहू, होतील बहू, परंतु यासम हा!!

रघुनंदन भागवत

‘सुनील मनोहर गावसकर` या भारतीय क्रिकेट इतिहासातील १२ अक्षरी मंत्राची भेट क्रिकेट रसिकाना मिळाली त्याला आज १० जुलै २०२४ रोजी बरोबर ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.आपण वयाचा हिशोब नेहमी व्यक्तीच्या संदर्भात करतो. अशा अनेक व्यक्ती रोजच पंचांहत्तरी पूर्ण करत असतात पण आपल्यासाठी त्या अनामिक असतात. काही व्यक्तींची तोंडओळख असते त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर प्रथम त्या व्यक्तीचा चेहरा येतो आणि नंतर आपण त्या व्यक्तीचे नाव आठवण्याचा प्रयत्न करतो. पण काही व्यक्तींच्या ‘नामात ‘ एवढे सामर्थ्य असते की आपल्या लक्षात त्या व्यक्तीचे नाव प्रथम येते आणि मग ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभी रहाते आणि अशाच व्यक्तींनी इतिहास घडवलेला असतो किंवा त्या इतिहास घडवत असतात.

इतिहास घडवणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात काही दैवी चमत्कार जरूर घडतात. सुनील गावसकर यांच्या बाबतीत असा अनुभव आला तो जन्मल्याजन्मल्याच. सुनील यांचा जन्म झाल्यावर त्यांचे मामा माधव मंत्री त्यांना बघायला हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्या नजरेस, गावसकरांच्या कानाला असलेले भोक,दिसले .दुसऱ्या दिवशी ते परत भेटायला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मीनलताईंच्या शेजारी ठेवलेले बाळ दुसरेच होते.त्यांनी हे नजरेस आणून दिल्यावर झालेला घोळ लक्षात आला.दाईने मुलांची चुकून अदलाबदल केली होती आणि सुनिलना एका कोळणीशेजारी झोपवले होते.माधव मंत्री यांच्या सतर्कतेमुळेच भारताला सुनील गावसकर हे ‘नररत्न’ गवसले असे म्हणणे वावगे ठरू नये.गावसकरांनी ‘सनी डेज ‘ या आपल्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे.

इतिहास घडवणाऱ्या व्यक्तींवर बालपणी झालेले संस्कार त्यांच्या जडणघडणीत मोठी भूमिका बजावतात. मीनलताईंनी एका मुलाखतीत सांगितलेले आठवते की सुनील एकदा शाळेतून शिक्षकांचा खडू घेऊन आले होता पण मीनलताईना ते आवडले नाही आणि त्यांनी ‘बाल ‘सुनीलची कानउघडणी करून तो खडू शाळेत परत करायला लावला.
सुनिलचे मामा माधव मंत्री हे भारतातर्फे कसोटी सामने खेळलेले यष्टीरक्षक होते.एकदा सुनीलने त्यांची ‘इंडिया कॅप’ डोकयावर चढवली तेव्हा मामांनी ती टोपी काढून घेतली व सुनिलला एक महत्वाचा मंत्र दिला की ‘यू हॅव टू अर्न धिस कॅप’.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे सुनीलची गुणवत्ता लहानपणीच जाणवू लागली.अशोक सराफ सुनिलचा बालमित्र आणि अस्सल गिरगावकर. त्याने एक आठवण सांगितली की लहानपणी गल्ली क्रिकेटमध्ये सुनील आउटच व्हायचा नाही.

शालेय क्रिकेटमध्ये एकदा सुनिलने द्विशतक पूर्ण केल्यावर विकेट टाकली. घरी आल्यावर माधव मंत्रीनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि त्याला दुसरा मंत्र दिला की’बोलर्स हॅव टू अर्न युअर विकेट’

सुनिलने आपल्या मामांच्या ‘गुरुमंत्राचा ‘ कधीही विसर पडू दिला नाही. याची प्रचिती त्याच्या रणजी तसेच कसोटी सामन्यातील अनेक शतकामुळे आपल्याला येते. सुनील अगदी क्वचितच चुकीचा फटका मारून बाद झाला असेल.

सुनीलची निरीक्षणशक्ती विलक्षण होती. एकदा एका सामन्यात त्याने स्लिपमधून चेंडूला फटकारले. त्याच्या साथीदाराने आश्चर्य व्यक्त केले. सुनील म्हणाला की स्लिपमधील फिल्डर डावखोरा होता म्हणून मी त्याच्या उजव्या बाजूने चेंडू प्लेस केला.

दुसरे उदाहरण म्हणजे गावसकर गोलंदाजाचे बारकाईने निरीक्षण करायचा.आपल्या एका नामांकित फलंदाजाची मार्शलच्या बाउन्सर समोर भंबेरी उडत होती.समोर सुनील होता.सुनीलच्या लक्षात आले की बाउन्सर टाकायच्या आधी मार्शल त्याच्या पँटच्या बकलला हात लावत असे. त्यावरून अंदाज बांधून सुनील समोरच्या साथीदाराला आधीच सावध करु लागला.

गावसकर कायम आत्मपरीक्षण करत असे. १९७६ मध्ये टोनी ग्रेगचा इंग्लंड संघ भारतात आला होता. या मालिकेत डावखोरा फिरकी गोलंदाज अंडरवूड याने गावसकरला आपले गिऱ्हाईक बनवले होते. त्यावेळी आपले काय चुकत आहे हे समजण्यासाठी सुनील पुण्याला थेट कमल भांडारकर यांच्याकडे आला व त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्याने आपल्या तंत्रात सुधारणा केली.

गावसकरने संघाच्या हितासाठी हुक फटका खेळणे सोडून दिले होते कारण भारतासाठी आपली विकेट अमूल्य आहे हे तो जाणत होता.

१९७१ च्या वेस्ट इंडिजच्या आपल्या पहिल्याच दौऱ्यात शेवटच्या कसोटीत सुनिलने दोन्ही डावात शतके झळकावली. पहिल्या डावात १२४ व दुसऱ्या डावात २२०. दुसऱ्या डावात त्याची दाढ जबरदस्त दुखत होती. व्यवस्थापक केकी तारापोर यांनी त्याला वेदनाशामक गोळ्या घेऊ दिल्या नाहीत कारण त्यांना भीती वाटली की या गोळ्यांमुळे सुनिलला कदाचित झोप येईल व तो लवकर बाद होईल.असह्य वेदना होत असताना सुध्दा विकेट फेकण्याचा विचार त्याच्या मनाला शिवला नाही.सुनिलने गमतीने म्हटले आहे की त्याला बाद झाल्याचा आनंद झाला कारण त्यानंतर दाढदुखीवर लगेच उपचार घेणे शक्य होणार होते.

असाच निग्रह त्याने दाखवला तो १९७९ मध्ये इंग्लंडमध्ये शेवटच्या ओव्हल कसोटीत. भारताला सामना जिंकण्यासाठी ४३८ धावा करायच्या होत्या. जोपर्यंत सुनील मैदानात होता तोपर्यंत भारताला विजय सहजसाध्य वाटत होता. पण २२१ धावा असताना धावा वेगाने काढण्याच्या प्रयत्नात त्याने बोथमला उंचावरून फटका मारला व तो झेलबाद झाला आणि सामना जिंकण्याऐवजी भारताला सामना वाचवण्यातच समाधान मानावे लागले. तंबूत परतताना सुनील म्हणाला उंचावरून चेंडू मारण्याची सवय नसल्याने घात झाला. तो खूप निराश झाला कारण त्याने विकेट टाकली होतीआणि ही त्याच्या या डावातील एकमेव चूक होती.

१९८७च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने नागपूरला न्यूझिलंडविरुद्ध आपले एक दिवसीय सामन्यातील पहिले आणि एकमेव शतक ठोकले (नाबाद १०३). त्यावेळी त्याच्या अंगात १०३ डिग्री ताप होता.पण तो इतक्या जोशात खेळला की प्रेक्षकांना त्याच्या आजारपणाचा पत्ता लागला नाही.गावसकरने चेंडूमागे धाव या गतीने हे शतक ठोकले ते श्रीकांतपेक्षा जलद गतीने खेळून. याच गावसकरने १९७५ च्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत पूर्ण ६० षटके खेळून फक्त ३६ धावा काढल्या होत्या. हा डाग त्याने नागपूरला पुसून टाकला.

गावसकर भारताच्या कोट्यावधी क्रिकेट रसिकांच्या हृदयाचा जणू स्वामी होता. १९७६ मध्ये कलकत्ता कसोटीत बॉब विलीसच्या पहिल्याच षटकात गावसकर बाद झाला आणि काही रसिक हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावल्याची बातमी त्यावेळी वर्तमानपत्रात आली होती.

गावसकरचा उदय झाला ते वर्ष होते १९७१. हे वर्ष भारताच्या राष्ट्रीय इतिहासात एक मैलाचा दगड ठरले. या वर्षी भारताने जणू कात टाकली आणि एका नव्या भारताचा जन्म झाला.वर्षाची सुरुवात झाली भारताच्या वेस्ट इंडिजवरील त्यांच्याच देशात मिळवलेल्या विजयाने आणि वर्षाची अखेर झाली ती भारताच्या बांगलादेश युद्धातील विजयाने. वेस्ट इंडिजवरील विजयाचा नायक होता शांत संयमी सुनील तर बांगलादेश युद्धातील नायिका होत्या ‘आक्रमक’इंदिरा गांधी.

गावसकरने शतकांचा रतीब घालून भारतीयांना शतकांची अक्षरशः चटक लावली. त्याने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलून टाकताना क्रिकेटपटूना स्वाभिमानाने /सन्मानाने जगायला शिकवले.

गावसकरने जे बीज पेरले त्याला उगवलेली फळे म्हणजे सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड. सुनील चे सर्व विक्रम या भारतीय दुकलीने मोडीत काढले हा काव्यगत न्याय नाही तर काय? पण म्हणून सुनीलने जी शिखरे सर्वप्रथम सर केली त्याचे महत्व कमी होत नाही. आज एवरेस्ट शिखर अगणित गिऱ्यारोहकांनी पादाक्रांत केले असेल पण सर्वप्रथम एव्हरेस्ट सर करणाऱ्या एडमंड हिलरी आणि शेरपा तेनसिंग यांची नावेच अजरामर झाली आहेत.

निवृत्तीनंतर त्याने अव्वल समलोचक म्हणून नाव कमावले आहे.समालोचन करताना त्याचा देशाभिमान जागृत असतो. कुणाही परकीय खेळाडू ने भारताला डिवचले तर सुनील फणा काढून लगेच त्याचा योग्य तो समाचार घेतो.
२०२१ मध्ये नीरज चोप्राने ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले तेव्हा सुनीलने कंमेंटरी बॉक्स मध्ये केलेला जल्लोष कोण विसरेल?

सुनीलच्या हजरजबाबीपणाचे व राष्ट्राभिमानाचे अजून एक उदाहरण आठवते. भारतीय संघ पाकिस्तानाच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी एका पार्टीत प्रसिद्ध गायिका नूर जहाँ आली होती. फत्तेसिंगराव गायकवाडनी गावसकरची ओळख करून देताना नूर जहाँला विचारले की तू याला ओळखतेस का? त्यावर ती म्हणाली की मी झहीर अब्बासशिवाय कोणाला ओळखत नाही. मग गायकवाडनी सुनिलला विचारले की या कोण आहेत तुला माहित आहे का? सुनीलने झटकन उत्तर दिले की त्याला फक्त लता मंगेशकर माहित आहेत.

आज आपल्या वयाचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या सुनील गावसकरसाठी परमेश्वराजवळ एकच विनंती की खेळाच्या मैदानावर ७५ धावावर सुनील कधी संतुष्ट नसे तर त्याला शतकाची आस लागलेली असे त्याप्रमाणे जीवनाच्या खेळपट्टीवर सुध्दा त्याने आता शतकाच्या दिशेने दमदार वाटचाल करावी.

सुनीलला नाबाद पंचांहतरीनिमित्त शुभेच्छा देताना/मानवंदना देताना,म्हणावेसे वाटते,’झालेत बहू, होतील बहू परंतु या सम हा.’

1 comment