Lokvijay

मनरेगा अंतर्गत “प्रत्येक शेताला पाणी” या संकल्पनेतून कामाचे नियोजन व अमलबजावणी करा – मा. प्रधान सचिव (रोहयो) श्री. दिनेश वाघमारे, भा.प्र.से

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक शेताला पाणी मिळावा या उद्देशाने रोहयो विभागाने १० लक्ष सिंचन विहिरीचा कार्यक्रम राज्यात राबविण्याच्या संकल्प केला आहे. या संकल्पनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ‘प्रत्येक हाताला काम, प्रत्येक शेताला पाणी’ मिळावा याकरिता नियोजनबद्ध पद्धतीने योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता रोहयो विभागाचे प्रधान सचिव मा. श्री. दिनेश वाघमारे, भा.प्र.से. यांनी सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज आयोजित करण्यात आलेल्या व्ही.सी. मध्ये आवाहन केले.

मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचा लाभ घेण्याकरीता तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे मागणी करता येते. लाभार्थी शेतकऱ्याला शेतात विहीर खोदण्यासाठी ४ लाखाचे अनुदान दिले जाते. त्याअनुषंगाने मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरींचे कामे घेण्यात येत असून शेतकऱ्यांना निश्चितच याचा फायदा होणार आहे. तसेच महात्मा गांधी नरेगा अंतर्गत विविध प्रकाराची २६६ कामे अनुज्ञेय असून या कामांच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावर स्थानिक परिस्थितीनुसार योग्यप्रकारे जलव्यवस्थापन आराखडा तयार करून कामाचे नियोजन केल्यास प्रत्येक त्याला पाणी उपलब्ध करता येईल असे मत रोहयो विभागाचे मा. प्रधान सचिव यांनी यावेळी व्यक्त केले.

ग्रामपंचायत स्तरावर सिंचन विहिरीचे कामे करताना ग्राम रोजगार सेवक हा मनरेगा अंतर्गत अत्यंत महत्वाचा दुवा आहे. ग्रामरोजगार सेवकांनी स्वयंप्रेरणेने सदर काम केल्यास त्याचा निश्चितच फायदा त्यांना होईल असे मत मनरेगाचे मिशन महासंचालक श्री. नंदकुमार यांनी सांगितले. तसेच दि. २४ जानेवारी, २०२४ च्या पत्राचा संदर्भ देत ग्राम रोजगार सेवकांना सिंचन विहिरीच्या माध्यमातून कशाप्रकारे अधिकचा नफा मिळवता येईल याबाबत मार्गदर्शन केले.

मनरेगा अंतर्गत मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ज्या जिल्ह्यांनी जास्त सिंचन विहिरीचे कामे सुरू केलेली आहेत अशा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे मा. प्रधान सचिव यांनी प्रशंसा केली. तसेच सर्वांनी एकत्र मिळून मनरेगा अंतर्गत कुटुंबांना तसेच शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या शासनाच्या संकल्पपूर्तीसाठी काम करण्याचे सूचना व्ही.सी. मध्ये उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मा. मनरेगा आयुक्त श्री. अजय गुल्हाने, भा.प्र.से. राज्य गुणवत्ता निरीक्षक श्री. राजेंद्र शहाडे, सहायक संचालक (लेखा) श्री. विजयकुमार कलवले हजत होते.

Add comment