अशोक सराफ यांना विनोदी अभिनेता असे प्रामुख्याने समजले जाते.
तथापि त्यांनी सिनेमा, नाटक आणि काही मालिकातूनही गंभीर स्वरूपाच्या किंवा वेगळ्या पद्धतीच्या भूमिकाही केल्या आहेत.
यशस्वी नटाने कोणत्याही एका प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकू नये याचे भान राखून विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी अतिशय सहजपणे निभावल्या आहेत.
संभाषणाचे अचूक टाइमिंग, योग्य पद्धतीने संवाद आणि भूमिकेला अनुसरून त्यात केलेला बदल हे सारे गुण एक समर्थ अभिनेता म्हणून अशोक सराफ यांच्यात आहेत, त्यामुळेच ममद्यापासून ते करण अर्जुन मधील वेगळ्या प्रकारच्या भूमिका ते सहजपणे निभावताना दिसून येतात.
हिंदी चित्रपटातही अतिशय सहजपणे ते वावरतात सिंघम, करण अर्जुन, येस बॉस, कोयला ,आ गले लग जा, मेरे बीवी की शादी, ही त्यांच्या हिंदी चित्रपटातील काही भूमिकांची नावे आहेत.
माध्यमांवर पकड
नाटक, चित्रपट आणि टेलिव्हिजन वरील मालिका या प्रत्येक प्रकाराचे प्रारूप वेगळे आहे आणि यासाठी लागणारे कौशल्य देखील वेगळे आहे.
अशोक सराफ यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रकारच्या माध्यमावर त्यांची जबरदस्त पकड आहे. त्यामुळेच नाटकात त्यांचा जेवढा सहज वावर असतो तेवढाच मालिकांमधूनही दिसतो, आणि चित्रपटातूनही!
माध्यमांच्या गरजेप्रमाणे स्वतःमध्ये बदल करणे हे त्यांना सहज शक्य होते, जे त्यांच्या समकालीन अनेक कलावंतांना अजूनही जमलेले नाही! त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीमधील माध्यमांवरची पकड हा त्यांचा सर्वोत्तम गुण आहे असे मला वाटते.
250 हून अधिक हिंदी, मराठी चित्रपटातून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून माध्यमा वरील आपली पकड सिद्ध करून दाखवली आहे.
माणसांबद्दलचे प्रेम
कलावंत म्हणून अशोक सराफ जितके थोर आहेत, तितकेच व्यक्ती म्हणूनही!
त्यांच्या परिचयाच्या लोकां सोबत, सह कलावंतांसोबत आणि जुन्या सहकाऱ्यांसोबत त्यांचे अत्यंत जवळीकीचे संबंध आहेत. चित्रपटसृष्टी देण्याआधी जवळपास दहा वर्षे ते स्टेट बँकेत नोकरी करत होते.
नाटकाच्या निमित्ताने दौऱ्यांच्या दरम्यान त्यांनी स्टेट बँकेत त्यांच्यासोबत असणाऱ्यांची आवर्जून भेट घेतली आहे असे समाज माध्यमातुन कळले आहे. त्यांना प्रेक्षकांबद्दल अत्यंत जिव्हाळा असून यशाचे दिवस हे प्रेक्षकांमुळेच आलेले आहेत असे त्यांनी प्रतिपादन केले आहे.
पारितोषिके
अशोक सराफ यांना अनेक पारितोषिके मिळालेली आहेत.
यामध्ये “राम राम गंगाराम “साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ,”गोंधळात गोंधळ” या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता, “गोष्ट धमाल नाम्याची” यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता, तसेच फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार, “सवाई हवालदार” चित्रपटासाठी स्क्रीन अवॉर्ड, “मायका बिटवा” या भोजपुरी चित्रपटासाठी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
महाराष्ट्र शासनाने त्यांना “महाराष्ट्र भूषण” हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार देऊन त्यांचा यथार्थ गौरव केलेला आहे.
या गौरवा बद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि उर्वरित आयुष्यात ते रसिकांचे या पद्धतीनेच मनोरंजन करत राहतील यासाठी शुभेच्छा!
Add comment