Lokvijay
blank

एका सैनिकाच्या पत्नीची वटपौर्णिमा!

शहीद विक्रांत सबनीस यांच्या सुविद्य पत्नीने २-३ वर्षापूर्वी एका Blog वर लिहिलेला भावूक लेख.

प्रिय विक्रांत,
कसा आहेस?
मी ठीक.
सॉरी, काल लिहू शकले नाही.
काल आपल्या पियुची शाळा सुरु झाली. मागच्या आठवड्यात जमलं नाही, म्हणून काल रात्री तिच्या वह्या पुस्तकांना कव्हर्स घालण्याचा ‘सोहळा’ पार पडला.
‘सोहळा’च तो! कोऱ्या करकरीत पुस्तकांच्या सुवासाचं अत्तर शिंपडून पार पडणारा !
थोडक्यात…म्हणून काल लिहिणं जमलं नाही.

आज वटपौर्णिमा होती. तू ‘गेल्या’नंतरची पहिली….
काल लोकलच्या डब्यात कुणीतरी विषय काढला.

मी गप्पांमधून अंग काढत ट्रेनच्या खिडकीतून दिसणाऱ्या काळोखात बघत बसले.
आपल्या लग्नापूर्वी तू सांगितलेला जोक आठवला – वटपौर्णिमेला बायका वडाजवळ काय मागतात ? – ‘वडा-पाव’ !
तुझ्या तोंडून प्रथम ऐकला तेव्हा केव्हढी हसले होते मी ! आठवतंय नं ?

आणखी एक प्रसंग आठवला.
आपलं नुकतंच लग्न झालं होतं. माझ्या एकंदरीत ‘उत्साहावरून’ सासुबाईंनी माझं मन ओळखलं असावं. माझा हात धरून मला सोसायटीतल्या वडाजवळ घेऊन गेल्या. मला म्हणाल्या उद्या सकाळी आपल्याला इथे येऊन पूजा करायची आहे. मी म्हटलं ‘माझा विश्वास नाही’.
तर म्हणाल्या,’या निमित्ताने वडाला नमस्कार करायचा. इतकी वर्ष इथे उभा राहून तो आपल्याला सावली देतोय त्याबद्दल त्याचे आभार मानायचे.

परंपरेपेक्षा मला ही कृतज्ञतेची भावना जास्त भावली.
मी सासूबाईंबरोबर दर वर्षी पूजा करू लागले.

आज सकाळी पुजेची थाळी घेऊन वडाजवळ गेले. सोबत सासूबाई होत्या.
वडाजवळ उभी राहिले. बराच वेळ निःशब्द !

अचानक काय वाटलं माहित नाही –
भरल्या डोळ्यांनी आणि थरथरत्या हातांनी वडाला एक salute ठोकला !
Afterall, तू मेजर होतास, विक्रांत !

सासूबाई मला सावरायला म्हणून आल्या होत्या, पण आता त्यांचाच बांध फुटला.

आधीच सोसायटीतल्या बायकांनी मी तिथे गेल्यामुळे भुवया उंचावल्या होत्या.
आता तर मला ऐकू जाईल अशी कुजबुज सुरु झाली.
‘हिला आणायचं का इथे ? सबनीस काकींना तरी कळायला हवं होतं!’
गर्दीतून कोणीतरी हळूच म्हणालं.

माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या त्या बायकांशी मला हुज्जत घालायची नव्हती, कारण मी काय करत होते याबद्दल मला विश्वास होता.

विक्रांत,
आपण या जन्मात भेटलो खरे –
पण तू ‘मला असा’ किती मिळालास?
पुढचे सात जन्मच काय- सगळे जन्म तू मला हवा आहेस…
हे, खरं तर, घरी बसून देखील मागता आलं असतं.
पण का कोणास ठाऊक, मला वडाजवळ जावसं वाटलं.
घरातल्या एखाद्या आजोबांसारखा असलेला तो वड माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेईल असं वाटलं.

त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की परंपरा-रूढी, प्रतीकं तुम्ही माना किंवा मानू नका ,
पण तुमच्या एकूण ‘असण्याला’च या सगळ्या गोष्टी चिकटलेल्या असतात.

तू असतास तर मला वेड्यात काढलं असतंस कारण तुझा या कशावर विश्वास नव्हता.

पण एक सांगू ? विश्वास-अविश्वास या सगळ्याच्या पलीकडे एक प्रांत असतो.
मी त्याला ‘instinct’ म्हणते.
भिकाऱ्याला कधीही भीक न देणारे आपण एखादवेळी पट्कन कुणालातरी भीक देऊन मोकळे का होतो,
याला जसं लॉजिक नसतं तसंच काहीसं.
अशावेळी आपण फक्त आपल्या ‘instinct’ ने दिलेली आज्ञा पाळत असतो.

सोळा डिसेंबरच्या रात्री बॉर्डरवर शत्रूशी चकमक झाली. फारशी कुमक जवळ नसताना तू कोणाच्या आज्ञेने लढलास आणि शहीद झालास?
Vikrant, you just followed your instinct !

वटपौर्णिमेला मला वडाजवळ पूजा करताना पाहून शेरे मारणाऱ्या समाजाबद्दल मला राग नाही, पण गंमत वाटते.

सो कॉल्ड प्रगतीच्या नावाखाली स्त्रियांच्या हातात सिगरेट आणि दारूचा ग्लास खपवून घेणारा समाज विधवा स्त्रीचा वड पुजण्याचा हक्क नाकारतो.

आपल्या मुलीबाळी गणेशोत्सवात ‘शीला की जवानी’ म्हणत नाचलेल्या चालतात, पण पिरियड्स चालू असलेल्या स्त्रीला देवघरात यायचा मज्जाव असतो !
हा paradox मला मान्य करावा लागतो
तुम्ही ढीग शिका, पदव्या मिळवा, जग जिंका –

माझ्यासारख्या एकट्या बाईला समाजात राहायचं असेल तर जगण्यातल्या या विसंगतीला पर्याय नाही.

आर्मीत गेल्यानंतर तू आम्हा सिविलीयन्सना नेहमी नावं ठेवायचास. ‘तुम्हाला जगण्याची शिस्त नाही’ म्हणायचास.
नसेल आम्हाला शिस्त. पण इथेही कुठलीही गोष्ट लढूनच मिळवावी लागते.

मी ही रोज लढते….

भ्रष्टाचाराने पोखरलेल्या देशाचं रक्षण करण्यासाठी. माझ्या नवऱ्याने रक्त सांडलं या जाणीवेसह जगत राहण्याबद्दल कुठलं शौर्यचक्र मिळणार नाही हे माहित असून लढते.

पियु, सासूबाई आणि बाबांसमोर कणखर राहण्याचा जो मी ‘अभिनय’ करते त्याबद्दल कुठलंही award मिळणार नाही हे माहित असून लढते.

आपल्या पियुच्या न संपणाऱ्या प्रश्नांना न कंटाळता उत्तरं देण्याबद्दल कुणी पाठ थोपटणार नाही हे माहित असून लढते.

I am a soldier, I fight where I am told, and I win where I fight !
तूच म्हणायचास ना?

थांबते. पियुला गोष्ट सांगायची वेळ झाली.
उद्या भेटू.
बाय!

1 comment