Lokvijay
blank

वाटेवर काटे वेचीत चाललो…….!

लेखक :रघुनंदन भागवत

मराठीत वसंतराव देशपांडे यांनी गायलेले एक अप्रतिम गाणे आहे ‘वाटे वर काटे वेचीत चाललो वाटले लता फुलात चाललो ‘. पंतप्रधान मोदी यांची गेल्या दहा वर्षातील वाटचाल बघितली तर वरील काव्यपंक्ती चपखलपणे लागू पडतात.

२०१४ – २०१९

मोदीजींची २०१४ ते २०१९ ही पहिली पाच वर्षे त्यांनी निराळी आव्हाने पेलली. त्यांना मुख्यतः यू पि ए च्या काळात भ्रष्टाचाराच्या मालिकांमुळे सरकारची रसातळाला गेलेली विश्वासाऱ्हता पुनरस्थापित करण्यास प्राधान्य दयावे लागले. तसेच वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या प्रकल्पाना गती देणे ही काळाची गरज होती. काश्मीर व एकूणच भारतात इस्लामिक
दहशतवादाने उच्छाद मांडला होता तो तातडीने नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान होते.यू पि ए च्या काळात एखाद्या ‘ कॅलेंडर आयटम ‘प्रमाणे दर महिन्यात भारतात कुठेतरी दहशतवादी हल्ला हमखास व्हायचा. भारताचे लष्करी सामर्थ्य वाढवणे व त्याची चुणूक शत्रूला दाखवणे आवश्यक होते. त्यातच निश्चलिकरण ही स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती ठरली. प्रखर राजकीय विरोधाला सामोरे जातानाच देशात भाजपचा मोदी ब्रँड रुजवणे ही तारेवरची कसरत ठरली. जी एस टी च्या प्रसुती वेदना सहन करणे खूप कठीण जात होते. राजकीय आघाडीवर निवडणुकांमध्ये ‘कभी ख़ुशी कभी गम ‘अनुभवावी लागली. बँकामधील अनुत्पादक कर्जाना वेसण घालतानाच ‘जनधन ‘ योजनेद्वारे जनमनापर्यंत पोहोचण्याचे ‘शिवधनुष्य पेलावे लागले.इंधनाच्या सतत वाढणाऱ्या किमतीमुळे जनतेच्या रोशाला तोंड द्यावे लागले.सार्वत्रिक निवडणुकांच्या ऐन तोंडावर तीन राज्ये एकसाथ गमवावी लागली. हे कमी होते म्हणून की काय ‘पाकिस्तानने ‘पूलवामा’घडवून आणले आणि बालाकोट वरील हवाई हल्ला आणि वैमानिक अभिनंदनची सुटका घडवून आणणे ही दोन्ही अग्निदिव्ये पार करावी लागली. मोदींनी या कसोटीच्या प्रसंगाना तोंड देताना ‘कष्टाविण फळ ना मिळते ‘हे कायम लक्षात ठेवले आणि 2019च्या निवडणुकीत ‘प्रयत्ने वाळूचे कण रागडिता तेलही गळे ‘ या उक्तीचा प्रत्यय त्यांना आला तो 303 जागांनी भरलेला फळांचा घड जेव्हा त्यांच्या पदरात पडला तेव्हा.
मोदी ०१चे एका वाक्यात वर्णन करायचे तर ‘नंतर
विक्रम प्रथम योजना ‘ असे करता येईल.

२०१९ – २०२४

मोदी सरकारने दुसऱ्या टर्मची सुरुवात धडाक्यात केली ती काश्मीरचे कलम ३७० रद्द करून. त्यापाठोपाठ सुधारित नागरिकत्व कायदा मंजूर करून त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले. पण त्याच्या आसपासच मनोहर पर्रीकर, सुषमा स्वराज, अरुण जेटली हे तीन मोहोरे लागोपाठ गमावल्याने भाजपमध्ये एक पोकळी निर्माण झाली. या दुःखातून सावरत असतानाच भाजपचा विजय सहन न झालेल्या असंतुष्ट आत्म्याना सुधारित नागरिकत्व कायद्याचे निमित्त मिळाले आणि शाहीन बागेचे विखारी आंदोलन सुरु झाले. दिल्ली मध्ये दंगल पेटवण्यात आली आणि भारतात अराजक माजवण्याचे ‘टूल किट ‘योजनाबध्द रीतीने अमलात आणले गेले. संकटे कधी एकटी येत नाहीत याची प्रचिती थोड्याच दिवसात आली. सर्व जगाबरोबरच भारतावर सुद्धा करोनाने झडप घातली. लॉकडाऊन मुळे सबंध देश स्तब्ध झाला. अर्थचक्र पूर्णपणे थंडावले आणि जनतेचा जिवीत राहण्यासाठी जीवन मरणाचा संघर्ष सुरु झाला. सर्व आरोग्यव्यवस्था कोलमडून पडली. अशा वेळी एखाद्या नेतृत्वाने हाय खाल्ली असती. पण मोदींनी सर्व जनतेला कोरोनाशी
एकजुटीने लढा देण्यासाठी प्रेरित केले.शास्त्रज्ञाना प्रोत्साहित करून लस संशोधनाला गती दिली. परदेशस्थ भारतीय विद्यार्थी /नागरिकांना विक्रमी वेळात भारतात परत आणले गेले.

दरम्यान चिनने लडाखमध्ये कुरापत काढली. त्याचे पर्यवसान गलवानच्या लढाईत होऊन २० शुरांनी बलिदान दिले. चिनशी आख मिचौली सुरु असतानाच पंजाबी शेतकऱ्यांनी कृषी कायद्याना विरोध म्हणून दिल्लीला घेराव घातला आणि केंद्र सरकारची कोंडी केली. इतक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हजारो भारतीयांना गिळले. कृषी कायदे मागे घेतल्यावर शेतकऱ्यांनी दिल्लीचा वेढा उठवला आणि त्याच वेळी कोरोनाने भारतातून काढता पाय घेतला. या सर्व गदारोळात अडीच वर्षे वाया गेली. पण मोदी सरकारने पुनःश्च हरिओम करून विकासकामांचा धडाका लावला. नवीन संसद भवन बांधून पूर्ण झाले. न्यायालइन आदेशानुसार अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होऊन ५०० वर्षानंतर रामलल्ला स्वगृही परतले सुद्धा. त्याच वेळी भकतीला शक्तीची जोड मिळून राफेल विमाने भारतात अवतरली. भारताने थेट चंद्राला गवसणी घातली. असंख्य विकास कामे मार्गी लागली आणि मोदी अभिमानाने सांगू लागले की हम शिलान्यास भी करते है और उसका लोकार्पण भी करते है.

आज निवडणुकीला सामोरे जात असताना पहिल्या अडीच वर्षाच्या कटू कालखंडाची आठवण इतिहासजमा होऊन भारत जगातल्या पाचव्या नंबरच्या अर्थाव्यवस्थेवरून २०४७ पर्यंत विकसित भारत बनण्यासाठी हनुमान उडी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. या सकारात्मक बदलाचे श्रेय जाते मोदी सरकारला.

मोदी आज म्हणत आहेत ‘काटा रुते कुणाला, आक्ररनदात कोणी, मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे. ज्यांनी मोदींच्या वाटेत काटे पेरले त्यांनाच काटे रुतायला लागले आहेत तर काट्यानवरून चालताना जणू फुलांवरून चालल्याचा सहजपणा दाखवणाऱ्या मोदींना फुलेच हळुवारपणे रुतत आहेत हाच तो दैवयोग आहे यात शंका नाही.

मोदी २.०० चे वर्णन एका वाक्यात करायचे तर ‘आधी केले मग सांगितले ‘ असेच करावे लागेल.

Add comment