Lokvijay
blank

पर्यावरणाचा समतोल, ही सामूहिक जबाबदारी

दिलीप देशपांडे, जामनेर, जळगाव

आपल्याला निरोगी आणि प्रदूषणमुक्त आयुष्य जगायचे असेल, तर आजूबाजूचे पर्यावरण नेहमी स्वच्छ असणे आणि स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने दरवर्षी प्रयत्न केले जातात. शासकीय/प्रशासकीय पातळीवर पर्यावरण दिन साजरा होतोच. एक प्रश्न सतत मनात येतोच, की असे दिवस साजरे करून पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे का? ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. तो पर्यावरण संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करून, समस्या जाणून घेऊन पर्यावरणाची गुणवत्ता वाढावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करणे हाच पर्यावरण दिन साजरा करण्या मागचा प्रमुख हेतू आहे.

पर्यावरणाचा र्‍हास का होतो? पर्यावरणाचे संतुलन का बिघडते? याला आपण किती जबाबदार आहोत? निसर्गातील बदल, अनियमितपणा किती कारणीभूत आहे? याचाही विचार करावा लागेलच. खरं म्हणजे, पर्यावरण आणि प्रदूषण यांचा खूप जवळचा संबंध आहे. अनेकविध प्रकारच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा र्‍हास प्रामुख्याने होत असतो. मग निसर्गनिर्मित असो वा मानवनिर्मित असो, याचा विचार करणे गरजेचे आहे. निसर्गनिर्मित कारणांमुळे होणार्‍या कारणावर आपण काय करणार? ती एक प्रकारची आपत्तीच असते. पण आपल्याकडून ज्या ज्या कारणांमुळे प्रदूषण निर्मिती होते ती आपण नक्कीच कमी करू शकतो.
दरवर्षी पर्यावरण दिवस साजरा करताना एक घोषवाक्य असते. जसे ५ जून २०११ सालात भारताची प्रथमच यजमानपदी निवड झाली होती. ‘वन निसर्ग आपल्या सेवेसी’ असे घोषवाक्य होते. परत दुसर्‍यांदा ५ जून २०१८ मध्ये भारताची यजमानपदी निवड झाली, तेव्हा ‘प्लास्टिक प्रदूषणाशी संघर्ष’ असे घोषवाक्य होते. पर्यावरण दिवस कोलंबियात साजरा झाला, त्यावेळी ‘जैवविविधता’ हे घोषवाक्य होते. जैवविविधता म्हणजेच जीवांची विविधता. मग त्यात पशू, पक्षी, निरनिराळे प्राणी येतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जैवविविधता संपन्न असायला हवी. आपण बघतो निरनिराळ्या कारणांमुळे ही कमी होत आहे. त्याच्यावर उपाययोजना करायला हव्यात.

पर्यावरणाचा समतोल न राहण्याचे प्रदूषण हेच महत्त्वाचे कारण कसे आहे हे बघू आणि आपला सर्वसामान्य माणसाचा त्याच्याशी काय संबंध आहे, आपण काय करू शकतो, काय करत नाही. हे पहाणेही उचित ठरेल. तसेच शासकीय/प्रशासकीय पातळीवर काय करता येईल, काय होत नाही, तेही बघायला लागेल. पृथ्वीवरील जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण होणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. हाच या मागील हेतू आहे. पर्यावरणाचा र्‍हास मुख्यत्वे प्रदूषणाने होतो. प्रदूषण कोणत्या कोणत्या मार्गाने कसे कसे होते आणि कोणामुळे होते ते पाहू. वायुप्रदूषण/हवेतून होणारे ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण, जुनी इलेक्ट्रिक उपकरणे, प्लास्टिक कचरा, वातावरणातील बदलाने निर्मित होणारे पर्यावरण अर्थातच निसर्गनिर्मित प्रदूषण.

२०२४ च्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना जमीन पुनर्स्थापना वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंध अशी आहे. जमिनीची पुनर्स्थापना यामध्ये जंगल क्षेत्र वाढवणे, मातीची धूप रोखणे, शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करणे आणि नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे यांसारख्या उपाययोजना येतात. वाढत्या वाळवंटीकरणामुळे पाण्याची कमतरता आणि हवामान बदलाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असते. त्यात दुष्काळ ही एक गंभीर समस्या आहे. वाढते तापमान, अनियमीत पाऊस यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढते आहे. शेती उत्पादन कमी होणे आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणे या गोष्टी संभावतात. या सर्व गोष्टी पर्यावरणाशी निगडित आहेत.

कारखान्यांतील निर्मिती प्रक्रियेतून वायू, धूर यांची निर्मिती होत असते. बर्‍याच वेळी हा वायू आरोग्यासाठी हानिकारक तर असतोच पण त्यामुळे सभोवतालचे वातावरण दूषित होते. वाहनांची संख्या खूप वाढली आहे. जुनी वाहने, वेळीच सर्व्हिसिंग न होणारी वाहने खूपच धूर सोडतात. त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. आपल्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. वाहन तपासणी होते. पोल्युशन प्रमाणपत्र बंधनकारक आहे. पण कुठेतरी या दोन्हीही प्रक्रियेत काहीतरी दोष आहेत. त्यात सुधारणा हवी आहे.

एका विशिष्ट मर्यादेपलीकडे निर्माण झालेला असह्य ध्वनी म्हणजे ध्वनिप्रदूषण. कारखान्यातील यंत्रांचे आवाज, वाहनांचे कर्कश हॉर्न, सायलेन्सर विना चालणार्‍या गाड्या, वाहने, मर्यादेपलीकडे डेसिबलने वाजणारे डी.जे.चे कर्कश आवाज कारणीभूत ठरतात. त्यामुळे अस्वस्थता, चिडचिड, निर्माण होते.

कारखान्यातील निर्मिती प्रक्रियेतून निर्माण होणारे रसायने मिश्रित दूषित पाणी, नद्या, नाले, तलावात सोडले जाते. ते आजूबाजूच्या परिसराला त्रासदायक ठरते. आजूबाजूला पाण्याचे स्त्रोत असतील तर ते दूषित होतात. ते पाणी पिऊन मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडतात. आजूबाजूच्या विहिरीचे पाणी दूषित होते. बर्‍याच मोठ्या शहरात सांडपाण्याची विल्हेवाट व्यवस्थित नसते, ते एक कारण आहेच.

प्लास्टिकचा कचरा, जुनी इलेक्ट्रिक उपकरणे फेकून दिली जातात. ते नष्ट होत नसतात. प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी येऊनही सर्रास वापर सुरू आहे. आपल्यासह जनावरांनाही ते घातक आहे. ते खाऊन हजारो जनावरे मृत्युमुखी पडतात. मोठ्या मोठ्या शहरात रस्त्याच्या दुतर्फा पडलेले कचर्‍याचे ढीग आपण पाहतोच. हा कचरा अनेक दिवस पडल्यामुळे सडून त्यातून विषारी वायूची निर्मिती होते आणि नकळत यातूनच रोगांचा प्रादुर्भाव होतो. याबाबतीतही कडक धोरण अवलंबून कारवाई व्हायला हवी आहे.

निसर्गातील अर्थातच वातावरणातील बदलामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळण्यावर मोठा परिणाम होतो. निसर्गातील वादळ, पावसाने हजारो वृक्ष कोलमडून, उन्मळून पडतात. आपण शहराच्या सुशोभनासाठी, वाहतूक मार्गासाठीही अशीच हजारो वृक्षांची कत्तल करतो. एकीकडे वृक्षारोपण कार्यक्रम राबवतो. तर खूप वर्षांनी वाढलेले वृक्ष नष्ट झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळतो. आक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. प्रत्यकाने एक वृक्ष लावण्याचा, जगवण्याचा संकल्प करायला हवा. सरकारी वृक्षारोपण कार्यक्रमात पारदर्शकता हवी. नाहीतर त्याच त्या जागी दरवर्षी वृक्षारोपण केल्याच्या बातम्या आपण वाचतो. ही परिस्थिती बदलायला हवी.
पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची काही मानवनिर्मित, तर काही निसर्गनिर्मित कारणे आहेत. अनेक नवीन शोधांमुळे जीवनात सुख आले असे म्हटले जाते. अनेक मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहिल्या, कारखाने उभे राहिले, परिणामी खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आणि त्याचाच परिणाम पर्यावरणावर झाला. मानवनिर्मित कारणांनी प्रदूषण वाढून पर्यावरणाचा समतोल ढळत आहे. याला आपण सर्वच जबाबदार आहोत. त्याला आपणच पायबंद घालायला हवा. प्रत्येकाने मनावर घेतले तर सहज शक्य आहे. पण तेच होत नाही. अनेक अभियान राबवली जात आहेत. जसे प्लास्टिक पिशवीमुक्ती अभियान, स्वच्छता अभियान, अधिक कडकपणे राबवायला हवे. अजून बाजारपेठेत पिशव्या सापडतात. रस्त्यावर थुंकणार्‍यांच्या प्रमाणात कमी होत नाही.
प्रदूषण नियंत्रण महामंडळ, गावोगावच्या ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांनी, तसेच अभियानांची जबाबदारी ज्यांच्यावर दिली आहे, त्यांनी आपले कर्तव्य, जबाबदारी आत्मीयतेने पार पाडली तर हे सहज शक्य आहे. वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई करायलाच हवी. ती कोणी करावी हे नक्की करायला हवे. त्यात तू तू मै मै नको. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला आणि वृक्षारोपण करण्याकडे लक्ष दिले, वृक्षतोड थांबवली, तर पर्यावरणाचा समतोल राखणे अतिशय शक्य आहे. ही गोष्ट आपण करायलाच हवी आहे. यानिमित्ताने आपण ती करावी, त्यातच आपल्या सगळ्यांचे हीत आहे हे वेगळे सांगायला नको.

‘येणार्‍या प्रत्येक दिवशी आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. आपण सारेच या वसुंधरेचे सेवक आहोत याचे भान ठेवायला हवे. आपण कितीही प्रगती केली, तरी निसर्गाची ताकत अफाट आहे, याची प्रचिती येत आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण, पर्यावरणस्नेही म्हणून जगण्याचा संकल्प करायला हवा. पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे, याचे भान सगळ्यांनीच ठेवायला हवे हे मात्र यानिमित्ताने नक्कीच सांगावेसे वाटते. पर्यावरणाचा समतोल राखणे ही सामूहिक जबाबदारी आहे आणि कर्तव्यही आहे. पर्यावरण संवर्धन किंवा संरक्षण हा एक दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम नसून आपली एक कायमची बांधिलकी आहे.

Add comment