Lokvijay
blank

श्रुती ते रहमत व परत

प्रवास एका प्रत्यावर्तनाचा…

काल पुण्यात एका आगळ्यावेगळ्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन झाले. ओ. श्रुती नावाची केरळमधील कासरगोड येथील हव्यक ब्राह्मण कुटुंबातली एक हिंदू मुलगी काही वर्षांपूर्वी इस्लामी प्रोपागंडाला बळी पडून मुसलमान झाली व श्रुतीची रहमत बनली. परंतु, काही काळानंतर आर्ष विद्या समाजम ह्या हिंदू संघटनेचे आचार्य श्री मनोज ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पुन्हा स्वखुशीने स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. श्रुती ते रहमत ते परत श्रुती हा तिचा प्रवास कसा घडला ह्याबद्दल तिने एक छोटे पुस्तक लिहिलेले आहे. ‘ओरू परावर्तनतींटे कथा’ ह्या शीर्षकाचे हे आत्मचरित्रपर पुस्तक श्रुतीने तिची मातृभाषा मल्याळममध्ये लिहून २०१८ मध्ये केरळमध्ये प्रथम प्रकाशित केले होते. केरळमध्ये हे पुस्तक प्रचंड लोकप्रियही झाले होते परंतु दुर्दैवाने मल्याळम मध्ये असल्यामुळे केरळच्या बाहेर फारसे कोणाला या पुस्तकाबद्दल फारशी माहिती नव्हती. पण नंतर ‘स्टोरी ऑफ अ रिव्हर्शन’ या नावाने ह्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला आणि काल राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि पदमश्री गिरीश प्रभुणे ह्यांच्या हस्ते ‘कथा एका प्रत्यावर्तनाची’ ह्या नावाने हे पुस्तक काल मराठी भाषेतही प्रसिद्ध झाले.

साध्या-सोप्या भाषेत लिहिल्या गेलेल्या ह्या पुस्तकातून इस्लामी मतप्रसाराबद्दलच्या अनेक गोष्टी उघड होतात, अनेक मिथकांना छेद देणारे असे हे पुस्तक आहे. ‘जातिभेदाला आणि गरिबीला कंटाळून हिंदू लोक मुसलमान होतात’ असा एक तथाकथित पुरोगाम्यांचा लाडका सिद्धांत आहे. पण ते खरे नाही. इस्लाम ही एक प्रिडेटरी विचारसरणी आहे जी सतत भक्ष्याच्या शोधात असते. गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष, खालची-वरची जात ह्यातला कोणीही हिंदू कधीही इस्लामी विचारसरणीची शिकार होऊ शकतो कारण सर्वसामान्य हिंदू व्यक्तीला आपल्या धर्माची, त्यातल्या तत्वांची इतकी कमी माहिती असते की तो किंवा ती स्वतःला डिफेंड करू शकत नाही आणि अब्राहमीक विचारसरणीबद्दलचे आपले अज्ञान इतके अगाध असते की आपण त्यांच्या विचारसरणीवर मुद्देसूदपणे हल्ला करू शकत नाही.

आपल्या घरांमधून, शाळांमधून, धार्मिक संस्थांमधून सुद्धा आपण आपल्या मुलांना हिंदू धर्माबद्दल शास्त्रशुद्ध ज्ञान देतच नाही. त्यामुळे तरुणांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. मिशनरी आणि इस्लामिस्ट बरोबर ह्याच वैचारिक गोंधळाचा फायदा घेतला आणि त्यांच्या मते ‘काफिर’ असलेल्या व्यक्तींना इस्लाम स्वीकारायला प्रवृत्त करतात. श्रुतीचे नेमके तेच झाले. एकीकडे तिच्या कुटुंबात तिला ’सर्व धर्म सारखे’ ही शिकवण दिली गेली पण त्याचबरोबर स्वतःच्या धर्माबद्दल नीटसे काहीच सांगितले गेले नाही. दुसरीकडे ती शिक्षणासाठी घरापासून दूर राहताना बरोबरीच्या मुसलमान मैत्रिणी आणि त्यांचे कुटुंबीय ह्यांनी ठरवून विचारपूर्वक इस्लामबद्दल सतत इतकी सकारात्मक माहिती दिली की स्वतःच्या हिंदू असण्याबद्दल आधीच संभ्रमित असलेली श्रुती तिच्याही नकळत इस्लामच्या प्रभावाखाली आली. विशेष म्हणजे कोणा मुसलमान मुलाच्या प्रेमात पडून श्रुती इस्लामकडे आकर्षित झाली नाही तर स्वधर्माबद्दलचे अज्ञान आणि इस्लामबद्दलचे सतत देण्यात येणारे, वरवर तार्किक वाटणारे ज्ञान ह्या दोन गोष्टींचा एकत्रित प्रभाव तिच्यावर पडून ती मुसलमान झाली. हा सर्व प्रवास तिने प्रांजळपणे ह्या पुस्तकात मांडला आहे.

तिसरी गोष्ट म्हणजे, इस्लामचा योजनाबद्ध रीतीने प्रसार-प्रचार करण्यासाठी विविध भारतीय भाषांमधून मोठ्या प्रमाणात लिखित, ऑडिओ-व्हिज्युअल क्लिप्स, पुस्तके वगैरे साहित्य सहज उपलब्ध जे इस्लामची फक्त चांगली बाजूच मांडते. एकदा एखाद्या हिंदू व्यक्तीने इस्लाम स्वीकारला की मगच इस्लामचे कठोर वास्तव त्यांच्या समोर येते. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. अनेकदा असे अनेक हिंदू जे चुकीच्या समजुतीमुळे किंवा समजुतीच्या अभावामुळे इस्लाम धर्म स्वीकारतात, ते पुन्हा त्यांच्या हिंदू धर्मात परतू इच्छितात परंतु त्यांना योग्य वेळेला योग्य ते सहाय्य करणारी सुनियोजित सपोर्ट सिस्टम हिंदूंमध्ये अजून म्हणावी तशी मोठ्या प्रमाणावर सर्वत्र उपलब्ध नाही. श्रुतीच्या सुदैवाने तिला योग्य वेळी आर्ष विद्या समाजम ही संस्था सापडली आणि तिचे प्रत्यावर्तन यशस्वी झाले.

आपल्या भाषणात श्रुती काल म्हणाली’ हिंदू म्हणून जन्मले असूनही मला माझ्या धर्माच्या विश्वास, विधी किंवा दैवी संकल्पनांमध्ये कोणतीही निष्ठा नव्हती. मला मिळालेले इतिहासाचे ज्ञान शाळेत शिकलेल्या गोष्टींपुरतेच मर्यादित होते. माझ्या इस्लामिक मित्रांनी मला त्यांचा इतिहास शिकवला. त्यांनी मला इस्लामिक तत्त्वज्ञान तर शिकवलेच पण माझ्या धर्मावर टीका करताना त्यांना मी जेव्हा ऐकले, तेव्हा टीका करताना देखील त्यांना माझ्या धर्माबद्दल माझ्यापेक्षा किती अधिक माहिती होते हे पाहून मी थक्क झाले.’

सततच्या ब्रेनवॉशिंगमुळे श्रुती मंदिरे, मूर्तिपूजा आणि हिंदू रीतिरिवाज ह्यांच्यापासून हळूहळू दूर जाऊ लागली, ज्यामध्ये तिच्या मुस्लिम मित्र-मैत्रिणींनी दिलेले मूर्तीपूजेविरुद्धचे प्रचार साहित्य महत्त्वाचे ठरले. त्याचबरोबर इस्लाम हा कसा सर्व बाबतीत श्रेष्ठ आहे हेही तिच्या मनावर बिंबवले जात होतेच. ह्या द्विधा मनस्थितीत असताना श्रुती तिच्या घरी कासरगोडला गेली की तिचे आपल्या आई-वडिलांशी खटके उडत. त्यांना पूजा करताना बघितले की श्रुतीला त्यांची चीड येई. एकांतात ती नमाज पढत असे. मानसिक दृष्ट्या तिचे मतांतर पूर्ण झाले होते तरी तिला ब्रेनवॉश करणारे लोक खुश नव्हते. त्यांनी श्रुतीला औपचारिक रित्या मुसलमान व्हायचा सल्ला दिला.

ऑक्टोबर २०१३ मध्ये श्रुती तिचे घर सोडून मल्लपुरम येथे गेली आणि मौनथुल इस्लाम सभा येथे औपचारिकपणे इस्लाम स्वीकारला. तो विधीही अगदीच सोपा आणि सुटसुटीत होता असे ती म्हणते, ‘एका बाईने माझ्या डोक्यावर तीन वेळा पाणी ओतले आणि मला काही अरबी श्लोक तिच्या पाठोपाठ म्हणायला लावले आणि मी मुसलमान झाले. मी रहमत हे नाव स्वीकारले. मी माझ्या पालकांनी दिलेले श्रुती हे नाव, ज्याचा अर्थ वेद आहे ते नाकारले’. पुढे ती म्हणते की त्या संस्थेत धर्मांतरासाठी आलेल्या ६५ महिला होत्या. त्यात वृद्ध महिला, पूर्ण गर्भवती महिला, १६-१७ वर्षांच्या मुली, आणि दोन मुली असलेली महिला अशा सर्व महिलांचा समावेश होता आणि सर्व हिंदू होत्या. त्यांच्यापैकी फार कमी स्त्रिया श्रुतीसारख्या इस्लाम पटला म्हणून आल्या होत्या. बाकीच्यांना काही आर्थिक प्रलोभन तरी दिले गेले होते किंवा त्यांच्या मुस्लिम पतींनी किंवा प्रियकरांनी त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडले होते.

तिच्या आईवडिलांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार केली. श्रुतीला न्यायालयाच्या आदेशानुसार कासारगोडमध्ये परत आणले गेले, तेव्हा तिला मौनथुल इस्लामवाल्या लोकांनी तिच्या नव्या विचारांवर ठाम राहायचा सल्ला दिला. आई-वडील आजारी पडले तरी, त्यांनी जीव द्यायची धमकी दिली तरी त्यांचे ऐकू नको असे तिला सांगितले गेले. श्रुतीच्या सुदैवाने काही हिंदू संघटनांच्या मदतीने तिला आर्य विद्या समाजम ह्या संस्थेत पाठवले गेले जिथे आचार्य मनोज ह्या तिथल्या गुरूंनी तिच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊन, तिच्याशी तार्किकपणे वाद घालून तिला हिंदू धर्माची थोरवी पटवून दिली. इस्लामचा स्त्रीसंबंधी दृष्टिकोन काय आहे हेही तिला पुरावे देऊन पटवले गेले. हे सर्व डिबेट आणि पुरावे तिने ह्या पुस्तकात दिलेले आहेत.

रहमत बनलेली श्रुती परत एकवार श्रुती बनून स्वगृही तर परतलीच त्याबरोबरच ती एव्हीएसची पहिली पूर्णवेळ महिला कार्यकर्ती बनली. आज तिच्यासारख्याच ब्रेनवॉशिंगला बळी पडून इस्लाम आणि ख्रिश्चन बनलेल्या हजारो हिंदू मुलींना त्यांच्या मूळ धर्मात परत आणण्याच्या कामाला तिने स्वतःला वाहून घेतलेले आहे. श्रुतीचे हे पुस्तक म्हणजे केवळ घटनांचे वर्णन नाही तर हिंदू धर्मातील अध्यात्म आणि इस्लामी कट्टरतावादाबद्दलच्या मुद्द्यांचा सखोल अभ्यास आहे. एका बैठकीत सहज वाचून होणारे हे पुस्तक वाचकांना अनेक धक्के देते. स्वधर्माविषयी जागरूक सर्व हिंदूंनी नुसते वाचावेच नाही तर पाच कॉपी विकत घेऊन इतरांना भेट म्हणून द्यावे इतके मोलाचे हे पुस्तक आहे.

Add comment