Lokvijay

पाऊस येणार आहे, म्हणून..


पावसाचे अंदाज सुरू झाले आहेत. लवकरच आपल्या गावात, आपल्या अंगणात पाऊस कोसळणार आहे. त्या पावसाचे उत्साहाने स्वागत करताना, आपला उन्माद ऊतू जाऊ नये. पाऊस कवेत घेताना, त्या पावसाचे पाणी तुंबणार नाही. रस्ते खड्डेमय होणार नाहीत, रेल्वे वाहतूक कोलमडणार नाही, याची खातरजमा करून घेतली पाहिजे. पाऊस येणार म्हणून आपण खरंच सज्ज आहोत का, या प्रश्नाचे उत्तर फक्त सरकारनेच नव्हे तर सार्‍यानी शोधून पाहिले पाहिजे.

पावसाची चाहूल लागली. ढग डोकावून गेले. अर्थात हे ढग मान्सूनपूर्व पाऊस घेऊन येणार आहेत. त्यानंतर मान्सून दाखल होणार आहे. आता तो केरळमध्ये पोहोचतो आहे. या बातमीचा सुखद वारा महाराष्ट्रात पोहोचला आहे. त्यामुळे शेतकामांची लगबग वाढली आहे. शहरांत वेगवेगळ्या वस्तूंनी बाजारपेठा सजायला सुरुवात झाली आहे. या पावसाचे स्वागत करण्यासाठी आपण सारे खरंच तयार आहोत काय, हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारलाच पाहिजे.

गावखेडयांमध्ये घरांची छतदुरुस्ती झाली आहे. शेतकर्‍यांनी आपली शेतीही पेरणीयोग्य करून ठेवली आहे. बियाण्यांच्या खरेदीसाठी धांदल वाढली आहे. आता अंदाजाप्रमाणे मोसमी वारे पाऊस घेऊन येतील. पोरांचा जल्लोश होईल. शाळकरी मुले पावसात धिंगाणा घालतील. पहिल्या पावसाच्या आनंदात आपण सारे हरवून जाऊ. पावसावरच्या कविता सोशल मीडियावर शब्दबद्ध होतील. मनसोक्त भिजण्याचा आनंद सारे शेअर करतील. काही फोटोही येतील. पाणी तुंबल्याच्याही बातम्या होतील. त्यामुळे आनंददायी पाऊस अनेकांना नकोसा वाटेल. हे दरवर्षी ‘नेहमीच येतो पावसाळा’ याप्रमाणे घडेल. आनंद आपल्याला हवाहवासाच असतो, पण पाणी तुंबल्याने कुणाचे हाल होऊ नये, यासाठी आपण किती जागरूक असतो, हा प्रश्न आजच आपल्याला अस्वस्थ करणारा ठरला व उपाययोजना केल्या तर पाऊस कुणालाही नकोसा वाटणार नाही.पाणी तुंबण्याचे प्रकार शहरातच होत असतात. त्यासाठी काय करावे, हे पाणी साचल्यानंतर, घरात पाणी घुसल्यानंतरच कळते. पावसापूर्वी करावयाच्या तयारीत आपण दर वर्षी नित्यनेमाने नापासच होत असतो. या वर्षी ही वेळ येणार नाही, याची ग्वाही कुणीही देत नाहीत. नालेसफाई झाली, सांगितले जात असले तरी नाल्यातून काढलेला मलबा अद्याप काठावरच आहे. तो हटवण्यासाठी पाऊस येण्याची वाट बघत बसलोत तर काठावरचा मलबा पुन्हा जिथचा तिथेच जाणार आहे. मुंबईत रस्त्यावर पडलेले छोटे खड्डे पावसाने मोठ्ठे होणार आहेत. डागडुजी करून भागणार नाही, पण त्या खड्डयातला पैसा पुन्हा खड्डयातच जिरवण्याचे गोड स्वप्न पाहणारे महाभाग कमी नाहीत. मुंबईत उपनगरीय रेल्वे रुळांच्या बाजूला साठवून ठेवलेल्या कचर्‍याची परिस्थितीही याहून वेगळी नाही. साठलेला कचर्‍याचा ढीगच पाणी थोपवतो आणि रेल्वे रुळावर पाणी येताच मुंबईकरांची वाट लावतो. अनेक रेल्वे स्थानकांनजीक प्लॅस्टिकचा कचरा साठून राहतो, तो पाणी थोपवतो. दोष हा कचरा साठवून ठेवणार्‍यांचा असतो, पण बदनाम पाऊस होतो. असे पावसाला बदनाम करण्याचे कटकारस्थान कुणी करू नये. पाऊस येतो आहे, त्याचे स्वागत करण्यासाठी ‘स्वच्छ’तेची कामे उरकली पाहिजेत.

मोठया शहरांमध्ये ही परिस्थिती असताना, गावखेडयांत मात्र पावसाचे स्वागत करणारा शेतकरी त्यासाठी पाहिजे तेवढी काळजी घेत असतो. उन्हाळ्यात शेतीची सर्व कामे हातावेगळी करतो. शहरातच ही उदासीनता दिसते, याची काळजी आपण सा-यांनी वाहिली पाहिजे. प्लॅस्टिक रस्त्यावर, रेल्वेस्थानकावर, रेल्वेतून बाहेर फेकण्याचे प्रकार टाळले पाहिजे. पाऊस पेलण्यासाठी आपणही असे सज्ज झाले पाहिजे.

पावसाने मनमोकळेपणाने यावे, धो-धो कोसळावे. शेतकर्‍यांचे स्वप्न साकार व्हावे. पाऊस पडणारच आहे. तो कमी-अधिक प्रमाणात पडेल, पण त्या पावसाचा थेंब अन् थेंब साठवून ठेवणे आमच्या हातात आहे. त्यासाठीचे प्रयत्न आपल्याच राज्यात काही गावांनी केले आणि ती गावं जलसमृद्ध झालीत. त्या हिवरेबाजार, राळेगणसिद्धीसारख्या गावांची प्रेरणा आम्ही का घेत नाही, हा सवाल पाणीटंचाईचे ओझे वाहणार्‍या मनाला अस्वस्थ करणारा ठरला पाहिजे. जलसमृद्ध गावांची संख्या वाढली पाहिजे. ही जलसमृद्धीची चळवळ फक्त गावातील शेतकर्‍यांनीच राबवणे गरजेचे नसून, मोठया शहरांमध्येही त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शहरात होणारी पाण्याची उधळपट्टी थांबवली पाहिजे. थेंबाथेंबाचे महत्त्व ओळखले पाहिजे.

पावसात खेळण्याचा आनंद द्विगुणीतच झाला पाहिजे. कुणाच्याही जिवावर तो बेतणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. पाऊस येताच पावसाळ्यातल्या सहली जातील. आनंद साजरा करण्याचा हक्क हिरावला जाऊ नये, पण पाऊस अंगावर घेताना, भिजताना, नदी-नाल्यात पोहताना काळजी घेऊ या. पावसात भिजताना उत्साह असावा, पण त्यात उन्माद नसावा. मुख्यत्वे तरुणाईने याची काळजी वाहिली पाहिजे.

Add comment