Lokvijay

१२ वी नंतर करिअरची निवड करताना…!

श्रीराम गीत,
करिअर काऊन्सिलर

नुकताच बारावीचा निकाल लागलाय. यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन! काही कारणाने यश नाही मिळाले अशा विद्यार्थ्यांनी वेळ न घालवता जुलै-ऑगस्टमध्ये होणार्‍या फेर परीक्षेची तयारी आजपासून सुरू करावी ही पालकांना व विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती येथेच करतो. उत्तुंग यश मिळवणारे एक टक्काच असतात, हे समजून घ्यावे. जेमतेम काठावर पास होणार्‍या सार्‍यांना आता यानंतर वेगळा रस्ता धुंडाळायचा आहे याची पूर्ण कल्पना येते. पण घालमेल होत असते ती मधल्या सार्‍यांची. या निकालाच्या तांत्रिक विश्लेषणात फारसे न जाता या तीनही गटांसाठी काहीतरी उपयुक्त असे आज मी येथे देणार आहे. सुखवस्तू गटातील, द्विपदवीधर पालकांची निकालांवर प्रथम प्रतिक्रिया अशी होती की, निकालाची ही टक्केवारी भरमसाट गुणांच्या वाटपातून होते. हे बरोबर नाही. याला आळा घातलाच पाहिजे. याउलट बारावीनंतर शिक्षण न घेता आलेल्या गटातील पालकांची स्वागतार्ह आणि मुलांचे कौतुक करणारी प्रतिक्रिया आली.

नापासांची संख्या आता जेमतेम पाच-सहा टक्क्यांवर आली आहे. याचा त्यांना खूप आनंद होत होता. खरं सांगायचं झालं तर पहिली ते बारावी क्लासेस लावून शिक्षण घेत आलेल्या या मुलांची खरीखुरी क्षमता सर्व प्रकारच्या प्रवेश परीक्षांतून कस लागून कळते. ते निकाल तर अजून लागायचेच आहेत. फक्त जेईई या परीक्षेचा निकाल लागलेला आहे. त्याचा दोन वर्षांत पाच-सहा लाख रुपये फीवरती देऊन तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यातील एक पालक मला फोनवर म्हणाले की, बारावीचे पीसीएमचे मार्क तर किती छान आहेत. मग जेईईचेच इतके कमी कसे? मुलाला बारावीत ७० टक्के मिळाले, तर जेईईमध्ये जेमतेम वीस टक्के मिळाले. असेच येत्या तीन आठवड्यांत विविध प्रवेश परीक्षांचे लागणारे निकाल धक्कादायक असतील असा अपवाद हजारात एखादाच.

८५ ते १०० टक्के मिळवणारे विद्यार्थी

अशा उत्तुंग यश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांसमोर प्रश्न असा असतो की, हे घेऊ का ते घेऊ? नेमके लिहायचे झाले तर, आयआयटीमध्ये हे मिळतेय, बिट्समध्ये ते मिळतंय, पण मला तर एरोस्पेससारखं वेगळं काहीतरी पाहिजे होतं. मग त्यांची आणि त्यांच्या पालकांची एरोस्पेसवाले करतात काय याची चौकशी सुद्धा न करता उलघाल सुरू होते. भारतात त्यातील संधी मुख्यतः संशोधन केंद्रात, सरकारी नोकरीत आहेत हे पण माहिती करून घ्यायचे नसते. भारतात विमान बनते का? अशा साध्याशा प्रश्नाच्या उत्तरातून या सार्‍याची सुरुवात होऊ शकते. एखाद् दुसरा शब्द ऐकल्यानंतर तोच हट्ट धरून बसणार्‍या मुलांना त्यातील माणसे काय करतात याचे उत्तर माहीत नसते व शोधण्याची इच्छा नसते. बायोटेक, एस्ट्रोफिजिक्स, एक्चुअरी, फॉरेन्सिक सायन्स, न्युरोमेडिसिन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हॅकिंग, गेमिंग करताना शेवट सायकॉलॉजी, फायनान्स, शेअर बाजार अशा शब्दांचा सुळसुळाट खूप चर्चेत आढळतो. क्वचित एखादा कॉमर्सचा हुशार मुलगा म्हणतो मला इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये जायचे आहे. कला शाखेतील ९५ टक्के मार्क मिळवलेल्या एका मुलीशी बोलताना तिने सांगितले की, मला इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये काम करायला आवडेल. आदल्याच दिवशी इराणच्या अझरबैजान भागात झालेल्या अपघातात कोण मेले व त्यांचे नाव काय या प्रश्नाचे उत्तर मात्र तिला माहितीही नव्हते.

सध्या विविध संस्थांमध्ये बीकॉमच्या जोडीला एसीसीआय हा अभ्यासक्रम शिकवला जाईल अशी जाहिरात दिसते. हे लोक करतात काय व असा कोणी माणूस सापडला होता का याचे उत्तर मात्र मुले व पालकांकडून होकारार्थी मिळत नाही. सीएफए, सीपीए हे शब्द असेच. यंदाच्या बारावीला कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतून छान यश मिळवणार्‍या सार्‍या विद्यार्थ्यांनी यावर थोडासा विचार करावा.

करिअर शिकल्यानंतर होते हे विद्यार्थी म्हणजे पंचाऐंशी ते शंभर टक्के मार्क मिळवलेले विद्यार्थी होत. मला काय शिकायचंय त्याचा विचार आधी केला तर काय बनायचं आहे ते शक्य होते. स्कोप, पॅकेज, परदेश यथावकाश सुरू होणार याची खात्री बाळगावी.

६० ते ८४ गुणांचा मोठा गट

या मध्यम गटातही दोन गट पडतात. पहिला असतो सातत्याने ६० ते ८० टक्के मार्क मिळवणारा. असे अगदी मोजके असतात, तर काहींना प्रथमच असे खूप मार्क दिसलेले असतात. सातत्य राखणार्‍या विद्यार्थ्यांना पुढे काय करायचे याबद्दल नेमकी स्वप्ने असून त्यांचे उद्दिष्ट ठरलेले असते. विज्ञान शाखेत असतील तर इंजिनीअर, फार्मसी किंवा आर्किटेक्ट या पलीकडे ते मागणी करत नाहीत व त्यातील प्रवेश परीक्षा देऊन मार्गक्रमण सुरू करतात. मात्र विज्ञान शाखेत प्रथमच असे मार्क पाहिलेले सारेजण मोठी मोठी न कळणारी स्वप्ने पाहायला सुरुवात करतात. मिळेल तिथे जाऊन मेडिकल करणारा हाच गट. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डाटा सायन्स, रोबोटिक्स अशा ऐकलेल्या शब्दातून त्यांची सुरुवात होते. बायोलॉजी विषय आवडतो असे म्हणणार्‍या विद्यार्थ्यांना जेनेटिक्स, मायक्रो बायोलॉजी, बायो इन्फॉर्मेशन, मरीन बायोलॉजी अशा अगदी थेट संशोधनाकडे जाणार्‍या विषयांची भुरळ पडलेली असते. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नीट परीक्षेमध्ये वाजलेला पूर्ण बोर्‍या लक्षात आलेला असतो. त्यातून काहीच मिळणार नाही हे कळल्यानंतर इतर स्वप्न पाहायला सुरुवात करण्यात हा गट सध्या भरपूर मनस्ताप करून घेत आहे. खरे तर या गटाने अकरावी-बारावीला गणित सोडून दिल्यामुळे स्वतःचीच कोंडी करून घेतलेली असते. यांच्यासाठी सरळ साधा एक रस्ता असतो तो म्हणजे केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी या झालेल्याच अभ्यासातून एक पहिली पदवी चांगल्या मार्काने मिळवायची. ती पदवी हाती आल्यानंतर हा रस्ता थेट पुन्हा पदवीधर झाल्यामुळे विविध उपयुक्त संधींकडे घेऊन जातो.

डिफेन्ससाठी विविध प्रवेश परीक्षा, बँकांसाठीच्या संधी, इन्शुरन्स सेक्टरमध्ये जाण्याकरताचे रस्ते, मुख्य म्हणजे एमबीएसाठीचा रस्ता यानंतर सहज उघडतो. याच गटातील वाणिज्य शाखेची मुलं जरा गंमती गंमतीच्या गोष्टी बोलायला सुरुवात करतात. सीए करून टाकू. मुलगी असेल तर ती सीएसच्या मागे जाते. दोन्ही करायला उत्साहाने प्रवेश परीक्षा दिली जाते. त्यासाठी पंचवीस, तीस हजारांचा क्लास लावणे हे तर गरजेचे आहे. पण या गटाच्या एक लक्षात येत नाही की, आपले मार्कांमध्ये सातत्य कधीच नव्हते. थेट आकड्यातून बोलायचे झाले, तर नववीचे ७० टक्के असलेला मुलगा दहावीमध्ये ८२ टक्के मार्क्स मिळवून कॉमर्सला प्रवेश घेतो त्याचवेळी सीए, सीएसच्या नादी लागून क्लास लावतो अशांपैकी ७० टक्के मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी अपयश येते. काही मंडळींना नवीनच काहीतरी करावेसे वाटते. कारण कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून चांगले हाती काही लागलेले नसते. गेली २० वर्षे चालू असलेले बीबीएचे विविध अभ्यासक्रम आता विस्तारले आहेत. त्याचे आकर्षण गेल्या दोन वर्षांत खूप वाढले आहे.

एक छानशी माहिती पालकांसाठी, तीन वर्षांत एकंदरीत अठरा विषय किमान बीबीएसाठी नव्याने शिकावे लागतात. एका विषयाचे पुस्तक समजा ३०० पानांचे असेल तर साडेपाच हजार पाने किमान वाचली पाहिजेत ना? ही वाचण्याची तुमच्या मुला-मुलींची शक्यता व क्षमता नसेल तर कोर्स पूर्ण होतो. फी भरपूर असल्यामुळे तीन-चार लाख रुपये संपतात. नोकरीसाठी वणवण स्रुरू होते. तेव्हा असे लक्षात येते की, जेमतेम दोन लाख वार्षिक पगाराची नोकरी मिळत आहे. हीच मुले नंतर एमबीएचा रस्ता धरण्याचा प्रयत्न करतात. पण अभ्यासाचा, वाचनाचा, गणिताचा संदर्भ सुटलेल्या या मुलांना एमबीए प्रवेश परीक्षा कठीण असल्यामुळे आणि त्या परीक्षेला ७० टक्के इंजिनीयर्स बसत असल्यामुळे कुठल्या तरी सामान्य अशा कॉलेजच्या प्रवेश मिळतो. मग लक्षात येते की, एमबीए करून सुद्धा पगारात फक्त वार्षिक ५० हजार रुपयांची वाढ झाली आहे. मात्र त्यासाठी आयुष्याची मोलाची दोन वर्षे आणि वडिलांचे अजून पाच लाख रुपये संपलेले असतात.

४५ ते ६० टक्क्यांसाठी

या तिसर्‍या गटातील मुले-मुली सहसा व्यवहारिक व वास्तवाचा विचार करून निर्णय घेतात असा माझा अनुभव. गेल्या पाच-सहा वर्षांत कौशल्य विकासातील पदव्या उपलब्ध झाल्या आहेत. ब्युटी अ‍ॅण्ड कॉस्मेटोलॉजी, रिटेल मॅनेजमेंट, डाएट वेलनेस अ‍ॅण्ड योगा, ट्रॅव्हल टुरिझम, हॉस्पिटॅलिटी, इव्हेंट मॅनेजमेंट, कस्टम अ‍ॅण्ड फॉरिन ट्रेड मॅनेजमेंट यातील पदवीचा अभ्यास कोणताही बारावी झालेला विद्यार्थी करू शकतो. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांकरिता बीएससी इन डायलिसिस टेक्निक, परफ्यूजनिस्ट, रेडिओलॉजी अ‍ॅण्ड इमेजिंग, ऑपरेशन थिएटर असिस्टंट, ऑप्टोमेट्रिस्ट, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निक यातील सुंदर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पदवीनंतर मास्टर्स अभ्यासक्रम पूर्ण करून परदेशात नोकरीच्या संधी मिळू शकतात. डेंटल टेक्निशियन, डेंटल मटेरियल हे अभ्यासक्रम सुद्धा पूर्ण करता येतात. अ‍ॅग्रो मार्केटिंग संदर्भातील काही अभ्यासक्रम पूर्ण करून ग्रामीण भागातील कृषी उत्पादनांच्या विक्रीचे जाळे विस्तारण्यामध्ये मोठा सहभाग मिळू शकतो. बी, बियाणे, खते, कीटकनाशके, शेतीला पूरक अवजारे यासाठी खूप मोठे मार्वेâटिंगचे जाळे लागते. यातील कोणताही अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता ४५ टक्के गुण पाहिजेत.

Add comment