Lokvijay
blank

अपघात एक, प्रश्न अनेक

डॉ. राजेंद्र बर्वे,
मानसोपचार तज्ज्ञ

पुण्यातील ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरण अनेक प्रश्नांना जन्म देणारे आहे. मुलांचा पालकांवरील वाढता दबाव, चंगळवादाच्या कळसावर पोहोचलेल्या संकल्पना, स्वत:ची ओळख महागड्या वस्तूंशी जोडण्याची अहमहमिका हे सगळे मुद्दे या अपघाताने अधोरेखित झाले आहेत. दुसरीकडे, पालकांबरोबरच शाळा आणि सुरक्षा यंत्रणेची भूमिकाही तकलादू होत असल्याचे या घटनेने दाखवून दिले आहे. त्यासंबंधीचे हे विचारमंथन.

पुण्यामध्ये मध्यरात्री एका अल्पवयीन मुलाने आलिशान आणि अद्याप नोंदणीही न झालेली चारचाकी अत्यंत वेगाने चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोनजणांचा मृत्यू झाल्याची घटना चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली. पूर्वीही या स्वरूपाचे अपघात झाले आहेत. काही काळ चर्चेत राहून ते विस्मृतीत जातात आणि तशाच स्वरूपाची एखादी दुर्घटना घडल्यानंतरच त्या स्मृती जागृत होतात. मात्र या सर्वात मुख्य प्रश्नांवर कधीच गांभीर्यपूर्वक लक्ष दिले जात नाही. त्यामुळेच प्रश्न तसाच राहतो. अशा प्रकारे समोर येणारे प्रत्येक प्रकरण वेगळे असते. त्यामुळे सर्वांगाने विचार करून मत नोंदवावे लागते. या पार्श्वभूमीवर ताज्या घटनेसंदर्भात मतप्रदर्शित केले तर ते एकांगी ठरण्याचा धोका आहे. वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीचा आधार घेता या मुलाच्या वागण्यामध्ये बेशिस्तपणा, उर्मटपणा असल्याचे दिसते.

कदाचित याचीच एक प्रकारे त्याला नशा असावी. स्वत:च्या श्रीमंतीची, पैशाची नशा व्यक्तीच्या विवेकावर दूरगामी परिणाम करते. तशातच दारूच्या अमलाखाली हे विचार अधिक क्षीण होतात. मुळात इतक्या रात्री-बेरात्री बारमध्ये बसून मद्यप्राशन करायचे आणि वेगाने तसेच बेदरकारपणे गाडी चालवून दुसर्‍याच्या जीवाला धोका उत्पन्न करायचा, ही वर्तणूकच चुकीच्या वळणावर गेलेल्या आयुष्याची कथा समोर मांडते. यावेळी निर्भया प्रकरणाप्रमाणेच केवळ कमी वय असल्यामुळे आरोपीला वेगळी वागणूक द्यायची का, हा प्रश्न पडतो. त्यातच सध्याच्या बदलत्या काळात नेमक्या कोणत्या वयापर्यंतच्या मुला-मुलींना अल्पवयीन समजावे, या प्रश्नाचे उत्तरही शोधावे लागते. कारण आधी स्पष्ट केल्याप्रमाणे आता काळ बदलला आहे. त्यामुळेच या धोरणांमध्ये आणि कायद्यामध्ये आता काही बदल करणे गरजेचे आहे.

ताज्या घटनेला कारणीभूत असलेला मुलगा अल्पवयीन असला तरी त्याला मोठ्यांचे नियम आणि निकष लावावे आणि त्याच्या या चुकीकडे कोणत्याही परिस्थितीत दया दाखवू नये, असे स्वत: मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट करणे ही यातील एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल. मात्र यासंबंधी कायदा काय सांगतो, हे पाहणे गरजेचे आहे. शेवटी कायदा सर्वांसाठी समान असतो. त्यामुळेच अशा प्रकारणांमध्ये पुढे जाण्यासाठी मुख्य प्रश्नावर सांगोपांग चर्चा होण्याची आवश्यकता आहे. अल्पवयीन मुलाच्या हातात अतिशय महागड्या आणि नव्या कोर्‍या कारची किल्ली देणे, त्याने ती मागणे ही घटना सध्याच्या वाढत्या ‘पियर प्रेशर’कडे लक्ष वेधून घेते. सध्या सर्व वर्गांमध्ये स्वत:कडून पैसा, श्रीमंती दाखवण्याची प्रवृत्ती वाढली आहे. चंगळवाद वाढतो आहे. माझ्या मते ते गरीब-श्रीमंतीशी फारसा संबंधित नाही, कारण सगळ्याच स्तरातील या वयाच्या मुला-मुलींना चंगळ करायला आवडते. एखाद्या शेतकर्‍याच्या घरातला मुलगा मोटरसायकलची मागणी करतो, एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा-मुलगी आयफोनची मागणी करतात, तर कोणी उच्चवर्गीय अशा आलिशान गाड्यांचा हट्ट धरतात. मात्र या सगळ्यांतील समान धागा हा की, आता पालक मुलांपुढे दबून राहताना दिसत आहेत. मुलांचा दबाव स्पष्ट दिसत आणि जाणवत आहे. एक प्रकारे घरामध्ये पालकांना ओलिस धरण्याचा हा प्रकार दिसतो.

पूर्वीच्या काळी आई-वडील मुलांवर दबाव आणायचे. आपल्या अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर लादायचे. आमच्या मनासारखे केले नाही तर तुम्हाला अपेक्षित गोष्ट मिळणार नाही, अशी धमकी दिली जायची. मात्र आता बरोबर याच्या उलट स्थिती दिसते. मुलांनी एक गोष्ट मागितली तर दोन आणि दोन मागितल्या तर तीन गोष्टी समोर हजर असतात. पालकांनीच त्यांना अशी सवय लावली आहे. त्याचीच परिणिती अशा घटनांमधून समोर येते. कोणतेही साधन आपल्या सोयीसाठी असते. या अर्थाने बघता चारचाकी हे प्रवासाचे एक माध्यम आहे. मात्र त्याचा विसर पडून त्याभोवती अनेक गोष्टी रचल्या गेल्या आहेत. समाजातील पत, प्रतिष्ठा, मानसन्मान याचे द्योतक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. अशातच हट्ट करून एखादी गोष्ट मिळते हे समजल्यानंतर मुले त्याचा अस्त्र म्हणून वापर करतात आणि तसेच वागतात. सध्या हे सर्व वर्गांमध्ये पाहायला मिळते. यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे मुलांना अशा किमती वस्तूंचे आकर्षण असते. आपले व्यक्तिमत्त्व त्याद्वारे प्रदर्शित होत असल्याचा विचार त्यांच्या मनात पक्का असतो. माझ्याकडे अमूक गाडी आहे, अमूक एक फोन मी वापरतो, अमूक एका ब्रँडचे कपडे वापरतो हे समोर मांडताना ते आपल्याकडील या वस्तूंनाच स्वत:ची ओळख समजू लागतात आणि त्याप्रती अधिक आग्रही होतात. पुढे पुढे ही स्पर्धा वाढत जाते आणि घातक ठरते.

घरात कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी सतत आग्रही असणार्‍या मुलांपुढे पालकही हात टेकतात आणि त्यांच्या मागण्या मान्य करतात. पण इथे आपण किती मोठी चूक करतोय, हे त्यांच्या लक्षात येत नाही. आपला मुलगा वा मुलगी एखाद्या ग्रुपबरोबर फिरल्याचे त्यांना पटत नसले तरी मुलांच्या भ्ाीतीने ते आपला नकार व्यक्त करत नाहीत. बिघडत जाणार्‍या परिस्थितीला ही बाबही कारणीभूत आहे. पालकांनी मुलांपुढे आपली खरी मते आणि विचार मांडायलाच हवे. आपली मुले कुठे जातात, काय करतात हे पालकांना माहिती असायलाच हवे. असे असताना ताज्या प्रकरणाप्रमाणे आपला मुलगा नवी कोरी गाडी घेऊन जात असल्याचे पालक जाणत असतील आणि तरीही त्याला अडवत नसतील, तर हा त्यांचाही बेदरकारपणा, बेजबादारपणा आहे, असे म्हणावे लागेल. तुला हवे ते घेऊन जा, आपल्याकडे भरपूर पैसे आहेत; तुला हवे तसे उडव, ही शिकवण असेल तर वेगळे काहीच घडणे शक्य नाही. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल, तर बर्‍याच गोष्टी सावराव्या लागतील. त्यातील एक म्हणजे एखाद्या संस्थेबद्दल समाजातील प्रत्येकाला धाक असायला हवा. कायद्याचा धाक असायला हवा. एखाद्या गुन्हेगाराला पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा खाऊ घातला जात असेल, तर समाजाची दिशा किती बिघडली आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

पोलिसांचा दरारा वाटला पाहिजे पण त्याच वेळी त्यांचा आधारही जाणवला पाहिजे. त्यामुळेच अशा घटना कमी करण्यासाठी पोलिसांनीही पुढाकार घेतला पाहिजे. याची गरज लक्षात घेऊनच मध्यंतरी मुलांचे समुपदेशन करण्यासाठी आमंत्रण आले असता मी एका पोलीस ऑफिसरलाही बरोबर येण्याची विनंती केली. त्यांनी मान ठेवत कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि आम्ही दोघांनी मुलांशी एकत्र संवाद साधला. मानसशास्त्रज्ञ मानसिक बाजू सांभाळत असतील, तर कायदेशीर बाजू काय आहे, हे पोलीस समजून सांगू शकतात. मोठे व्हायचे म्हणजे काय, जबाबदार नागरिक व्हायचे म्हणजे काय आणि यात याबाबत कायदा काय म्हणतो हे पालक आणि शिक्षकांबरोबरच या यंत्रणेनेही मुलांना सांगितले पाहिजे. असा सुसंवादच तरुणाईला योग्य मार्गावर ठेवू शकेल. खेरीज अशा दुर्घटना शाळा आणि महाविद्यालयांच्या जबाबदारीवरही प्रकाश टाकून जातात, कारण शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांची घोकंपट्टी नसते तर जगण्याचे धडे देणेही अपेक्षित असते. सध्याची शिक्षणपद्धती ही अपेक्षा पूर्ण करते की नाही, हेदेखील यानिमित्ताने तपासायला हवे.

सध्या नाईट लाईफची जोरदार चर्चा आहे. ते असावे की नसावे, याबाबत विविध मते ऐकायला मिळतात. ताजी घटना या विषयाचा एक कोपराही प्रकाशित करते. माझ्या मते, सध्याच्या अनेक समस्या दिवस आणि रात्रीचे नैसर्गिक गणित न पाळण्याने उद्भवत आहेत. शेवटी निसर्गाचे एक चक्र आहे. मात्र सध्या ते तोडून-मोडून टाकले जात आहे. मुले वा त्यांचे पालकही रात्री अडीच-तीनपर्यंत जागतात आणि सकाळी दहाच्या पुढे उठतात. सगळेच कशा ना कशात तरी रमलेले असतात. हे सध्याच्या समाजाचे सगळ्यात वाईट चित्र आहे. खरे पाहता सोशल मीडियामध्ये फारसे काहीही ठेवलेले नाही. मात्र एकमेकांना भेटायला बोलावण्यासाठी, टाईमपास करण्यासाठी त्याचाच गैरवापर केला जातो आणि परिस्थिती शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही आरोग्यांसाठी हानिकारक ठरू लागते. शरीरातील अवयवांचा र्‍हास होण्यासही ही बदलती आणि सदोष मानसिकता कारणीभूत ठरते. थोडक्यात, घटना एक असली तरी त्या आनुषंगाने अनेक घटक चर्चेत येतात. त्यावर तितक्याच गांभीर्यपूर्वक चर्चा व्हायला हवी, कारण ती झाली आणि तितक्याच गांभीर्यपूर्वक ऐकली तरच कदाचित पुन्हा अशा घटनांची वार्तांकने वाचायला मिळणार नाहीत. अन्यथा, परिस्थिती आणखी बिघडत जाईल, हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे.

Add comment