संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्णयानुसार, १९७२ साली स्टॉकहोम या शहरात मानव आणि पर्यावरण या विषयावर झालेल्या बैठकीत ५ जूनला जगभर पर्यावरण दिवस साजरा व्हावा, असा ठराव करण्यात आला. दरवर्षी पर्यावरण दिवस कोणता तरी एक विषय घेऊन साजरा करण्यात येतो. या वर्षीचा विषय आहे, ‘प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीच्या योजना’. तसेच दरवर्षी कोणता तरी एक देश पर्यावरण दिवसासाठी यजमान देश म्हणून ठरवण्यात येतो. या वर्षी यजमान देश आहे कोत द ‘ईवोआर (ण्टू, ‘गन्दग). पर्यावरणाबाबत जागरूकता जनमानसात निर्माण व्हावी, देशोदेशी नवीन योजना आखल्या जाव्यात, पर्यावरण रक्षणासाठी नवीन उपाय मिळावे, पाणथळ जागा, पशू- पक्ष्यांचे अधिवास नष्ट होऊ नयेत, जैवविविधतेचा नाश थांबवा आणि वायू व जल प्रदूषण आणि आपापल्या परिसरातले प्रदूषण थांबवावे, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मानवी प्रयत्नांना यश मिळावे, म्हणून हा दिवस साजरा करण्यामागचा हेतु आहे.
यावर्षी पर्यावरण दिनाचा विषय आहे ‘प्लास्टिक प्रदूषण.’ जगभर कोरोनामुळे पसरलेली भीती, भय याचे सावट आणि लॉकडाऊनमुळे पसरलेली बेकारी व बेरोजगारी यामुळे नकळत प्लास्टिकचा वापर भरपूर वाढला. प्लास्टिकच्या पिशव्या बाजारातून वस्तू आणण्यासाठी सर्रासपणे वापरल्या जाऊ लागल्या. आता महामारी संपल्यानंतरसुद्धा प्लास्टिकच्या पिशव्यांचा शिरकाव प्रत्येक ठिकाणी झालेला आहे. एकदा वापरून कचऱ्यामध्ये टाकलेल्या या वस्तू इतर कचऱ्याबरोबर जमिनीत जाऊन बसतात आणि मातीचे प्रदूषण, हवेचे प्रदूषण, जलप्रदूषण यास कारणीभूत ठरतात.
मायक्रो प्लास्टिक नावाच्या सूक्ष्म प्लास्टिकच्या कणांनी सध्या धुमाकूळ घातला आहे. हे सूक्ष्म प्लास्टिकचे कण अनेक सौंदर्य प्रसाधने जसे की, चेहन्यासाठी वापरण्यात येणारे सिंथेटिक स्क्रब, टूथपेस्ट इत्यादींमधून वातावरणात सोडले जातात. वाऱ्यामुळे तसेच शहरातील नदी-नाल्यांमुळे हे कण समुद्रात जमा होतात. समुद्री जीव जसे की, अनेक मासे शिंपल्या इतर समुद्री वनस्पती यामध्ये हे कण शोषले जातात. जे मासे केवळ समुद्राचे पाणी गिळून, त्यातले खाद्य व पोषक तत्त्वावर जगतात, ते हे सूक्ष्म प्लास्टिकचे कणसुद्धा गिळतात. यामुळे माशांचे स्वास्थ्य बिघडते व त्यांना प्रजोत्पादनास अडचणी येतात. असे प्रदूषित मासे आपण खाल्ल्यास आपल्याला अनेक रोगराई होण्याचा धोका संभवतो. सध्या बाजारात उपलब्ध असलेले प्लास्टिकचे काटे-चमचे, खाद्य ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बशा किंवा डबे यातून हे सूक्ष्म प्लास्टिकचे कण अन्नामध्ये सुद्धा प्रवेश करतात. सण- समारंभासाठी घरोघरी या वस्तू आणल्या जातात. हॉटेलमधून गरमागरम चमचमीत येणारे पदार्थ सुद्धा प्लास्टिकच्या डब्यांमधून घरी येतात. गरम पदार्थ आणि प्लास्टिक एकत्र आल्यामुळे अन्नावर प्रक्रिया होऊन त्याची गुणवत्ता कमी होऊ शकते.
प्रयोगादाखल एक मोठी पिशवी घेऊन त्यात महिनाभराच्या प्लास्टिकच्या वस्तू ज्या आपण कचऱ्यात फेकतो, त्या जमा कराव्यात, महिना संपल्यावर आपलेच आपल्या निदर्शनास येते की, एक कुटुंब किती प्लास्टिकचा कचरा निर्माण करू शकते. मग अनेक प्रश्न पडतात जसे की, मुळात प्लास्टिक आपल्या आयुष्यात कुठून येते? प्लास्टिकचे प्रदूषण कसे कमी करावे? सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे काय? कोणत्या प्रकारचे प्लास्टिक वापरणे योग्य आहे?
अमेरिकेच्या सियाटल या शहरात पर्यटनासाठी हॉटेलमध्ये राहत असताना आमच्यासाठी कॉफीचे मशीन होते. या मशीनमध्ये कॉफी टाकण्यासाठी कॉफी असलेले छोटे प्लास्टिकचे ट्रेहोते आणि हे ट्रे प्लास्टिकच्या पॅकमध्ये देण्यात येत असत. त्याचबरोबर टिश्यू पेपरचे एक पॅकेट, प्लास्टिकमध्ये पॅक केलेलं प्लास्टिकचे स्टरर आणि कागदी पेले तेही प्लास्टिकमध्ये पॅक केलेले असत. एक कप कॉफी करायची झाली, तर आम्ही इतकं सगळं प्लास्टिक वापरून ते कचन्यात टाकत असू. हॉटेलच्या सुंदर लॉबीमध्ये पाणी, इतर गरम किंवा थंड पेय, चहा- कॉफी इत्यादींसाठी हाच प्लास्टिकचा जमानिमा तयार असायचा. दर थोड्या वेळाने प्लास्टिक व कागदी कपांचा ढीग कचरापेटीत साचायचा. इथून इतर शहरांमध्ये आम्ही गेलो तिथेही तोच प्रकार. असं सारं बघितल्यावर असं वाटतं की, प्लास्टिकशिवाय आपण जगूच नाही शकणार का? या अवास्तव प्लास्टिक वापराला काहीतरी पर्याय आहे का?
त्यासाठी आपण पाहूया की, आपण किती प्रकारचे प्लास्टिक वापरत असतो. आपण पेट किंवा पॉलिइथिलेन टेरिफठेलेटने बनलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, शीतपेयांच्या बाटल्या इत्यादी वापरतो. त्यानंतर यापेक्षा थोडेसे जाड प्लास्टिक असते ते म्हणजे शाम्पूच्या बाटल्या, साबणाच्या बाटल्या, साबण पावडर ठेवण्यात येणाऱ्या बाटल्या इत्यादी. पोली विनैल क्लोराईड याने बनलेले खाण्याचे डबे, सील करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, बिस्कीट ठेवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक, पाइप किंवा विनाईल इत्यादींसाठी वापरले जाणारे प्लास्टिक याचा समावेश होतो. लो डेन्सिटी पॉली ईथिलिन याने बनलेले मऊ प्लास्टिक म्हणजे ब्रेडच्या पिशव्या, शीतपेयांच्या प्लास्टिक पिशव्या इत्यादी. त्यानंतर पॉली प्रोपायलीन याने बनलेले प्लास्टिक म्हणजे फ्रीजमध्ये/फ्रीझरमध्ये राहतात असे आईस्क्रीमचे डबे, श्रीखंडाचे डबे किंवा इतर तयार खाद्यपदार्थांसाठी वापरण्यात येणारे डबे. पॉलीस्टिरीन याने बनलेली खाद्यपेयांची भांडी, सीडी इत्यादी वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पॅकिंगमध्ये वापरण्यात येणारे प्लास्टिक. इतर प्लास्टिक जसे की खेळणी, भांडी किंवा इतर दैनंदिन वापरातल्या वस्तू. सध्याच्या ‘वापरा आणि फेका’ या मनुष्य स्वभावानुसार या साऱ्या वस्तू एकदा वापरून कचऱ्यात फेकल्या जातात; परंतु या वस्तूंचा पुनर्वापर करणार तरी कसा? असे कोणते प्लास्टिक आहे जे वारंवार वापरले जाऊ शकते, याची आपल्याला कल्पना नसते.
पूर्वी वस्तू जपून वापरायची पद्धत होती. तेव्हा आपोआपच पुनर्वापर प्रत्येक वस्तूचा होत असे; परंतु प्लास्टिकच्या सहज उपलब्धतेमुळे आपण पुनर्वापर करणेच विसरून गेलो आहोत. पण जसे वस्तूंचा पुनर्वापर करण्याचे सल्ले दिले जातात तसेच या वस्तूंच्या उत्पादकांनी सुद्धा पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू बनवणे गरजेचे आहे. एखाद्या वस्तूचा पुनर्वापर करायचा म्हटलं तर त्याचे अनेक पैलू आहेत. उदाहरणार्थ बिघडलेली वस्तू सध्या सरळ टाकून दिली जाते. पूर्वी आपण वस्तू बिघडली की, दुकानात जाऊन ती दुरुस्त करून आणत होतो; परंतु आता दुकान शोधून ते दुरुस्त करण्यात येणाऱ्या खर्चापेक्षा नवीन आणलेली परवडते. नवीन फ्रीज घेताना चालू असलेला जुना फ्रीज फक्त शंभर रुपयात विकावा लागतो. तसेच आहे इतर गृहउपयोगी वस्तूंचे. त्यामुळे बाजारात जरी पैसे खेळत असले तरीही याला आपण (linear econony)लिनियर इकॉनॉमी म्हणू शकतो. अशा अर्थतंत्रामुळे समाजाचा फायदा कमीच होतो. कारण अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण नैसर्गिक गोष्टींपासून वस्तू बनवतो तर खरे; परंतु त्या एकदा वापरून लगेच फेकूनही देतो. याउलट (circular economy)सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये आपण नैसर्गिक गोष्टींपासून वस्तू बनवतो, त्यांचा पुनर्वापर करतो व शेवट जेव्हा कचरा टाकतो, तेव्हा त्यातून पुन्हा मूळ घटक निसर्गाला परत मिळतात. याचा अर्थ ते घटक विघटन पावतात आणि पुन्हा मूळ स्वरूपात जमिनीत जातात. सध्याच्या दिवसांत आपले अर्थशास्त्र खूपच वायफळ खर्च आणि वापरा आणि फेका या तत्त्वावर आधारलेले असल्यामुळे आपल्याला आर्थिक चणचण आणि पर्यावरणावरही दुष्परिणाम घडत आहेत. माणसांची एकमेकांशी असलेली नाती आणि कुटुंबव्यवस्था कमकुवत होत आहेत. वस्तूंचा पुनर्वापर जरूर करावा त्याचबरोबर कुटुंबव्यवस्था व नात्यांचाही पुनर्विचार करावा. शाश्वत जीवनशैलीच आहे, याचा पुनर्विचार करावा. न्यूझीलंड या देशाने जगाला पर्यावरण रक्षणासाठी ‘Ohango amiomio’ हा मंत्र दिला आहे. ‘Ohango amiomio’ अर्थात ‘cir- cular economy’ किंवा ज्या जैविक, नैसर्गिक घटकांपासून वस्तू बनवण्यात येतात, त्या वस्तू टिकाऊ वापर करता याव्यात अशा हेतूने बनवाव्यात. शेवटी जेव्हा त्या आपण कचरा टाकू, तेव्हा त्या वस्तूचे विघटन होऊन निसर्गाला पुन्हा तेच घटक प्राप्त व्हावेत. चला तर या पर्यावरण दिवसापासून आपण प्लास्टिकच्या पिशव्या, बशा, काटे-चमचे इत्यादी निर्धार करूया तसेच एकदा वापरून फेकण्यात येणाऱ्या वस्तूंचा पुनर्वापर करता येईल का? त्याबद्दलही फेरविचार करूया. प्लास्टिकऐवजी धातूचे काटे-चमचे व इतर भांडी वापरण्याचा निर्धार करूया.
Add comment