Lokvijay
blank

देवेंद्रजींना अनावृत्त पत्र… देवेंद्रजी जबाब दो!

रघुनंदन भागवत

देवेंद्रजी आपल्याला हे पत्र लिहिताना मनस्वी दुःख होत आहे. आपले सुसंस्कृत व्यक्तिमत्व, निष्कलंक चारित्र्य,आपली बुद्धिमत्ता, आपली अभ्यासू वृत्ती, कायद्याचे ज्ञान, आपली विकासाची दूरदृष्टी, आपले राजकीय चातुर्य, प्रशासनावरील पकड या सर्व गुणांवर फिदा असणारा मी एक प्रशांसक आहे. पण——आज आपल्याशी संवाद साधताना मनावर दगड ठेवून काही प्रश्न विचारावे लागत आहेत त्याबद्दल राग मानू नये एवढीच नम्र विनंती

देवेंद्रजी २०१९ च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला व आपले हक्काचे मुख्यमंत्रिपद आपल्याला मिळू दिले नाही. त्यावेळी आपण ज्या संयमाने प्रतिक्रिया दिलीत त्यावेळी महाराष्ट्रात तुमच्या बाजूने सहानुभूतीची प्रचंड लाट निर्माण झाली होती.पण अजित पवार नामक माशी शिंकली आणि त्यांच्याबरोबर ८० तासाचे सरकार आपण स्थापन केले आणि ती सहानुभूतीची लाट केव्हा विरून गेली ते तुम्हालाही कळले नसेल. ‘दैव देते नी कर्म नेते ‘ अशी आपली अवस्था आपण का करून घेतलीत?? शरद पवार यांनी आपल्याला याआधीही वारंवार कात्रजचा घाट दाखवला होता हे आपण कसे काय विसरलात? आपण मोदी, शाह यांना स्पष्ट नकार का कळवला नाही?तुम्ही थोडे ताठ कण्याने वागला असतात तर ‘बुंदसे गयी वो हौदसे नही आती’या म्हणीचे प्रत्यन्तर आपल्याला आले असते का?

आपण त्यानंतर विरोधी पक्षनेते झालात विधान सभेमध्ये.अडीच वर्षे आपण ज्या पद्धतीने महाविकास आघाडी नामक ‘बांडगुळाला’ दे माय धरणी ठाय ‘ केलेत ते महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासातले सोनेरी पान ठरावे. महाराष्ट्रातील विधिमंडळ इतिहासातील सर्वोत्कृष्ट विरोधी पक्षनेता अशीच आपली नोंद झाली असणार. आपण १०५ आमदारांना ज्या प्रकारे सांभाळले, त्यांचे मनोधैर्य अबाधित राहील याची काळजी घेतलीत त्याची पावती म्हणजे एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही.मी तर म्हणतो की आपल्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीतील ही अडीच वर्षे ही आपल्या कामगिरीची ‘कळसाध्याय ‘ होती.

आपल्याला त्यानंतर शिंदे येऊन मिळाले आणि आपण महायुतीचे सरकार स्थापन केलेत तेही कमीपणा स्वीकारून. पक्षादेश मानून आपण उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले तेही मनाविरुद्ध. पण इथेच आपल्या राजकीय वाटचालीला दृष्ट लागली का?

आपले १०५ आमदार असून सुध्दा ९ मंत्रिपदे व शिंदेच्या, अजित दादांच्या प्रत्येकी ४० आमदारानाही तितकीच ९ मंत्रिपदे हे प्रमाण कुठल्या तर्कशास्त्रात बसवलेत? ज्या आमदारांनी आपल्याला विपरीत अवस्थेत साथ दिली त्यांच्या आकांक्षावर बोळा फिरवताना आपण त्यांना गृहीत धरले असे आपल्याला वाटले नाही का?त्याग फक्त भाजपने करावयाचा व त्या त्यागाची फळे इतरांनी चाखायची ही सद्गुणविकृती कशासाठी?ग दि माडगूळकर यांच्या शब्दात सांगायचे तर ‘पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार,’असेच झाले ना!

  • मोदीजींनी आत्ता जे मंत्रिमंडळ बनवले आहे त्यात त्यांनी संख्यबळाच्या आधारे मंत्रिपदाचे वाटप केले आहे. आपण असे करू शकत नव्हता का?
  • सत्तेत आल्यावर आपण अनेक चौकशा करण्याचे आदेश दिलेत त्याची थोडक्यात आठवण करून देणे अप्रस्तुत होणार नाही.
  • पालघरच्या साधूंच्या हत्येची चौकशी कुठपर्यंत आली आहे? आरोपपत्र दाखल झाले का?
  • दिशा सालीयेन च्या संशयास्पद मृत्यूबद्दल एस आय टी ने काही अहवाल दिला आहे का? अहवाल दिला असल्यास पुढे काय कार्यवाही केली आहे?
  • सुशांतसिंह राजपूतच्या हत्येचा सी बी आय तपास कुठवर आला आहे?
  • मुंबई महापालिकेतील गेल्या २५ वर्षातील भ्रष्टाचाराची चौकशी कुठपर्यंत आली आहे? आरोप पत्र दाखल झाले आहे का?
  • कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी कधी पूर्ण होणार व आरोपी कधी गजाआड जाणार?
  • आपण विरोधी पक्षनेते असताना आपल्याला व गिरीश महाजनांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचणाऱ्या सरकारी वकील प्रवीण चव्हाणला अटक झाली का? त्याची वकिलीची सनद रद्द झाली का?
  • किरीट सोमय्यानी पुरावे दिलेल्या किहीम येथील उद्धव ठाकरेच्या गायब झालेल्या १९ बंगल्याची चौकशी सुरु केली आहे का?
  • किरीट सोमय्यानी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत पुढे काय कार्यवाही झाली आहे?
  • माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना वैद्यकीय कारणासाठी जामीन मिळाला आहे. ते अत्यंत सुदृढ स्थितीत वावरताना दिसतात. त्यांचा जामीन रद्द व्हावा म्हणून काही प्रयत्न इ डी मार्फत केले आहेत का?
  • अनंत अपराध करूनही संजय राऊत अजूनही मोकाट कसे काय फिरत आहेत? स्वप्ना पाटकरांनी केलेल्या आरोपांची सरकारने दखल घेतली आहे का?
  • राजकीय आघाडीवरही काही प्रश्न मनात येतात.
  • एकनाथ शिंदे व अजित पवार आपल्या वळचणीला आले आहेत की आपण त्यांच्या आश्रयाला गेला आहात? ही अल्पसंख्य मंडळी आपल्याला कशी काय टर्म्स डीकटेट करू शकतात?भुजबळ थेट ९० जागा कशा काय मागू शकतात?
  • अजित पवारांवाचून महायुतीचे काही अडले होते का?अजित पवार तुम्हाला लाभत नाहीत हे आता तरी लक्षात आले आहे का?
  • राष्ट्रवादीची मंडळी आपल्या श्रद्धास्थानाना कशी काय धक्का लावू शकतात?
  • लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी आपल्या समर्थकांची मते भाजपकडे वळवली का?
  • बेभरवशी राज ठाकरेंना एवढे लोणी लावण्याचे कारण काय? त्यांनी तर तुम्हाला न विचारता कोकण पदवीधर मतदारसंघात उमेदवार उभा केलाच ना!! महाराष्ट्र नवनिर्माणसेनेची किती मते आपल्या युतीला मिळाली?
  • वक्फ बोर्डाला १० कोटीची देणगी राज्य सरकारने कोणाच्या दबावाखाली जाहीर केली?
  • आपल्या पक्षात अनेक प्रवक्ते असताना आपणच ती भूमिका का वठवता? राम कदम, अमित साटम कुठे आहेत? केशव उपाध्ये यांचा नक्की रोल काय आहे?आशिष शेलार यांच्याकडे अधिक जबाबदारी द्यावी असे आपणाला वाटत नाही का?
  • आपल्यावर विरोधी पक्षाकडून जेव्हा चिखलफेक होते तेव्हा मूळ भाजपचे लोक तोंडात मिठाची गुळणी का धरतात? आपल्या बचवासाठी नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ या इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना का धाव घ्यावी लागते?
  • आपण इतर पक्षातून ओवाळून टाकलेल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देणे केव्हा बंद करणार आहात? अशोक चव्हाणना आपण लगेच राज्यसभेवर पाठवले पण चव्हाण नांदेडची जागा का जिंकून देऊ शकले नाहीत?
  • सर्वात शेवटी,महाराष्ट्रातील लोकसभेच्या पराभवाची सर्व जबाबदारी आपल्या स्वतःच्या डोक्यावर घेण्याची काय गरज होती? बावनकुळे काय शोभेचे अध्यक्ष आहेत का?
  • आपले पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, विस्तारक कुठे गायब झाले होते ऐन निवडणुकीत? ते आपल्या मतदारांना मतदानासाठी घराबाहेर का काढू शकले नाहीत?

देवेंद्रजी, सामान्य जनतेच्या मनातील प्रश्नांना मी वाट करून दिली आहे. या प्रश्नांची उत्तरे देण्यास आपल्याकडे फक्त चार महिन्यांचा अवधी आहे. या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यास मतदार आपल्याला भरभरून मतदान करतील अन्यथा १०५ चे २५ कसे होतील याचा पत्ताही लागणार नाही.

लहान तोंडी मोठा घास घेतला त्याबद्दल क्षमस्व.

7 comments

  • Excellent Impression of Common man’s mind.I am well wisher of Devendra ji like you.You raised questions of my mind.I express my hedt wishes to Devendra j

  • बहुतेक लोकांच्या मनातले लिहिले आहे.
    धन्यवाद

  • माझ्या मते 2022 मधे मविआ चे सरकार पाडायला शिंदेंना मदत केलि तिथून आजच्या पराभवाचा पाया रचला गेला. मविआ त्यांच्या कामगिरीने 2024 वर परत येणे अवघड होतै. भाजपाला संधी होती. नंतर भाजपाने व शिंदेंनी जी उध्दव ठाकरेंची चहूबाजूने कोंडी केली त्याने तटस्थ मराठी माणूसपण शिवसेना उबाठा कडे झुकला. यात सत्ताधा-यांच्या उद्दामपणाचे खूप प्रदर्शन झाले. जनता सगळे पाहात असते व तिला उद्दामपणा आवडत नाही नंतर अजित पवारांना घेण्याची ति पण त्यांच्या शर्तीवर..काही गरज नव्हति. हे सर्व अंगाशी येणारच होतै. त्यात मोदींनी बोललेली वाक्ये..नकली संतान, भटकती आत्मा हे पंतप्रधानपदावरच्या माणसाला न शोभणारे. कुठेतरी सामान्य माणसाला नाही आवडले

  • मोदींनी bjp नाही तर स्वतःचा नावाचा प्रचार केला, मोदी ह्या भ्रमात होते की माझे च नाव लोकांना पसंत आहे, स्वतःच्या नावाचा इतका प्रचार केला की आपण bjp ह्या पार्टी चे सदस्य आहोत है ते विसरून गेलेत. मोदींचा अह्मपणा आणि तुमचा स्वतचं प्रत्येक bjp च्या सदस्या लग्रहीत धरणे है खूप महागात पडले. मोदींचा अहंकार आणि इतरांना मूर्ख समजणे भारी पडले