Lokvijay
blank

अखंड सावध राहावे

श्री दुर्गेश जयवंत परुळकर

आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्रात रूपांतरित करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहे. त्यासाठी कपोलकल्पित घटनांची निर्मिती करून त्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर सातत्याने केला जात आहे. असा प्रयत्न करण्यामागचे कारण म्हणजे हिंदू समाजात वैचारिक गोंधळ निर्माण करुन संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांचा मोठा डाव आहे. आजही हिंदू समाजातील बहुसंख्य जनतेला सावरकरांना अभिप्रेत असलेली राजकीय दृष्टी प्राप्त झाली आहे असे म्हणता येत नाही. विरोधकांवर विश्वास ठेवण्याकडे आजही कल आपल्या हिंदू समाजातील बहुसंख्य जनतेचा आहे. विरोधी पक्ष हा सातत्याने हिंदुत्ववादी राजकीय पक्षांना आणि संघटनांना हिंदू विरोधी ठरवण्यासाठी धडपडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही सातत्याने विविध प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. विरोधकांच्या बनावट आणि काल्पनिक कथांना बळी पडणे म्हणजे हिंदूंनी स्वतःच स्वतःचा घात करण्यासारखे आहे. म्हणून हिंदू समाजाने अखंड सावध राहिले पाहिजे.

ईव्हीएम मशीन बाबत सातत्याने संशय व्यक्त केला जात आहे. एवढेच नाही तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाला लक्ष्य करून खोटे नाटे आरोप करण्यात आले. तसेच निवडणूक आयोगाला न्यायालयात सुद्धा खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंदू जनतेने एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की सर्व विरोधी पक्ष अत्यंत लबाड आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ पक्षाच्या हाती देशाची सत्ता जाऊ द्यायची नाही. त्यामुळे ते विविध प्रकारे विद्यमान सरकारला बदनाम करण्याचा घाट घालत आहेत. त्यांच्या या षडयंत्राला आपण बळी पडून त्यांचे मनसुबे यशस्वी करण्याचे पातक आपल्याकडून घडू नये म्हणून हिंदू समाजाने अखंड सावध असले पाहिजे.

नुकताच महाराष्ट्र शासनाने वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये दिल्याची बातमी सर्वत्र पसरली. पण त्यासाठी एक बनावट कहाणी विरोधी पक्षाने करून सर्वत्र प्रसारित केली ती म्हणजे वक्फ बोर्डाला दहा कोटी महाराष्ट्र शासनाने देऊन हिंदू समाजाचा विश्वासघात केला आहे. यावर तात्काळ विश्वास ठेवून हिंदूंकडूनच तीव्र विरोध व्यक्त केला गेला. हिंदूंकडून झालेली ही चूक विरोधी पक्षांच्या पथ्यावर पडलेली आहे.

वक्फ बोर्डाची स्थापना काल किंवा आज झालेली नाही. या सर्वाची प्रक्रिया सात दशकांपूर्वी पासून सुरू आहे. वक्फ बोर्डाला अमर्यादित अधिकार देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर वक्फ बोर्डाच्या सहाय्याने एक समांतर अशी न्याय व्यवस्था ही अस्तित्वात आणली आहे. या सर्व गोष्टी काँग्रेसकडून घडलेल्या आहेत. वक्फ बोर्डाला असा अमर्यादित अधिकार दिल्यानंतर देशाच्या राष्ट्रीय संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे असे विधान देशाचे पंतप्रधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केल्याचे सर्वांना स्मरत असेल.

या अमर्यादित अधिकाराचा लाभ वक्फ बोर्डाने घेतला आहे. त्यामुळेच वक्फ बोर्ड लाखो एकर भूमी अवैधपणे स्वतःच्या नावावर करू शकले आहे. या बोर्डाच्या कह्यात असलेली भूमी पुनश्च प्राप्त करून घेणे नितांत आवश्यक आहे अन्यथा संपूर्ण देशाची भूमी या बोर्डाच्या ताब्यात जाईल आणि न्याय प्रस्थापित करता येणार नाही. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील लाखो एकर जमीन भूमी जी या बोर्डाने अवैधपणे संपादन केली आहे त्याबाबतची सविस्तर माहिती प्राप्त व्हावी या हेतूने दहा कोटी रुपये उपयोगात आणले आहेत.

म्हणजे वक्फ बोर्डाच्या नावावर असलेली भूमी ही या बोर्डाकडे कशाप्रकारे हस्तांतरित झाली ? कोणाची भूमी या बोर्डाने स्वतःच्या नावावर करून घेतली? खरा सातबारा उतारा कोणाच्या नावावर आहे? तो वक्फ बोर्डाच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी त्यावर कोणी स्वाक्षरी केली? या आणि अशा अत्यंत महत्त्वाच्या मूलभूत प्रश्नांची संगतवार माहिती महाराष्ट्र शासनाकडे असेल तर त्याला अनुसरून निर्बंधांच्या चौकटीत राहून अवैध मार्गाने बळकावलेली जमीन पुनश्च सोडवणे महाराष्ट्र शासनाला सहज शक्य होईल. त्यासाठी या दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पण ही सत्य माहिती बाहेर येऊ न देता विरोधी पक्षाकडून महाराष्ट्र शासनाने हिंदू समाजाचा विश्वासघात केला अशी आवई उठवण्यात आली.

हिंदू समाजात हिंदू समाजाच्या मनात महाराष्ट्र शासनाविषयीचे अविश्वासाचे बीज पेरण्यात आले. आता ते बीज रुजल्यानंतर त्याचा मोठा वृक्ष करण्यासाठी अशा प्रकारचे विविध आरोप विरोधी पक्षाकडून यापुढे सातत्याने केले जातील. म्हणजे येणाऱ्या निवडणुकीत बहुसंख्य हिंदू समाज हा विद्यमान महाराष्ट्र शासनाच्या पाठीशी उभा राहून त्याला मतदान करणार नाही. आणि असे घडले की सत्ता विरोधी पक्षांच्या हाती जाईल. विरोधी पक्षांच्या हाती सत्ता गेली की या देशात मनमानी राज्यकारभार करण्याची पूर्ण मोकळीक विरोधी पक्षाला मिळणार आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या विषयी अविश्वास निर्माण करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न यशस्वीपणे विरोधी पक्षाने केला आहे. त्यांच्या या प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी हिंदू समाजाने अखंड सावध राहणे नितांत आवश्यक आहे.

वक्फ बोर्डाला देण्यात आलेले अमर्यादित अधिकार एवढे बलवान आहेत की या बोर्डाच्या विरोधात कोणालाही न्यायालयात जाण्यासाठी एकही दरवाजा उघडा ठेवण्यात आला नाही. वक्फ बोर्डाचे विसर्जन करून या बोर्डाने बळकावलेली संपूर्ण भूमी पुनश्च आपल्यात कह्यात घेणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट हिंदूंना साध्य करायचे आहे. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य प्रकारे हालचाल करणे नितांत आवश्यक आहे. तसेच या हालचाली करताना कोणत्याही प्रकारे आपल्या हातून चूक होऊ नये म्हणून सर्व पुरावे आपल्या हाती यावेत यासाठी काही पैसा महाराष्ट्र शासनाला खर्च करावा लागत आहे. हे दहा कोटी रुपये खर्च केले की आपल्याला सर्व प्रकारचे पुरावे मिळतील त्याचा उपयोग आपल्याला अवैधपणे बळकावलेली जमीन या बोर्डाच्या कह्यातून सोडवून घेण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. म्हणून आपण विरोधकांच्या भूलथापांना बळी पडण्या ऐवजी अखंड सावध राहून विरोधकांचे कुटील डाव उधळले पाहिजेत. तरच आपण तरून जाऊ. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरोधी पक्ष हा विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा आहे का याचाही विचार आपण केला पाहिजे? हिंदू समाजात फूट पाडून पक्षपात केला तो याच विरोधी पक्षांनी! भ्रष्टाचाराचे विविध विक्रम प्रस्थापित केले ते याच विरोधी पक्षांनी! अशा भ्रष्टाचारी आणि अराजक सदृश वातावरण निर्माण करणाऱ्या विरोधी पक्षावर विश्वास ठेवण्याचा अपराध आपल्याकडून घडून नये म्हणून आपण हिंदूंनी अत्यंत सावधगिरी बाळगणे नितांत आवश्यक आहे. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे आपणच आपल्या बांधवांवर अविश्वास किंवा संशय बाळगून आत्मघात करत आहोत. याची जाणीव सातत्याने आपल्याला असली पाहिजे. संशय सर्व गोष्टीचा विनाश घडवून आणतो. गीतेतल्या या वचनाकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. अत्यंत बिकट परिस्थिती आहे म्हणून हिंदू समाजाने संशय रहित होऊन राष्ट्रहिताचा विचार करून विरोधकांच्या कुटील डावाला बळी पडू नये एवढीच माफक अपेक्षा ठेवून हा लेख लिहिला आहे.

Add comment