स्थावर मालमत्तेमध्ये वरिष्ठ नागरिक मनाने गुंतलेले असतात तसे हल्लीची पिढी करीत नाही . आधुनिक पिढी हि त्या बाबतीत भावनाहीन म्हणजे प्रॅक्टिकल आहे. पूर्वी च्या पिढीने मोठमोठी घरे बांधली ती मुलासाठी आणि नातवंडांसाठी देखील!कमावलेला सारा पैसा बहुतेकानी आपल्या पुढच्या पिढीचा विचार करतच खर्च केला.
ना हे वरिष्ठ कुठे लांब सहलीला गेले, ना कधी परदेशात जाऊन लाखो रुपये खर्च केले. ना आठवड्यातून एकदा पिझ्झा मागवला, ना बर्गर! नाटक सिनेमा सुद्धा वर्षातून दोन तीन वेळा! पैसे फक्त मुलांसाठी राखून ठेवायचे, झालेच तर एक दुसरा फ्लॅट घेऊन ठेवायचा, जो स्वतः साठी काही उपयोगाचा नाही. शहरात रहात असेल तर गावी घर बांधायचे, जमीन विकत घ्यायची ,असे उद्योग केले.
परिणाम झाले काय ? तर मुलांना आधुनिक शिक्षण दिले जे फक्त आणि फक्त नोकरीभिमुख आहे. कुठलीही शाळा, किमान भारतातील तरी, व्यवसाय वा धंदा किंवा उत्पादनाभिमुख उद्योग कसा करावा हे शिकवित नाही.
डॉक्टर होण्यासाठी साधारण एक कोटी रुपये लहानपणापासून खर्च येतो. मग तो वसूल करण्यासाठी ,सर्व नसतील तरी बहुतेक सारे नवीन डॉक्टर, डॉक्टरी म्हणजे सेवा व व्य्यवसाय नसून धंधा ,या दृष्टीने पहायला लागलेत. त्यामुळे औषधे व उपचार या दोन्हीमध्ये भ्रष्टाचार व स्कॅम सुरु आहेत.
इंजिनियर होऊन दहा हजारातील एक मुलगा उत्पादनप्रणित उद्योगांकडे वळतो. बाकीचे 999 इंजिनिअर फक्त इतर शहरात किंवा परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीच्या मागे असतात. स्थिर होईपर्यंत पाच सात कम्पन्या सोडलेल्या असतात. अन मूळ गावी न राहिल्याने, इतर ठिकाणी , दुसऱ्या शहरात वा परदेशात कायम वास्तव्य करायचे ठरवल्याने इथल्या मालमत्तेमध्ये नवीन पिढीला अजिबात रस नसतो!
पुढील पिढीला हे घर, जमीन जुमला यापकडे पहायला, त्याची निगा राखायला वेळ नाही. आणि त्यांना रस नाही, निष्ठा नाही!
मग आईवडिलांचे निधन झाल्यावर काही मुले ती जमीन, घर विकून पैसे घेऊन निघून जातात. परदेशात राहणारे कित्येक मुले मुली, आईवडील जिवंत असताना येत नाहीत, वेळ नाही या सबबी वर! पण ते वर गेल्यावर मात्र इथे सारे आर्थिक हिशोब निपटायला एक दीड महिन्याची रजा मिळते! हे मी अनुभवले आहे.बँकेत अशा काही मुलांचा, जेष्ठ नागरिकांचा अनुभव आलेला आहे.
आश्चर्य म्हणजे मागील पिढीचा मोह, मुलांविषयीच्या अपेक्षा काही कमी होत नाहीत. सगळ्या स्थावर व बँकेतील पैशांना वारस म्हणून आपल्या मुलाला वा मुलीलाच ठेवतात , जे दूर राहून, परदेशी राहून, कधी आईबापाच्या गंभीर आजारपणात देखील भेटायला न येणाऱ्या ह्या मुलांना तर ते गेल्यावर एक छोटी मोठी लॉटरिच लागते ! हे मी अनुभवांती बोलतोय. कारण मी वीस पंचवीस वर्षे पब्लिक रिलेशन मध्ये काम केले आहे.
हे वरिष्ठ नागरिक, पूर्वीची पिढी सोन्याचान्दिचे दागिनेही आपल्या मुला बाळासाठी करून ठेवतात. हल्लीच्या पिढीला जुन्या नक्षिकामाचे दागिने पसंत नाहीत तर पश्चात्य लोकान्प्रमांणे नव्या डिझाईन चे / वा खोटे म्हणजे इमिटेशन ज्वेलरी पसंत आहे. म्हणजे त्याचाही हल्ली काही उपयोग नाही.
नवी पिढी पैसे कमावणे आणि पैसे खर्च करणे एवढेच जाणते! पण ते पैसे कमावण्यायोग्य ज्या पिढीने केले, त्यांचे अनुभव , त्यांची आस्था, प्रेम, निष्ठा याच्याशी नवीन पिढीला काही कर्तव्य नाही. पूर्वीच्यां पिढीने आपल्या कर्तव्यापुढे आपली मौज मजा बाजूला ठेवली. गरजे नुसार खर्च केला. पण मुलांना अगदी कुठल्याही अडचणी शिवाय, त्रासापासून मुक्त असे वाढविले। जे आपल्याला मिळाले नाही, त्याची वानवा नव्या पिढीला पडू नये, याची काळजी घेऊन उच्च शिक्षण त्यांच्या क्षमतेनुसार दिले. पण बरेच वरिष्ठ आपल्या पुढच्या पिढीला हवे तसे चांगले संस्कार देण्यात कमी पडली,कमी पडते आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
आपले आईवडील आपल्याला परिस्थितीची जाणीव देत असत. गरीब आहोत, की मध्यामवर्गीय हे मुलाना ठाऊक असे. पैसेवाले देखील आपल्या मुलांचे पाय जमिनीवर रहावेत याची काळजी घेत. पूर्वी अगदी क्वचित कोणी बाईक वा कार ने शाळेत येत असे। अन्यथा श्रीमंत मुले फार तर सायकलवर येत! पूर्वीच्या पिढीने खाऊ वाटताना आपला परका असा मुलांमध्ये भेदभाव केला नाही. हुशार विध्यार्थ्यांना काही श्रीमंतांनीच मदत केली पुढे जायला!
आतां मात्र चित्र बदलले आहे. नवी पिढी बऱ्यापैकी स्वार्थी झाली आहे अन ह्याला कारण पूर्वीचीच पिढी आहे. नवी पिढी स्वतः च्या सुखाकडे -म्हणजे ऐहीक सुखाकडे जास्त लक्ष देत आहे. टीव्ही, फ्रिज,कार, लॅपटॉप, नवनवे मोबाईल,बाईक , स्कुटी आणि घरातील इतर सुखसोयी त्यांना नाते वा संस्कार यापेक्षा जास्त महत्वाच्या वाटतात!
वरिष्ठ आता आपला भार मुलांवर पडू नये ,असे शक्यतो पाहतात. पण हल्ली नातवंडांची जबाबदारी देखील , जर एकत्र रहात असतील तर घेतात. ही जी जबाबदारीची आणि कर्तव्याची जाणीव मागील पिढीला होती व आहे तिच आताच्या पिढीमध्ये कमी होत चालली आहे!
मागच्या पिढीने आतां हे ध्यानात ठेवावे की आयुष्यमान वाढते आहे, राहणीमान महाग होते आहे। अशात तुम्ही केव्हा स्वतःकडे पाहणार आहात?आतां तरी दुसऱ्याच्या (पुढील पिढीच्या) सुखासाठी आपले सुख बाजूला सारा. तुम्ही त्यांना कमावण्यायोग्य बनवले आहे. ते त्यांचे जीवन जगत आहेत. तुम्हीही तुमचे जीवन जगा!
जीवनाचा आनंद घ्यायला आतां तरी शिका. बरेच भारतीय आपले जीवन कंजुषी ने जगतात, काटकसरिने खर्च करतात ते केवळ पूढील पिढीने श्रीमंत व्हावे, त्यांना काही कमी पडू नये म्हणून! आतां हे बंद करा !
स्वतःसाठी जगायला शिका!
स्वतःचे छंद, इच्छा यावर खर्च करा!
राहिलेल्या इच्छांची एक यादी करा!
त्या यादीतील एक एक इच्छा पुरी करण्यासाठी जगा!
जुन्या मित्रांमैत्रिणींना भेटा!
साठ पासष्ठ म्हणजे काही मरण्याचे वय नव्हे! आतां अजून किती दिवस जगणार आहोत, हा विचार सोडा! समजा, तुम्हांला परमेश्वराने नव्वद ते शंभर वर्षांचे आयुष्य दिले असेल तर अजून तुमच्याकडे वीस, पंचवीस किंवा तीस वर्षे शिल्लक आहेत, जी तुम्ही पूर्णपणे स्वतःसाठी जगू शकाल!पुरे झालं आतां दुसऱ्यांसाठी जगणे! “आतां आपलं काय राहिलंय?” हा विचार करीत रहाल तर शेवटची काही वर्षे आजारपणात, इतरांच्या वर अवलंबून काढावी लागतील, हे लक्षात ठेवा!
दिर्घायु व्हा, निरोगी रहा!
गरिबीत भले जन्माला आला असाल- श्रीमंत म्हणून फक्त मरू नका तर श्रीमंतीत जगा! मस्तीत रहा, लहान लहान गोष्टीत आनंद मिळवा!……
Add comment