Lokvijay
blank

इच्छामरणावर भाष्य करणारा “आता वेळ झाली”

अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित, लिखित ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून पोस्टरमध्ये दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी दिसत आहेत. या चित्रपटाची घोषणा अभिनेते प्रतीक गांधी यांनी आपल्या सोशल मीडियावरुन केली आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाच्या नावातच अवर ग्लास दिसतोय आणि त्यातून सरत चाललेली वेळही दिसतेय. ‘इफ यू वाँट अ हॅप्पी एण्डिंग, यू मस्ट नो व्हेअर टू एण्ड युअर स्टोरी’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह या चित्रपटात भरत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर, अभिनव पाटेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. इमेजीन एंटरटेन्मेंट अँड मीडिया,अनंत नारायण महादेवन फिल्म्स यांच्या सहयोगाने ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे दिनेश बंसल , जी. के. अग्रवाल आणि अनंत महादेवन निर्माते आहेत.

चित्रपटाबद्दल अनंत नारायण महादेवन म्हणतात,” जीवनाचा शेवट आनंदी व्हावा, असे वाटणाऱ्या प्रत्येक वयस्काच्या अस्तित्वाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट म्हणजे हृषिकेश मुखर्जींच्या ‘आनंद’ची दुसरी बाजू आहे. इच्छामरण हा एक असा विषय आहे, ज्याने या महामारीच्या काळात मला प्रभावित केले. जेव्हा जगाने जीवन आणि मृत्यूकडे एका वेगळ्या नजरेने पाहाण्यास सुरूवात केली. तरुणाईचाही जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला. भौतिकवादी दृष्टीकोनापेक्षा व्यावहारिक दृष्टीकोनाकडे त्यांचा कल वाढला. हा चित्रपट पाहून वृद्धांच्या मनातील घालमेल तरूणाईला नक्कीच कळेल.’’ असे महादेवन यांनी सांगितले. काहीशा वेगळ्या विषयावरील या चित्रपटाने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त केले आहेत.

Add comment