वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये हि वारकर्यांची भावना असते. अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ , तळमळ ! कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो हि भावना मानस साद घालत असते.
वारकरी संप्रदायाच्या म्हणजे ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकर्यांवर ओढवला. घटना होती इसवीसन १५०८ ते १५११ दरम्यानची. विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोंदी (सध्याचे नाव हंपी) येथे नेली. आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेजण आलाप करू लागले. परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचे काय चालणार ? सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निस्सीम भक्त श्रीसंत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली. भानुदासांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती. पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच. त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करीत ते हंपीस पोचले. एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलूपबंद गाभार्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती. दरवाजास स्पर्श करताच कुलुपे गळाली व सैनिकांना झोप लागली. भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले. म्हटले देवा, ‘ अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत आणि तू येथे आलास ? तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणार्या भक्तांच्या भक्ति प्रेमास तू मुकशील. चल माझ्या समवेत !’ दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला. बरोबरीने नवरत्नांचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला. महाराज बाहेर पडले. परिस्थिती पूर्ववत झाली. सकाळी राजा काकडआरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आले कि देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार गायब झाला आहे. शोधाशोध सुरु झाली. राजाने फर्मान सोडले कि, जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा. पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान-संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला. चोर सापडला या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले. परंतु चमत्कार झाला.
कोरडीये काष्ठी अंकुर फुटले ! येणे येथे झाले विठोबाचे !!
सुळाला पालवी फुटली. बातमी राजापर्यंत गेली. पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास तेथे क्षणभरही राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अंगुष्ठ एवढे रूप धारण केले व संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले. दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले. पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकर्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता कळली. दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला. वारकर्यांचा आनंद गगनात मावेना, ‘पुंडलिक वरदा हरिविठ्ठल’च्या गजराने पंढरी दुमदुमली. वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले. पुष्पवृष्टी झाली. स्थानिकांनी सडासारवण केले. सुवासिनींनी पायघड्या घातल्या, ओवाळले. वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले. पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा ! पांडुरंगाने पुन्हा येथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली. मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली. पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वादरूपी दोन वर दिले कि, ‘तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्याजवळच असशील.’ त्याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणि त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजेच शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराज होय. अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पणतू होय. दुसर्या वरा प्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत. गाभार्यातून बाहेर पडले कि चार खांबी मंडप लागतो. त्याच्या बाहेर पडले कि सोळा खांबांचा मंडप लागतो त्यास सोळखांबी मंडप असे संबोधण्यात येते. त्याच्या डाव्या हातास पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी होय. संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध १४ या तिथीस समाधी घेतली. आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजाअर्चा आदींद्वारे त्यांचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो. तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीस रथोत्सव साजरा करण्यात येतो.
संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्त्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपणांस पंढरीत होत आहे. म्हणूनंच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो. नसता ‘हंपीची वारी’ करावी लागली असती. संत ज्ञानेश्वरादिक संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो गाता आला नसता. संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरीपर अभंग लिहिता आले नसते. धन्य ते संत भानुदास आणि धन्य त्यांची भक्ती कि ज्यांच्यामुळे आज आपण पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेत आहोत. आजही ज्याठिकाणी हंपीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगास स्थापित केले होते त्या ठिकाणी गाभार्यात पांडुरंग नाहीये. तेथे एक खाच दिसते कि ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती.
हा इतिहास ८०% भाविकांना माहित नाहीये. त्यांच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून हि अत्यंत महत्वाची माहिती पोचवा. कीर्तनकार असाल तर हि माहिती आपल्या कीर्तनातून लोकांना सांगा. आपल्या पांडुरंगाच्या भक्तांचे सामर्थ्य काय आहे ते इतरांपर्यंत पोचवा. हा मॅसेज महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात गेला पाहिजे.
👌